शतकातील फ्रीस्टाईल कुस्ती मधील सर्वश्रेष्ठ मल्लाला अलेक्झांडर मिदवेद ला 11 मिनिटे झुंझवणारे एकमेव मल्ल पै.मारुती माने

पै.मारुती माने आणि पै.अलेक्झांडर मिदवेद यांची ऐतिहासिक कुस्ती
●•••••••••••••••••••••••••••••●
शतकातील फ्रीस्टाईल कुस्ती मधील सर्वश्रेष्ठ मल्लाला 11 मिनिटे झुंझवणारे एकमेव मल्ल पै.मारुती माने
●••••••••••••••••••••••••••••●
✍🏻लेखन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
●••••••••••••••••••••••••••••••●
1962 ते 1972 या दशकात पुर्ण जगात कुस्ती क्षेत्रात धुमाकूळ घातला ते नाव होते रशियन मल्ल पै.अलेक्झांडर मिदवेद.
6 फूट 2 इंच उंची आणि 105 किलो वजन असलेला गोरापान रशियन मल्ल ज्याने कुस्ती क्षेत्रात शतकातील सर्वश्रेष्ठ मल्ल होण्याचा मान मिळवला.
त्याच्या कारकिर्दीत सलग 7 वेळा खुल्या गटात जागतीक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले.
युरोपियन चॅम्पियनशिप स्पर्धेत 3 सुवर्णपदक आणि जगतिक सर्वात मानाची समजली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धेत 3 सुवर्णपदक प्राप्त करुन रशियन जनमाणसांच्या मनात अढळ असे स्थान प्राप्त केले.
मिदवेद चे जनुकीय विश्लेषण करावयाचे झाले तर त्याचे आई वडील 6 फुटाच्या वर उंचीचे ,आई नावाजलेली टेनिस पट्टू तर वडील नामवंत मल्ल.
अश्या आई बापाच्या पोटी जन्मलेला मिदवेद हा जन्मताच जणू काही कुस्ती क्षेत्रावर वर्चस्व निर्माण करायलाच जन्मला होता..!
त्याच्या कुस्ती कारकिर्दीचे वैशिष्ट्य असे की वर्ल्ड चॅम्पियनशिप कुस्तीत त्याच्या पुढे 48 सेकंदाच्या वर जगतिक कोणताच मल्ल टिकला नाही.
ऑलिम्पिक स्पर्धेत हे रेकॉर्ड 1 मिनिट 34 सेकंद,त्याच्या पुढे या बहाद्दराने एकही कुस्ती लढली नाही.
रशियन राष्ट्राध्यक्ष मिदवेद च्या जीवावर जागतिक परिषदेत फुशारकी मारत असे की केवळ आमच्याच देशात अलेक्झांडर मिदवेद सारखा मल्ल घडू शकतो,आणि मग सर्वानाच या शब्दांपुढे मान हलवावी लागे कारण अमेरिकन,जपानी,तुर्की,इराण सारख्या देशातील एकही मल्ल त्याच्यापुढे तग धरू शकत नव्हता.
त्यावेळी अमेरिकेने मिदवेद ला आमच्या देशाकडून लढ,तुला मानाचे स्थान देऊ अशी संधी दिली होती,मात्र देशाशी एकनिष्ठ असलेला अलेक्झांडर ने सांगितले होते की, "माझ्या देशाकडे फक्त एकच अलेक्झांडर मिदवेद आहे"..!
अश्या महान मल्लांचे कोडकौतुक गाण्यात 60 च्या दशकातील सर्व प्रसारमाध्यमे गुंतलेली असायची.

पण, एक आक्रीत घडलं 1967 च्या च्या युनायटेड किंगडम मधील मॅचेस्टर शहरात झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत.
जगातील अनेक मल्ल आपआपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत मॅचेस्टर शहरात डेरेदाखल झाली होती.

भारताचे प्रतिनिधित्व करणारे मल्ल होते पै.मारुती माने ज्यांनी 1962 च्या जाकार्ता आशिया चॅम्पियनशिप स्पर्धेत ग्रीको रोमन मध्ये रौप्य आणि फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात सुवर्णपदक जिंकत भारताला एकाच स्पर्धेत खुल्या गटात दोन पदके जिंकून देऊन इतिहास रचला होता.

मॅचेस्टर स्पर्धेत अनेक कुसत्यांच्या फेऱ्या पार पडत फायनल ला खुल्या गटातून आमनेसामने आले ते मारुती माने विरुद्ध पै.अलेक्झांडर मिदवेद.

