एका पैलवानाचा झाला अभिनेता - पै.चंद्रकांत मांढरे शाहूपुरी तालीम कोल्हापूर
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
kustimallavidya.org
शिवतपस्वी चित्रामहर्षी भालजी पेंढारकर हे एक अतिशय हुरहुन्नरी व्यक्तिमत्व. बाबा या टोपण नावाने ते सर्वपरिचित.
बऱ्याच जणांना हे माहीत नसावे की ते पैलवान होते.
कोल्हापुरातील मठ तालमीत ते विद्यार्थी दशेत कुस्ती मेहनत करत असे.
तो काळ स्वातंत्र्याने भरलेला काळ होता.ब्रिटिश सत्ता उलथून टाकून देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते.कोल्हापूर हे जरी ब्रिटिश अधिपत्याखाली असले तरी शाहू महाराजांच्या मजबूत राज्यकरभरामुळे ब्रिटिश सत्तेचे केंद्र बनू शकते नव्हते.पन्हाळगड सोडला तर शासकीय कामे फारशी वेगात नव्हती.
आज पन्हाळगडावर जो डांबरी रस्ता होऊन वाहने वर जातात हा ब्रिटिशांचा उदद्योग होय.
ब्रिटिशांनी पन्हाळगडावरील ऐतिहासिक व प्राचीन तीन दरवाजा जमीनदोस्त करून गडावर शहर वसवले व हळूहळू ते पर्यटन क्षेत्र बनू लागले.
त्याकाळी कोल्हापुरात मल्लविद्येचा व कलेचा सुकाळ होता.
हनुमंत व सरस्वती दोन्हीही कोल्हापुरावर प्रसन्न होती.
भारत स्वतंत्र झाला व भालजी पेंढारकर यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर एखादा चित्रपट काढावा असे मनात येऊ लागले.
शिवराय हे त्यांचे दैवत. दररोज व्यायाम झाला की महाराजांच्या मूर्तीला हार फुल वाहिल्याशिवाय ते दिवसाची सुरुवात करत नसे.
कोल्हापुरात शिवाजी चौकात स्थापन केलेली महाराजांची अश्वारूढ मूर्ती ही सुद्धा भालजी पेंढारकरांनी बसवली आहे.
असे एक शिवकालात रममाण होणारे बाबा जयप्रभा स्टुडियो द्वारे अनेक अनोख्या कलाकृती सादर करत असताना 1948 साली महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीत त्यांचे जयप्रभा स्टुडिओ देखील जळून खाक झाला.
पण खचतील ते बाबा कसले.
समोर शिवरायांचा आदर्श ठेवणारे असे खचून जात नसतात,उलट संकटाला संधी बनवून पुढे चालत राहतात.
हळूहळू त्यांनी जयप्रभा पुन्हा वसवायला सुरवात केली,दरम्यान 1950 साल उजाडले.
ज्या प्रेरणेने त्यांनी स्टुडिओ लाखो रु.खर्चून पुन्हा उभा केला ती प्रेरणा होती छत्रपती शिवराय.
एकदा पन्हाळगडावर ते सहज फिरायला गेले असता त्यांच्या मनात पुन्हा आले की शिवरायांच्या जीवनावर आपण चित्रपट नक्कीच बनवायचा.
झाले..ठरले.. ते कामाला लागले.
चित्रपटाचे कथानक लिहले,गीते,गायक,धाडसी दृश्ये, रसायन प्रयोग सर्वकाही जमले मात्र शिवरायांची भूमिका करणार कोण हा प्रश्न मात्र सुटत सुटेना.
प्रत्यक्ष शिवाजी महाराज साकारणारा कलाकार हा शिवाजी महाराज जगत असला पाहिजे असे त्यांना मनोमन वाटे.
ते स्वतः पैलवान असल्याने त्यांना नेहमी वाटत असे की शिवाजी महाराज सुद्धा पैलवान असले पाहिजेत,नाहीतर अफझल भेटीवेळी घडलेली झटापटी कुस्ती खेळणारा बहाद्दरच करू शकतो.
पण असा पैलवान व अभिनय याची जाण असणारा अभिनेता कुठे शोधावा.
त्यावेळी त्यांचे एक मित्र कोल्हापुरातील जयभवानी शाहूपुरी तालीम या ऐतिहासिक तालमीत सराव करत असे.एकेदिवशी त्यांनी बाबांना तालमीत थंडाई प्यायला ये असे सांगितले.
