महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील तुफानी पैलवान माऊली जमदाडे यांच्या जीवनप्रवासाचा मागोवा घेणारा खास लेख : पै.माऊली जमदाडे वाढदिवस विशेष

महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील तुफानी पैलवान माऊली जमदाडे यांच्या जीवनप्रवासाचा मागोवा घेणारा खास लेख : पै.माऊली जमदाडे वाढदिवस विशेष
महाराष्ट्रातील पंढरपूर जिल्ह्यातील चिलाईवाडी नावाचे एक छोटेसे गाव.वडील भास्कर जमदाडे हे शेतकरी व वारकरी परंपरा जपणारे.आपल्या दोन्ही मुलांनी मोठे पैलवान व्हावे म्हणून भास्कररावांनी अतिशय कष्ट उपसले.थोरला मुलगा सागर आणि धाकटा ज्ञानेश्वर.महाराष्ट्रात ज्ञानेश्वर नाव आले की आपसूक मराठी डोक्यात ट्रान्सलेट होऊन माऊली नाव निघते.महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील शिरोमणी, भगवतगीतेसारखे ज्ञान ज्या ज्ञानियाच्या राजाने मराठी मुलखातील मंडळींसाठी मराठीत भाषांतर केले अश्या ज्ञानेश्वर महाराजांना अवघा महाराष्ट्र माऊली म्हणतो. म्हणून ज्ञानेश्वरांचा माऊली झाला.सागर सुद्धा फार मोठा पैलवान बनला.विशेष म्हणजे सागर आणि माऊली दोघेही भाल्यासारखे उंच.कुस्ती जमदाडे घराण्याच्या रक्तात.त्यामुळे लाल मातीशी नाते अगदी बालवयात घडले.
सागर काही कारणास्तव कुस्तीपासून दूर गेला.धाकट्या माऊली ने मात्र कोल्हापुरातील गंगावेश तालीम हेच आपले घर बनवले.वस्ताद विश्वास हारुगले यांच्या कडव्या शिस्तीखाली माऊलीच्या कुस्तीची कारकीर्द बहरू लागली.70-75 किलो वजन असलेला माऊली मैदानात नाचताना पाहून बऱ्याच कुस्ती अभ्यासकांच्या तोंडातून एक शब्द निघत होता.माऊली मोठा पैलवान होणार.
स्पर्धा,कुस्ती मैदाने गाजवत गाजवत व दिसामासाने जोड तोडत माऊली खुल्या गटाचा पैलवान झाला.विद्यापीठाची चॅम्पियनशिप मिळवली. राष्ट्रीय स्पर्धेत विजेता ठरला.कर्नाटकात झालेल्या महान भारत केसरी स्पर्धेचा विजेता ठरला.
महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात मी स्वतः माऊलीची 2015-16 पासून कुस्ती लावतो.जिथे माझ्या हातात मैदान असतील तिथे माऊली ची अनेकदा कुस्ती घेतली.पैश्यासाठी कधीही कुस्ती न मोडणारा पैलवान. पैश्यापेक्षा, नाती,लोकांची मने जपणारा माऊली. स्वभावाने अतिशय विनम्र.तगड्या बुरुजबंद शरीराचा माऊली स्वभावाने इतका विनम्र असेल याची प्रचिती नवख्या लोकांना आश्चर्यचकित करून जाते.माऊलीचा रागीट आणि आक्रमक स्वभाव दिसतो तो फक्त मातीच्या आखाड्यात प्रतिस्पर्धी मल्लाच्या विरुद्ध.तिथे माऊली मागे हटत नाही.माऊलीला समजून सांगितलेले समजते.लाखोंच्या गर्दीत कुस्तीतील दर्दी दिसला की आदराने पायाला स्पर्श करतो.महाराष्ट्राच्या मनातील महाराष्ट्र केसरी ही बिरुदावली त्याला सार्थ ठरते.गुरुंच्या प्रती एकनिष्ठता हर माऊलीच्या स्वभावाचे वैशिष्ट्य. दिल्ली हरियाणातील दिग्गज मल्लाना त्यांच्या भूमीत जाऊन पंचगंगेचे पाणी पाजणार्या माऊलीला अनेक मोठ्या तालमीत बोलावणे आले.पण,ज्या गुरुनी त्याला एवढ्या मोठ्या स्थानावर पोहचवले त्यांना सोडणे माऊलीला शक्य नव्हते.अखंडपणे गंगावेश तालीम आणि विश्वास हारुगले ही दोन कुलदैवत मानून माऊली जगला.फळाची अपेक्षा केली नाही किंबहुना आमिषे त्याला बदलू शकली नाहीत.
माऊलीवर मी अजून खूप लिहू शकतो कारण गेली 8 वर्षे मी त्याला पाहत आलोय.त्याच्या आयुष्यातील अनेक चढउतार पाहिले.त्याच्या अनेक चांगल्या गुणांची कीर्ती अनेकाना सांगू वाटते.
माऊली जमदाडे आजही महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात क्रमांक एकच्या जोडीत लढतो आहे.नित्यनियमाने कुस्ती मेहनत करतो आहे.कुस्ती एक तपश्चर्या आहे.माऊलीने याचे पुरश्चरण केले आहे.लाल माती त्याचे आयुष्य नक्कीच उज्वल करेल यात शंका नाही.
आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला खूप खूप शुभेच्छा. आई जगदंबा उदंड आयुष्य,उत्तम आरोग्य,यश कीर्ती देवो ही प्रार्थना.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ

4 Comments

  1. Happy Birthday pailwan

    ReplyDelete
  2. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पैलवान

    ReplyDelete
  3. माऊली happy birthday

    ReplyDelete
  4. Happy birthday pailwan

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form