रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांच्या संपूर्ण जीवनचरित्राची माहिती : खास लेख

कुस्तीतील सुवर्णयुग हरिश्चंद्र बिराजदार......
तो जन्मलाच पैलवान घराण्यात. पणजोबापासून वडिलांपर्यंत सगळेच पैलवान. आपला मुलगा नामवंत पैलवान बनावा हे माधवराव बिराजदार यांचे स्वप्न. ‘लेकराचे पाय पाळण्यात दिसतात’ म्हटल्याप्रमाणे हरीने बालपणापासूनच कुस्त्या गाजवायला सुरूवात केली. वडिलांनी मुलासाठी सर्वस्व पणाला लावले आणि मुलाने याचे चीज करून दाखवले. गावचा हरी महाराष्ट्र केसरी, रुस्तुम - ए - हिंद, सत्पालला धुळ चाळणारा हिरो ठरला. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारापासून ते ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारापर्यंतचे सर्व पुरस्कार त्याने मिळविले. एवढेच नाही तर आपल्या कारकीर्दीत शेकडो कुस्तीपटू त्यांनी घडविले. त्यांच्या सात शिष्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार लाभले. त्यामुळेच हरिश्चंद्र बिराजदार हे नाव उच्चारले की, महाराष्ट्रातील कुस्तीचे एक सुवर्णयुग आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. 
हरीचा जन्म निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे ५ जून १९५० रोजी झाला. वडील माधवराव बिराजदार हे शेतकरी, अनेक वर्षे गावचे सरपंच. हरी त्यांचा एकुलता एक मुलगा. हरीचे आजोबा विठोबा हे त्याकाळचे नामवंत पैलवान होते. माधवराव हेही चांगले पैलवान होते. बिराजदार कुटुंबाची स्वतःची व्यायामशाळा होती. त्यामुळे बालपणापासूनच हरीने कुस्तीचे धडे घेण्यास सुरूवात केली. शिक्षक होते स्वतः माधवराव. कुस्तीने भारलेल्या वातावरणातच हरीचे बालपण सुरू झाले. अमृता पैलवान नावाच्या त्याच्या चुलत्यांना त्याला पाहता आले नाही. मात्र, त्यांच्या ताकदीचे किस्से तोही ऐकून होता. शेतातून हरभ-याचे भरलेले पोते खांद्यावर टाकून ते हुरडा खात घरी येत. ते बैलगाडीत झोपले की इतरांना उभा टाकायलाही जागा राहत नसे. केवळ ताकदीवरच ते कुस्त्या मारत. असा संपन्न वारसा लाभल्यामुळे हरीला कुस्तीतील प्रावीण्य मिळवायला फारसा वेळ लागला नाही. गावातील शाळेत शिक्षण आणि कुस्ती हे दोन्ही एकाच वेळी चालू होते. पाचवीपासूनच हरीने गावात व परिसरात कुस्त्या खेळायला सुरूवात केली. त्याचा विजय ठरलेला असायचा. महादू बिराजदारचं पोरगं म्हणून त्याचं कौतुक सुरू होतं. यात्रेतील फडात एकाच मैदानावर त्याच्या पाच - पाच कुस्त्या व्हायच्या.
