मा.श्री.विजयकाका बराटे (काका) यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेणारा लेख : वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष तसेच पुण्यातील वारजे येथील सह्याद्री कुस्ती संकुलाचे संस्थापक ज्यानी अल्पावधीत महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला अनेक राज्यस्तरीय,राष्ट्रीय त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पैलवान दिले.आजमितीला सह्याद्री कुस्ती संकुल वारजे येथे अनेक दिग्गज मल्ल सराव आहेत.अगदी लहान वजनी गटापासून ते महाराष्ट्रातील क्रमांक एकच्या जोडीतील पैलवान सुद्धा येथेे सराव करतात.सह्याद्री कुस्ती संकुल या नावाने लावलेले छोटेसे रोपटे आज आकाशाला गवसणी घालत आहे.महाराष्ट्रात एक आदर्श तालीम म्हणून सह्याद्री कुस्ती केंद्राकडे पाहिले जाते.
माननीय विजय बराटे सर यांच्यासारख्या ध्येयवेडा, कल्पक बुध्दीचा आणि आकाशाला गवसणी घालणारे स्वप्ने पाहणारा अवलिया आजच्या युगात पाहायला मिळणे दुरापास्तच.मी ज्या ज्या वेळी विजय बराटे सरांना भेटलो त्या त्या वेळी त्यांच्या उत्तुंग बुद्धिमत्तेचा, प्रचंड व्यासंगाचा आणि आकाशाला सुद्धा आपण थिटे आहोत असे वाटावे अशा दुर्दम्य इच्छाशक्तीचा प्रत्यय आला.
सरांना पुण्यश्लोक छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे विलक्षण वेड.शिवरायांना सह्याद्रीने बळ दिले.सह्याद्री हे नाव उच्चारले तरी गौरव वाटतो.सरांनी सह्याद्री हे नाव स्वीकारून आपल्या कामाची सुरुवात केली.न बोलता मुकाट्याने काम करणे आणि कामातून आपली ओळख समाजाला सांगणे हे सरांच्या व्यक्तिमत्वाचे मुख्य वैशिष्ट्य होय.मोठे ध्येय धरा,जीवनाला एक संघर्ष म्हणून पहा ही त्यांची शिकवण तमाम पैलवान मुलांना असते.सह्याद्री कुस्ती संकुलात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक मुलाला "ऑलिम्पिक" हे टार्गेट दिले जाते.त्यानुसार त्याचें ट्रेनिंग सुरू होते.आजमितीला अनेक पैलवान आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवून आली आहेत.
सरांनी मुलांना आवश्यक खुराक वेळच्या वेळी मिळावा म्हणून स्वतः नियोजन केले आहे.प्रत्येक दिवशी कोणता खुराक मुलांना मिळणार हे अगोदर ठरलेले असते.संपूर्ण तालीम CCTV ने संचलित आहे.प्रत्येक पैलवान हा शिस्तबद्ध वागताना दिसून येतो.राहण्याची सोय एखाद्या आंतरराष्ट्रीय हॉस्टेल प्रमाणे आहे.ज्यात मुलांना लॉकर,बेड पासून सर्वच सुविधा देण्यात आल्या आहेत.
प्रत्यक्ष सराव सुरू करताना "छत्रपती शिवाजी महाराज की जय...धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय" असा उद्घोष होऊन मगच सराव सुरू होतो हे मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.
सर हे मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे दुदर्म्य इच्छाशक्तीचे उदाहरण आहेत.त्यांचा सिस्टम विरोधात लढा हा वैयक्तिक रित्या सुरू असतो.
सरांच्या मुलीला लहानपणी इंग्रजी माध्यमात शिकायची इच्छा होती.पुण्यातील नामांकित शाळेत प्रवेश घेताना त्या शाळेने पालकांची मुलाखत घेतली व आपणास इंग्रजी येते का विचारले.सर तसे उच्च विद्याविभूषित होते पण त्यांना हा प्रश्न खटकला.त्यांनी सांगितले इथे माझी मुलगी शिकणार आहे तर आम्ही मुलाखत का द्यावी ?
