हिंदकेसरी,अर्जुनवीर पै.गणपतराव आंदळकर (आबा) यांचे चतुर्थ पुण्यस्मरण : खास लेख

हिंदकेसरी,अर्जुनवीर पै.गणपतराव आंदळकर (आबा) यांचे चतुर्थ पुण्यस्मरण : खास लेख
•••••••••••••••••••••••••••••
शेतकरी कुटुंबात जन्मलेले गणपतराव १९५० मध्ये खास कुस्तीसाठी कोल्हापुरात आले. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरची ओळख कुस्तीपंढरी अशी निर्माण केली होती. देशभरातील मल्ल इथे कुस्तीसाठी येत होते. त्यामुळे जवळच्याच पुनवत गावातील गणपतराव आंदळकरांनीही कोल्हापुरात येणे स्वाभाविक होते.
दरबारातील मल्ल बाबासाहेब वीर (बिरे वस्ताद) हे त्यांना वस्ताद म्हणून लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते कुस्ती करू लागले.
१९६४ साली भारत सरकारने त्यांना "अर्जुन" पुरस्काराने सन्मानित केले होते.
आंदळकरांच्या आबांच्या उमेदीचा काळ हे कुस्तीचे सुवर्णयुग होते. कुस्तीला प्रतिष्ठा होती आणि मल्लांना ग्लॅमर होते. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवले होते.
आंदळकर यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय देदीप्यमान कामगिरी बजावली.
त्यांनी १९६० मध्ये "हिंदकेसरीची"गदा पटकावली.
पाकिस्तानी मल्ल गोगा पंजाबी, सादिक पंजाबी, जिरा पंजाबी, नसिर पंजाबी, दिल्लीचा खडकसिंग पंजाबी, अमृतसरचा बनातसिंग पंजाबी, पतियाळाचा रोहेराम, लिलाराम, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, महंमद हनिफ, श्रीरंग जाधव या नामवंत मल्लाबरोबरीच्या त्यांच्या लढती गाजल्या होत्या. १९६२ मध्ये जकार्ता येथे झालेल्या अशियायी स्पर्धेत त्यांनी सुपर हेवी गटात ग्रीको रोमन स्टाइलमध्ये सुवर्णपदक तर फ्री स्टाइलमध्ये रौप्यपदक पटकावले. १९६४ मध्ये टोकिओ ऑलिपिंकमध्ये हेवी गटात भारतीय कुस्ती संघाचे नेतृत्व आंदळकर यांनी केले. तिथे त्यांनी चौथ्या फेरीपर्यंत धडक मारली होती. 
महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल १९८२ मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने गौरवले आहे. कोणत्याही मल्लाची कारकीर्द खूप कमी असते. उमेदीच्या अल्पशा कालावधीत विजेसारखे चमकून दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहावे लागते. कुस्ती सोडल्यानंतर बहुतेक मल्ल आपल्या पारंपरिक व्यवसायात गुंतून जातात.

पण गणपतराव आंदळकर यांनी मात्र लाल मातीची संगत सोडली नाही. 

१९६७ पासून मोतीबाग तालमीत कुस्ती प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांनी अनेक मल्ल घडवले. त्यात महान भारत केसरी रूस्तम-ए- हिंद दादू चौगुले, महाराष्ट्र केसरी चंबा मुत्नाळ, अॅग्नेल निग्रो, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, संभाजी वरुटे, राष्ट्रकुल सुवर्णपद विजेता रामचंद्र सारंग, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ही मल्लांची नामावलीवरून त्यांच्या वस्तादगिरीची कल्पना येऊ शकते.
 वयाच्या 85 व्या वर्षीही ते पंचक्रोशीतील मैदानात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहत होते.मल्लांचे मनोधैर्य उंचावत होते.
हिंदकेसरी मारुती माने ,हिंदकेसरी दीनानाथ सिंह हे त्यांचे जीवश्य कंठष्य मित्र,जेव्हा मारुती माने यांचे निधन झाले होते,तेव्हा धाय मोकलून मित्रासाठी ते रडले होते.
पिंडादानाच्या दिवशी जोवर आबा आले नव्हते तोपर्यंत कावळ्याने नैवैद्य शिवला नव्हता हे एक आक्रीत घडलं होतं...!
अश्या महान मल्लास 16 सप्टेंबर 2018 रोजी काळाने गाठले.महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमी जनता त्यांच्या आठवणी आजन्म स्मरणात ठेवतील.त्यांच्या स्मृतीस कुस्ती मल्लविद्या महासंघाची भावपूर्ण श्रद्धांजली.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या
Whatsapp 9850902575

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form