 त्यामुळे सातवीला असेपर्यंतच ‘हरी पैलवान’ ही त्याची ओळख बनली होती. कुस्तीतील पाठ शिकविणारे, तंत्रासोबत बारकावे सांगणारे गुरू त्याचे वडील माधवरावच होते. त्याचा व्यायाम, खुराक याकडेही तेच लक्ष देत. सातवीनंतर ८ वीला लातूरच्या राजस्थान विद्यालयात त्याला प्रवेश देण्यात आला. भाड्याची खोली घेऊन राहणे सुरू झाले. शाळेतील बुवाजी लिमण नावाचे शिक्षक आर्यसमाजच्या व्यायामशाळेत कुस्ती व व्यायाम शिकवायचे. दोन्ही बाबी हरीच्या आवडीच्या होत्या. साहजिकच शाळेत अधून - मधून हजेरी लावत बहुतेक वेळ तो आर्यसमाजमध्ये घालू लागला. जेवायला लिंगायत खानावळ होती. अभ्यासाची चिंता नव्हती. त्याची प्रकृती एकदम सुधारली. दिपवाळीत तो गावाकडे गेला तेव्हा प्रकृती बघून वडील खुश झाले. परंतु याच काळात, आपला मुलगा शाळेत नियमित येत नाही, यापुढे तो गैरहजर राहिल्यास त्याला जपरीक्षेला बसू दिले जाणार नाही, असे पत्र आले. मुख्याध्यापक परिहार कडक शिस्तीचे होते. त्यामुळे आर्यसमाज बंद करून हरीने पूर्णवेळ शाळेत व अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. तो परीक्षेत पास झाला परंतु प्रकृती खालावली. तो गावाकडे गेल्यानंतर वडिलांनी प्रकृती पाहिली आणि त्याची लातूरची शाळा बंद करून नववीला त्याला कासारशिरसीच्या करीबसवेश्वर विद्यालयात प्रवेश देण्यात आला. सकाळची तयारी करून घेऊनच ते हरीला शाळेला पाठवायचे. पहिले सहा महिने सहा किलोमीटर त्याने दररोज पायी ये - जा केली. दिवाळीनंतर त्याला सायकल घेऊन देण्यात आली. दरम्यान, नववीची परीक्षा होण्याच्या आतच माधवरावांनी हरीला कोल्हापूरला पाठविण्याचा निर्णय घेतला. हरीच्या दृष्टीने वडील हे दैवत होते. त्यांचा प्रत्येक निर्णय त्याला मान्य असे. तो कोल्हापूरला गेला. 
हरीच्या एका नव्या आयुष्याची ही सुरूवात होती. तसे पाहिले तर, माधवराव बिराजदार यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. परंतु मुलाला एक नामवंत पैलवान बनवायचे ही त्यांची जिद्द होती. कोल्हापुरात एका खोलीत हाताने स्वयंपाक करून राहणे सुरू झाले. गंगावेस तालमीत मेहनत करणे सुरू झाले. गणपत खेडकर हे अनुभवी पैलवान याच तालमीत येत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेतील कुस्तीची तयारी सुरू झाली. त्या वेळी नववीची परीक्षा देता यावी म्हणून हरीने एक खासगी क्लास लावला होता. या क्लासला जाणेही हरीसाठी त्रासदायक बाब बनली. त्याला एकच पांढरा शर्ट व एकच खाकी पँट होती. ती घालूनच क्लासला जावे लागे. आठवड्यातून एखाद्या - दुस-या वेळी हे कपडे धुवायला वेळ मिळे. क्लासला गेल्यानंतर कपड्यांकडे बघून सर म्हणायचे, पैलवान जरा कपडे धुत चला. यावर मुलं - मुली खदखदून हसायचे. असे वारंवार होऊ लागल्याने हरीने क्लासला जातो म्हणून बागेत जाऊन बसायला सुरू केले. एके दिवशी तालमीतील एका पैलवानाने ते बघितले व गणपत खेडकरांना माहिती दिली. त्या दिवशी नेहमीप्रमाणे हरी बागेतून तालमीत आला तेव्हा गणपतरावांनी त्याला विचारणा केली. त्याने खरी परिस्थिती सांगितल्याने मार वाचला. मात्र, यातून अधिक जवळीक निर्माण झाली. इथे हरीची शाळा संपली ती कायमची. त्यानंतर हरीने आपले संपूर्ण लक्ष कुस्तीवर केंद्रीत केले. १९६५ ते १९६६ अशी दोन वर्षे त्याने महाराष्ट्र चॅम्पियनसाठी विद्यार्थी गटातून लढत दिली परंतु यात त्याला यश मिळाले नाही. १९६७ ला जळगाव जिल्ह्यातील खामगाव येथे झालेल्या राज्य स्पर्धेत विद्यार्थी गटातून हरीने महाराष्ट्र चॅम्पियनशीप मिळविली. या पातळीवरचे हे त्याचे पहिले यश होते. १९६८ अहमदनगर येथे झालेल्या स्पर्धेत ६८ किलोच्या हौशी गटात त्यांनी भाग घेतला. त्यांची अंतिम कुस्ती कोल्हापूरच्या बंडा पाटील या ऑलिम्पिक खेळलेल्या पैलवानासोबत लागली. ही कुस्ती अनिर्णित राहिली. मात्र, कमी वजनामुळे पाटील यांना विजयी घोषित करण्यात आले. याच वर्षी हरियानात रोहटक येथे हिंद केसरी स्पर्धेत हरिश्चंद्र बिराजदार यांनी भाग घेतला. ६८ किलो गटात लष्करातील चाचा पैलवान या अनुभवी कुस्तीपटूबरोबर त्यांची कुस्ती झाली. इथेही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 