बाबा नेहमी शाहूपुरीत येत जात असे त्यामुळे बरेच मोठे पैलवान देखील त्यांना पाहताक्षणी वाकून नमस्कार करत असे.
बाबा थंडाई पिऊन त्यांच्या मित्राला आपण बनवत असलेल्या चित्रपटाबद्धल बोलले व म्हणाले
"गड्या..महाराज साकारणारा पैलवानच पाहिजे बघ,त्याशिवाय ती रग,धग नाही जमायची"
त्यावर त्यांचे मित्र म्हणाले तू म्हणतोस तसा एक उपद्व्यापी मनुष्य तालमीत आहे आपल्या..चल तुला दाखवतो....
तेव्हा हौद्यात लढती सुरू होत्या व कोवळा तरुण सामनेवाल्या मल्लाची गर्दनखेच करत होता,अंगावर लाल मातीचा चिखल होता,सरळ सळसळते नाक, उभट रुंद छाती, घट्ट मनगटे, भरीव पट आणि नजरेत जिंकायची उमेद झळकत होती, घामाने चिंब झालेल्या त्या तरुणांकडे पाहत बाबा पाहतच राहिले.... पुढे काही क्षणात त्या तरुणाला सामनेवाल्या मल्लाने अव्वळ मिठी मारली..जणू अफझल खान शिवाजी महाराजांची छाती आवळत आहे..पुढे काही क्षणात त्या तरुणाने बगलेतून मान वर काढत निकाल उचलला आणि प्रतिस्पर्धी मल्लाच्या छातीवर बसला...हे पाहताच बाबांच्या तोंडातून आपसूक शब्द बाहेर पडले...वाह रे..भले शाब्बास....
बाबांच्या मित्राने त्या तरुणाला वर यायला लावले,तो अंगावरची माती पुसत वर आला आणि बाबांच्या पायाला स्पर्श करत उभा राहिला...
बाबा म्हणाले...पोरा,काय नाव तुझे..?
दम खात उभा असलेला तरुण म्हणाला....मी चंद्रकांत मांढरे.
परत बाबांची व चंद्रकांत ची चर्चा सुरू झाली व समजले की चंद्रकांत ने यापूर्वी अनेक नाटके,एकांकिका यामध्ये अभिनय केलेला आहे.
बाबा निहायत खुश झाले व म्हणाले... माझ्या सिनेमात करशील का काम ?
पण,सिनेमा प्रत्यक्ष शिवछत्रपतींचा आहे,चेष्टा नाही...महाराज साकारणारा स्वतः तसे जीवन जगणारा पाहिजे.
यावर चंद्रकांत हसले आणि अभिनय करतो असे पक्के सांगितले.
बाबांना चंद्रकांत च्या डोळ्यात खरोखर शिवराय दिसले.
ज्यावेळी प्रत्यक्ष चित्रपटाचे शूटिंग सुरू असायचे त्यावेळी कोणीही मग तो कॅमेरामन असो किंवा स्पॉटबॉय, मित्र असो किंवा वरिष्ठ कोणीही चंद्रकांत मांढरे यांची चेष्टा मस्करी करायची नाही असा नियम केला गेला.
ते चंद्रकांत मांढरे असले तरी त्यांच्या शरीरावर चौषष्ठ कवड्यांची माळ परिधान केलेले शिवराय होते.त्यांची मस्करी बाबांना नामंजूर होती.
ही शिस्त ते स्वतः पाळत असे,एखादा शॉट झाला की सर्वांनी चंद्रकांत याना मुजरे करायचे हा नियम ठरलेला असायचा.
चंद्रकांत यावर बोलताना म्हणत असे की माझ्या आयुष्यात असा प्रसंग कधीच नव्हता की माझे निर्माते, निर्देशक मला मुजरा करताहेत,खरोखर मी शिवराय जगायला शिकलो.
मला व्यसन लागले नाही,मी खोटे बोलणे सोडले, मी नित्यनियमित कुस्ती मेहनत करू लागलो.
एका पैलवानात शिवराय पाहणारे व त्यांना प्रत्यक्ष महाराजांची वागणूक देणारे चित्रामहर्षी भालजी पेंढारकर यांना गुडघे टेकून वंदन.
लेखन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
kustimallavidya.org