मारुती माने हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील सप्तर्षी कवठे या छोट्याश्या खेडेगावातून आलेले.
कुस्ती क्षेत्रात इतक्या मोठ्या उंचीवर गेले ते खेडेगावच्या तालमीत सराव करुन.
अठराविश्व दारिद्र्य असणाऱ्या गरीब कुटुंबात भाऊंचा जन्म झाला.
आई वडील उंचीने खुजे मात्र भाऊंचा देह धिप्पाड,जणू काही खास कारणानेच मारुती माने यांना ईश्वराने पृथ्वीवर पाठवले असावे.
रानात मोलमजुरी करत कुस्तीचा छंद जोपासला,पुढे स्वतःच्या मनगटावर हिंदकेसरी झाले,तर गदा ठेवायला घरात जागा सुद्धा नव्हती इतकी गरीब परिस्थिती.
मात्र स्वकर्तृत्वावर,मेहनत,जिद्द आणि गावच्या प्रेमामुळे आज ते जागतिक कुस्ती स्पर्धेत नशीब आजमावायला आले होते.
मिदवेद ची कुस्ती ची शैली अगोदरच सांगितली की 48 सेकंदापेक्षा जास्त वेळ कोणताही मल्ल त्याच्या पुढे लढू शकत नव्हता.
आक्रमकता,गतीमानता आणि शास्त्रशुद्ध डावपेचांची शृंखला करत चिटपतीने कुस्ती मारणारा भाल्या सारखा उंचापुरा अलेक्झांडर तर 5-5 हजार जोर,एकाच वेळी 4-4 मल्लांशी खडाखडी करणारे,मुलतानी टांगेवर प्रभुत्व असणारे मारुती ही लढत जणू दोन वादळे एकमेकांना भिडणार असेच अंदाज बांधले जाऊ लागले.
पण मिदवेद ची आजवरची कुस्ती कारकीर्द अतिशय जबरदस्त होती.
3 वेळा खुल्या गटात ऑलिम्पिक सुवर्णपदक आणणारा मिदवेद हा अजिंक्य योद्धा होता हे मान्यच करावे लागेल..!

कुस्ती एकेरी होणार अशी चिन्हे दिसू लागली.
पण मारुती माने आत्मविश्वासाने मॅट वर आले.
क्षणभर डोळे मिटून त्यांच्या गावचे स्मरण केले ज्या गावाने त्यांच्यावर इतके प्रेम केले की आज ते इथे आले होते.
बस्स...ठरले..मिदवेद शी प्राणपणाने झुंझायचे..!

उंचापुरा गोरापान मिदवेद प्रेक्षकांना अभिवादन करत मैदानात आला.
एका अजिंक्य वीरांच्या चेहर्यावर दिसावी तशी काहीशी मस्तीची छटा त्याच्याही चेहऱ्यावर दिसत होती.
मारुती माने असा गप्प करु असा अविर्भाव दिसत होता.

सलामी झडली आणि कुस्तीला सुरवात झाली....!

मिदवेद ने आक्रमक भूमिका घेत मारुती माने यांच्या गर्दनखेचीला प्रारंभ केला ....एका क्षणात बगलेत हात घालून मारुती माने नी त्या अजिंक्य मल्लाला अशी जी टांग लावली की भवरा फिरावा तसा गर्दीशी फिरत मिदवेद मॅट च्या बाहेर पडला आणि मारुती माने यांची 3 गुणांची कमाई झाली..!

झोपेत असलेल्या माणसाच्या अंगावर पेटते निखारे टाकल्यावर क्षणात झोप विसरून तो सावध व्हावा अगदी तशीच अवस्था मिदवेद ची झाली..!
कुस्तीला प्रारंभ होऊन 20 सेकंद झाली नाहीत तोवर 3 गुण गमावणार मिदवेद खरोखर खजील झाला.
आजवर त्याच्यावर एक गुण घेणे कोणत्याच मल्लाला जमले नाही,तिथे टांगेवर चितपट होता होता वाचलेला मिदवेद पुरता भानावर आला आणि पुढे काय घडले ते केवळ अवर्णनीय...!

सावध मिदवेद ने बचावात्मक पवित्रा घेत गेलेले 3 गुण वसूल केले आणि कुस्तीला 3 मिनिटे उलटून गेली.
डावाला प्रतिडाव,गर्दनखेच,रेटारेटी,प्रेक्षकांचा जल्लोष आणि पत्रकारांची उत्सुकता...!
11 मिनिटे भूतकाळात विरुन गेली आणि अलेक्झांडर मिदवेद गुणांच्या आधारे विजयी ठरला तर मारुती माने रौप्यपदकांचे मानकरी ठरले...!


दमछाक झालेला मिदवेद गर्दीतून वाट काढत बाहेर येताना पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला होता...!
सर्वांच्याकडे पाहत तो एकच वाक्य बोलून गेला..."हा मारुती माने आमच्या युरोपात पाठवा,आमच्या देशातल्या घराघरात याचे फोटो लावून पूजा करतील लोक...माझ्या आयुष्यात याच्यासारखा शक्तिशाली पैलवान मी पाहिला नाही..खरोखर मी त्याला सलाम करतो"

भाऊ 1967 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत खुल्या गटात द्वितीय ठरले ही बातमी वाऱ्याच्या वेगाने भारतात पोहचली,पण त्याही पेक्षा अलेक्झांडर मिदवेद ने त्यांच्या विषयी काढलेले गौरवउदगार भारतातल्या वर्तमानपत्रकांची ब्रेकिंग निव्ज ठरली...!

अशी ही इतिहासाच्या पानात लुप्त झालेली अजरामर लढत आज कुस्ती-मल्लविद्या वाचकांसाठी खुली करत आहे.

यातून नवीन मल्लानी प्रेरणा घ्या,खेड्यात सोयी नाहीत म्हणून कारणे शोधू नका,प्रतिकूल परिस्थितीतच इतिहास घडवण्याची संधी असते,मग जग डोक्यावर घेते..!

धन्यवाद

✍🏻पै.गणेश मानुगडे
कुस्ती- मल्लविद्या
WWw.facebook.com/kustimallavidya

1 Comments

Previous Post Next Post

Contact Form