२९ नोव्हेंबर १९६९ ला महाराष्ट्र केसरीपदासाठी लातूरला स्पर्धा झाल्या. या स्पर्धेतील संभाव्य विजयी पैलवानांच्या यादीत हरिश्चंद्र बिराजदार यांचे नाव नव्हते. पहिली कुस्ती त्यांनी पुण्याच्या पैलवानाबरोबर सहज मारली. दुसरी कुस्ती गतवर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी परशुराम सागाव याच्याबरोबर झाली. ही कुस्ती जिंकल्यानंतर प्रेक्षकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. तिस-या कुस्तीत सांगलीच्या संभाजी पवार या नामवंत पैलवानाला त्यांनी हरवले. अंतिम फेरीत त्यांची लढत रुस्तुम - ए - हिंद दादू चौगुले यांच्यासोबत झाली. अतिशय प्रतिष्ठेच्या या लढतीत त्यांनी चौगुलेला चीत करून महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. त्या वेळी लातूरमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. संध्याकाळी ७ वाजता निघालेली मिरवणूक पहाटे तीनपर्यंत चालली. त्या वेळी महाराष्ट्र केसरीची गदाही आलेली नव्हती. तात्पुरती लाकडी गदा तयार करून, ती सुशोभित करून मिरवणुकीत ठेवण्यात आली. या विजयामुळे पैलवान म्हणून हरिश्चंद्र बिराजदार हे नाव लोकांपुढे आले. या वेळी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम माकणीकर हे होते. त्यांनी माधवराव बिराजदार यांच्याकडे हरिश्चंद्र यांचा सत्कार आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला. जि. प. मार्फत आर्थिक मदत देण्याचेही त्यांनी ठरवले होते. माधवरावांनी हरीला मदत देण्याऐवजी त्याच्या नावाने गावात व्यायामशाळा बांधा, अशी विनंती केली. माकणीकरांनी त्याप्रमाणे हरिश्चंद्र बिराजदार यांच्या नावाने रामलिंग मुदगड येथे व्यायामशाळा बांधली. 
१९६९ लाच हिंद केसरीच्या खालच्या म्हणजे १९१ पौंडाच्या गटात कानपूर येथे झालेल्या स्पर्धेत भारत केसरी झारखंडेराय यांना हरवून हरिश्चंद्र बिराजदार यांनी ऑल इंडिया चॅम्पियनशीप मिळविली. १९७० ला वल्र्ड चॅम्पियनशीपसाठीच्या भारतीय संघात त्यांची निवड झाली. ८२ किलो गटात एडबंटन येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवला. भारताचा हाच संघ पुढे कॉमनवेल्थ स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्कॉटलँड येथे गेला. एडंबरो शहरात झालेल्या या स्पर्धेत बिराजदार यांनी स्कॉटलँड, इंग्लंड, न्यूझिलँड व कॅनडाच्या पैलवानांना हरवून मध्यम गटात सुवर्णपदक पटकावले. १९७१ ला महाराष्ट्र सरकारने त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले. जुन्या उस्मानाबाद जिल्ह्याचे या पुरस्काराचे ते पहिले मानकरी ठरले. १९७२ ला प. जर्मनीतील म्युनिच ऑलिम्पिकमध्ये ८२ किलो गटात त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. याच वर्षी मे १९७२ मध्ये उत्तरप्रदेशातील बनारस येथे ‘रुस्तुम - ए - हिंद’ साठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. कुठल्याही स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी हरिश्चंद्र वडिलांचा सल्ला घेत. या स्पर्धेची माहिती त्यांनी वडिलांना दिली तेव्हा त्यांनी स्पर्धेत उतरू नको असे सांगितले. त्यामुळे ते निवांत राहिले. चार - पाच दिवस उलटले नाही तोच अचानक माधवराव कोल्हापूरला आले व त्यांनी हरिश्चंद्र यांना बनारसच्या स्पर्धेत भाग घेण्यास सांगितले. त्यामुळे ते स्पर्धेसाठी गेले. या स्पर्धेत लष्करातील कुस्तीपटू नेत्रपालसिंग हे उतरत असल्याचे