तसेच जर एखाद्या अडाणी पालकाला आपली मुले इंग्रजी शाळेत शिकवायची असतील तर त्यांना इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारणार ?
सरांना ही सिस्टम इतकी जिव्हारी लागली की।ज्याने पुण्यातील शिक्षण क्षेत्रात त्यांनी हालचाल उठवली.
"सह्याद्री इंटरनॅशनल स्कुल" नावाने त्यांनी स्वतः इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली.जो विद्यार्थी पहिला प्रवेश घेईल त्याला पहिला प्रवेश या तत्वावर ही शाळा सुरू झाली.मुलांच्या पालकांनी मुलाखत द्यावी,मेरिट लिस्ट अथवा तत्सम प्रकार त्यांनी ठेवलेच नाहीत.प्रवेशासाठी कोणाचाही वशिला चालत नाही.अगदी गरीबाघरची मुले इथे इंग्रजी शिक्षण घेतात.अशी सह्याद्री स्कुल ची दैदिप्यमान कामगिरी व इतिहास.
सरांच्या ध्येयवेड्या बुद्धीने आणि उरात असलेल्या स्वाभिमानाने त्यांनी त्यांच्या परीने बदल घडवला.बदल व्हावा असे ज्याला वाटते त्यांनी स्वतःपासून सुरवात करावी ही संकल्पना त्यांनी स्वतःच्या कृतीने जगाला सांगितली.
सध्या त्यांनी महिला कुस्तीसाठी सुद्धा योगदान दिले आहे.करोडो रुपये किमतीचे फ्लॅट त्यांनी केवळ महिलांच्या हॉस्टेल साठी पाडून नवीन बांधले हे मी डोळ्याने पाहिले आहे.आजमितीला महिला कुस्तीगीर सुद्धा इथे सराव करतात.इथे प्रवेश घेताना लहान मुले मुलींना लगेच दिला जातो.लहान मुले मुलींना बालवयातच मल्लविद्येचे बाळकडू इथे दिले जातात.
एखादी स्पर्धा,कुस्ती मैदान असेल तर सहभागी होणाऱ्या मल्लाना सरांच्या घरातील माता-भगिनी औक्षण करतात व शुभाशीर्वाद देतात.त्यामुळे इथे साराव करणाऱ्या मुलांना आपण घर सोडून आलोय ही भावनाच मनाला स्पर्श करत नसते.
आजच्या कुस्ती क्षेत्राला विजय बराटे सरांसारख्या डोळस व्यक्तिमत्वाची प्रकर्षाने गरज आहे.बघितला तर कुस्ती एक खेळ आहे मात्र या खेळाला असणारी हजारो वर्षांची परंपरा आणि वेळोवेळी याच खेळाने जागतिक बाजारपेठेत भारताचे उंचावलेले स्थान पाहता हा खेळ किती महत्वपुर्ण असावा याची प्रचिती येते.सिस्टम मध्ये लाखो त्रुटी असतात.पण त्या त्रुटी जाऊन पारदर्शकता यावी,कष्टाला किंमत मिळावी यासाठी वारंवार भांडण,आंदोलन न करता आपल्या स्वतःपासून बदल कसा घडवता येईल याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही.मला वाटते विजय बराटे सर सह्याद्री च्या माध्यमातून हा बदल घडवत आहेत.जशी एखादे वारूळ बांधताना मुंगी कोणताही आवाज करत नाही अगदी तसेच सह्याद्री कुस्ती संकुलाचा डोलारा आकाशाला गवसणी घालतोय मात्र प्रसिद्धी पासून अलिप्त राहून ही फार मोठी गोष्ट आहे मंडळी.सत्याला साथ आणि असत्यविरुद्ध संघर्ष ही कुस्ती खेळाने तुम्हा आम्हाला दिलेली बहुमूल्य देणगी मात्र आपणा सर्वानाच याचा विसर पडलेला दिसतो.बराटे सरांच्या माध्यमातून या गोष्टीला पुन्हा उजाळा मिळतो.
असज त्यांचा वाढदिवस.आई भवानी त्यांना उदंड आयुष्य देवो आणि त्यांच्या हातून अशीच मल्लविद्येची सेवा घडावी ही प्रार्थना.
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या