जाहीर झाल्यामुळे बहुतेक नामवंत खेळाडूंनी यात भाग घेण्याचे टाळले होते. नेत्रपालसिंग भारत केसरी व आशियायी रौप्यपदक विजेता होता. त्याच्या नावाचा मोठा दबदबा होता. हरिश्चंद्र बिराजदार विरूद्ध नेत्रपालसिंग अशी कुस्ती लागली. स्टेडियम खचाखच भरलेले होते. हरिश्चंद्रची बाजू वरचढ होती परंतु अचानक पाऊस सुरू झाल्याने ही कुस्ती पंधरा मिनिटानंतर थांबवावी लागली. संयोजकांनी ही कुस्ती दुस-या दिवशी होईल, असे घोषित केले. दुस-या दिवशी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली. दोघेही पैलवान तुल्यबळ असल्याने काट्यावरची लढत होत होती. क्षणा - क्षणाला कुस्तीचे पारडे कधी या बाजूला तर, कधी त्या बाजूला झुकत होते. दोघेही पैलवान प्रचंड थकले होते. ५० मिनिटे होऊन गेली तरी, निर्णय लागत नव्हता. कमिटीच्या लोकांनी चीत - पट करून कुस्ती निकाली काढण्याचे घोषित केले परंतु प्रेक्षकांनी याला विरोध दर्शविला. त्यामुळे कुस्ती चालूच राहिली. अचानकपणे नेत्रपालसिंग पटात घुसला. पटात घुसलेल्या पैलवानाला पाठीवर पाडायचा हरिश्चंद्र यांचा प्रसिद्ध डाव होता. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी बगलेत हात घालून नेत्रपालसिंगला पाठीवर उताणे पाडले. लोकांनी जल्लोष करून स्टेडियम डोक्यावर घेतले. तेव्हाच दोघांनाही काय झाले ते कळले. ‘रुस्तुम - ए - हिंद’ चा किताब हरिश्चंद्र बिराजदार यांना बहाल झाला. ही मातीवरची कुस्ती होती. मॅटवरच्या कुस्तीतही या दोन पैलवानांनी भाग घेतला होता. दुस-या दिवशीची मॅटवरची ही कुस्ती खेळण्याची बिराजदार यांनी तयारी ठेवली होती. सर्वांचे म्हणणे असे होते की, त्यांनी ही कुस्ती न खेळता निघून जावे. परंतु त्यांच्या मनात जय - पराजयाचा विचार नव्हता. संघाचे प्रशिक्षक रामचंद्र चव्हाण यांनी मॅटवरची कुस्ती खेळू नको, असे सांगितल्याने त्यांनी ही कुस्ती टाळली. रुस्तुम - ए - हिंद मुळे हरिश्चंद बिराजदार यांचे नाव देशपातळीवर पोचले. परंतु याच काळात हरिश्चंद्र बिराजदार यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक बनली होती. जमिनीवर कर्ज काढून - काढून वडील कर्जबाजारी बनले होते. पैसे पाठविण्याजोगी त्यांची परिस्थिती राहिलेली नव्हती. या काळात पुणे भागात होणा-या यात्रातील कुस्त्या खेळण्याचा निर्णय हरिश्चंद्रनी घेतला. दररोज एक यात्रा करायची. तिथली बक्षीसं जिंकायची, हॉटेलमध्ये खायचे व तालमीत झोपायचे. जवळपास दीड महिना त्यांनी या पद्धतीने घालवला. यातून ११ हजार रुपये जमा झाले. परंतु व्यायाम व खाण्यामुळे प्रकृती कमालीची खालावली. याच वर्षी पतियाळात आशियायी चाचणी स्पर्धा होत्या. याची माहिती त्यांना उशिरा कळली. स्पर्धेत उतरण्यासारखी स्थिती नसतानाही ते उतरले. पहिली कुस्ती सतपालच्या आखाड्यातील कृष्णकुमार याच्याबरोबर झाली. ही कुस्ती त्यांनी एका गुणांनी जिंकली. दुसरी कुस्ती नेत्रपालसिंगबरोबर झाली. केवळ प्रकृती खालावल्यामुळे एका गुणाने बिराजदार यांना पराभूत व्हावे लागले. यामुळे आशियायी स्पर्धेत भाग घेण्याची त्यांची संधी हुकली. हा काळ त्यांच्यासाठी अतिशय त्रासाचा होता. १९७५ ला कोल्हापूरला रुस्तुम - ए - भारत स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या वेळी सत्पालच्या नावाची प्रचंड हवा होती. देशभरातील अनेक नामवंत पैलवानांना त्याने हरवले होते. इथे दुस-या गटात हरिश्चंद्र बिराजदार पराभूत झाले. त्यांना चवथा क्रमांक मिळाला. अपेक्षेप्रमाणे सत्पाल इथे रुस्तुम - ए - हिंद ठरला. त्यानंतर कोल्हापुरात कोणीही पैलवान दिसला की, लोक त्याची ‘काय सत्पाल’ म्हणून टिंगल करू लागले. सत्पालला कोणीच पराभूत करू शकत नाही, अशी सर्वांची भावना बनली होती. वर्तमानपत्रांनी तर त्याला अक्षरशः डोक्यावर घेतले होते. 

पैलवान म्हणजे फक्त सत्पालच अशी सर्वांची भावना बनली होती. या काळात पीटर पटेल नावाचा कुस्तीचा ठेकेदार प्रसिद्ध होता. त्याने दारासिंगच्या फ्री स्टाईल कुस्त्या ठेवून त्या यशस्वी केल्या होत्या. सत्पालच्या नावाचा खुप गवगवा झाला म्हणून तिकीट लावून त्याचाही चार ठिकाणी मुकाबला ठेवला होता. चवथा मुकाबला हरिश्चंद्र विरूद्ध सत्पाल असा मुंबईत होणार होता. परंतु पहिले तीनही मुकाबले आर्थिकदृष्ट्या प्रचंड तोट्यात गेल्याने, चवथा सामना त्याने रद्द केला. त्यामुळे लोकांच्या उत्सुकतेचा विषय असलेली ही लढत त्या वर्षी टळली. 
यानंतर १९७६ पासून त्यांना पोटाचा त्रास सुरू झाला. त्यांना प्रचंड वेदना होत. औषध घेतले की, तेवढ्यापुरता त्रास कमी होई. त्रास नेमका कशामुळे होतोय याचे निदानच होत नव्हते. हे वर्ष असेच गेले. ११ जानेवारी १९७७ ला बेळगावच्या एका ठेकेदाराने हरिश्चंद्र बिराजदार विरूद्ध सत्पाल अशी लढत जाहीर केली. सत्पाल त्या वेळी सर्वांना आव्हान देत फिरत होता. त्यामुळे त्याच्यासोबत एक कुस्ती करण्याची त्यांची इच्छा होती. ही संधी चालून आली. या कुस्तीची प्रचंड जाहिरात करण्यात आली होती. लाखो कुस्तीशौकीन देशभरातून बेळगावकडे येत होते. विविध वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. १० जानेवारीच्या केसरीमध्ये ‘महाराष्ट्राचा शेवटचा बुरूज लढतोय’ या मथळ्याखाली सविस्तर इतिहास प्रसिद्ध झाला होता. ११ जानेवारीला ऐतिहासिक लढत सुरू झाली. आक्रमण व चापल्य हे सत्पालचे वैशिष्ट्य होते परंतु कुस्ती सुरू झाल्याबरोबर बिराजदारनी आक्रमण करून त्याला दोरीवर नेले. पट काढूनच सत्पाल विजय मिळवी. त्याने पहिला पट काढला. मोठ्या कष्टाने हरिश्चंद्रनी हा पट काढला. दुस-यांदा त्याने पट टाकला. हा पटही त्यांनी काढला. तिस-यांदा त्याने पट काढल्यानंतर आपला खास डाव टाकून हरिश्चंद्रनी त्याला चीत केले. सत्पाल पाठीवर उताणा पडला. लोकांनी ‘न भूतो न’ असा जल्लोष करीत मैदान डोक्यावर घेतले. त्या वेळी सत्पलाची लोकप्रियता शिखरावर होती. सत्पालला चीत करणारा हरिश्चंद्र अशी भरपूर प्रसिद्धी त्यांना मिळाली. १९७७ नंतर त्यांच्या दुखण्याने खुपच उचल खाल्ली. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यावेळचे क्रीडामंत्री अरूण दिवेकरांना सोबत घेऊन जसलोकला पाठवले. तिथे सर्व तपासण्या झाल्या परंतु निदान होत नव्हते. पुणे, मुंबई, कोल्हापूर, मिरज या ठिकाणच्या अनेक नामवंत डॉक्टरांना त्यांनी दाखवले परंतु नेमके निदान काही झाले नाही. त्यांना वेदना इतक्या प्रचंड व्हायच्या की मृत्यू परवडला असे वाटायचे. त्रास सुरू झाला की, काहीच सुचायचे नाही. दरम्यान, एका डॉक्टरने अ‍ॅपेंडिक्सचे निदान करून ऑपरेशनही केले. परंतु यानंतरही त्रास सुरूच राहिला. कोल्हापूरच्या एका डॉक्टरने किडनीतील खड्यांची शक्यता वर्तविली. या दरम्यान जादू - टोणा, देवाधर्माचे सर्व उपाय केले. शेवटी पुण्यातील के. ई. एम. इस्पितळात डॉ. किपरेकर यांनी किडनीतील खड्यांचे निदान केले. याच अवस्थेत १९८९ ला त्यांचे लग्न झाले. ऑपरेशन करून खडे काढण्यात आले. तेव्हा कुठे त्यांची या वेदनांपासून मुक्तता झाली. ८३ पासूनच या त्रासामुळे कुस्त्या खेळणे बंद झाले होते. आता गरज होती स्थैर्याची. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी खास प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळासमोर ठेवला. ना. विलासराव देशमुख यांच्यासह सर्वांनीच याला मान्यता दिली. १ डिसेंबर १९८४ साली हरिश्चंद्र बिराजदार यांची कुस्ती संघटक म्हणून नेमणूक करण्यात आली. एक वर्ष कांदिवली येथे काढल्यानंतर १९८५ साली त्यांची पुण्याला बदली करण्यात आली. 
पुण्यातील भवानी पेठेतील गोकुळ वस्ताद तालीम मोडकळीला आली होती. पुण्यात आल्यानंतर बिराजदार यांनी या तालिमीचे पुनरूज्जीवन केले. ज्या पैलवानांमध्ये गुणवत्ता आहे, चमक आहे अशा खेळाडूंना प्रशिक्षण सुरू केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत शेकडो पैलवान तयार झाले आहे त्यांचाच शिष्य लातूरचा काका पवार हा अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरला. तर त्याचाच छोटा भाऊ गोविंद पवार याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळून रौप्यपदक प्राप्त केले. रवींद्र पाटील याने आशियायी स्पर्धेत सुवर्णपदक तर राहुल आवारे याने ब्रांझपदक मिळविले आहे. या चार खेळाडूंशिवाय राजेश बारगुजे, राहुल काळभोर, हुसेन वाघमोडे, युवराज वाघ, संजय मगर, अमोल काशीद, रणजित नलावडे हे त्यांचे शिष्य असलेले कुस्तीपटू आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले आहेत. आतापर्यंत त्यांचे पाच शिष्य महाराष्ट्र केसरी विजेते ठरले असून, सात जणांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. किमान २५ खेळाडू हे राष्ट्रीय पातळीवरील विविध पदक विजेते आहेत. १९७१ ला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाल्यानंतर १९९८ ला एक नामवंत गुरू म्हणून त्यांना दादोजी कोंडदेव पुरस्काराने महाराष्ट्र शासनाने सन्मानित केले. आयुष्यभर कुस्तीला वाहून घेतल्याबद्दल २००६ साली केंद्र सरकारने त्यांना ध्यानचंद्र जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार यापूर्वी महाराष्ट्रात फक्त पैलवान मारूती माने यांना मिळालेला आहे. कुस्तीशौकीनांच्या दृष्टीने सत्पालला पराभूत करणे ही सर्वात महत्त्वाची घटना असली तरी, राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणे हा बिराजदार यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे. आपल्या या यशाचे संपूर्ण श्रेय ते वडील माधवराव यांनाच देतात. केवळ त्यांच्यामुळेच आपण एवढे नाव कमवू शकलो हे ते अभिमानाने सांगत असत.

पण अश्या अस्सल कुस्ती भिनलेल्या पैलवानाला काळाने 14 सप्टें 2011 रोजी गाठले ...!!
काय बोलू शब्दच संपले..!!

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
Kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form