काटे पाटलांच्या "बनश्या"ची हृदयस्पर्शी कथा

काटे पाटलांच्या "बनश्या" अखेरची शर्यत
लेखन
पै.गणेश मानुगडे

पुण्यातील पिंपळे सौदागर गाव.गावाला कुस्तीची,पंढरीच्या वारीची आणि कुस्तीची दैदिप्यमान परंपरा.महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत सुवर्णपान लिहणाऱ्या गावांपैकी या गावाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.
याच गावचे पोलीस पाटील वस्ताद देवरामशेठ काटे पाटील यांना कुस्तीचा आणि जातिवंत बैलांचा सांभाळ करायचा प्रचंड नाद होता.लाल मातीचे उपकार त्यांनी फेडले ते "भारतीय कुस्ती एक परंपरा" हा ग्रंथ लिहून.हा ग्रंथ आजही माझ्या संग्रही आहे.कुस्तीवरील उत्तम संदर्भग्रंथापैकी एक ग्रंथ म्हणजे काटे वस्तादानी लिहलेले हा ग्रंथ.
देवरामशेठ काटे पाटील यांच्या तपस्वी स्वभावाने साक्षात कामधेनू शोभणाऱ्या गाई आणि शंभू महादेवाचा नंदी शोभावेत असे बैल त्यांच्या गोठ्यात असे.त्यांच्यासाठी ही जनावरे नव्हती तर घरची सदस्यच होती.त्यांच्या गोठ्यातील गायीच्या पोटी ऐन दिवाळीच्या वसूबारसाच्या शुभमुहूर्तावर एक वासरु जन्माला आले.त्याच्यात जन्मजात असणारी चपळता वस्ताद देवरामजी काटे पाटील यांनी ओळखली.त्याला शर्यतीला तयार करायचा संकल्प त्यांनी केला.
रोज त्याला खुराक,मालीश आणि शर्यतीचा सराव सुरू केला.
याकामी त्यांचे बंधू गुलाबराव आणि भगवानराव आणि मुले  भानुदास व शंकर यांनी त्यांना मोलाची मदत केली.अख्खे घराणे त्याला शर्यतीसाठी तयार करू लागले.त्याचे "बनश्या" हे नाव ठेवण्यात आले.बनश्याला समजत होते आपला धनी आपल्यासाठी किती कष्ट उपसत आहे,किती माया लावत आहे.त्याला समजत होते मात्र त्याला बोलता येत नव्हते.त्याच्या डोळ्यात येणारे अश्रू मात्र सगळे काही सांगत होते.
दिसामासाने बनश्या वाऱ्यासारखे धावू लागला.पुण्यातील घाट गाजवू लागला.धनुष्यातून बाण सुटावा असा त्याचा वेग.शहाणा तर इतका की कधी चाबूक काढायची गरज नाही.आपल्या धन्याची मान कायम अभिमानाने ताठ रहावी यासाठी बनश्या जीवतोडून धावायचा आणि विजयाचा झेंडा मिरवायचा.बनश्याने धन्याला कधी खाली बघू दिले नाहीच पण लोकांची पण मने जिंकली.शर्यतीवेळी बनश्याचे नाव पुकारले की लोक इतरत्र विखुरली असली तरी धावत शर्यत बघायची आणि बनश्याच्या विजयी दौडीच्या आनंदात बेभान होऊन जायची.
बनश्याने अनेक बक्षिसे जिंकली.सायकल,फॅन,मोटारसायकल,सोने,नाणे, रोख रक्कम सर्व काही.देवरामाजी काटे पाटील यांच्या बनश्याने अवघा महाराष्ट्र गाजवला.
आयुष्य तपोनिष्ठ जगून,आपली कर्तव्ये पूर्ण करून दिनांक 6 जुलै 2007 रोजी वस्ताद देवरामजी काटे यांनी इहलोकाची यात्रा संपवली. आपला धनी आपल्याला सोडून गेला याची जाणीव बनश्याला जेव्हा झाली तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते.त्याने वैरणपाणी सोडले होते.पण घरच्या मंडळींच्या प्रेमापोटी बनश्या सावरला.माणूस माणसाला जीव लावणार नाही इतका त्याने मालकाला लावला होता.
जीवनात भावनेपेक्षा कर्तव्ये मोठी असतात.देवराम काटे यांचे जाणे अवघ्या महाराष्ट्राला चटका लावून गेले.पण ज्या ध्येयासाठी मालकाने आपल्याला तयार केले याची जाणीव त्या मुक्या जनावराच्या मनात होती.दुःख विसरुन बनश्याची  दौड कायम राखली.महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यतीत "हिंदकेसरी" किताब त्याने जिंकला. काटे पाटील घराण्याचे आणि पिंपळे सौदागर घराण्याचे नाव त्यांनी महाराष्ट्रभर उज्वल केले.
बनश्यामुळे आजमितीला हजारो वासरे,बैल शर्यतीला तयार झाले.बनश्यासोबत जुंपून त्यांची सुद्धा तयारी झाली.
बनश्याने काटे पाटील घराण्याच्या अखंड चार पिढ्या डोळ्यांनी पाहिल्या.
कै. पै.वस्ताद देवरामजी काटे, त्यांचे बंधू गुलाब आणि भगवान,मुले भानुदास व शंकर, नातू कमलेश,श्रीपाद व स्वराज्य आणि पणतू श्लोक.
आपले आयुष्य काटे पाटील घराण्यात घालवलेला बनश्या हा घरचा अविभाज्य घटक होता.बनश्या वयाने वृद्ध झाला.त्याचे दात पडले त्यावेळी घरच्या मंडळींनी त्याला बिट,गाजर यांचा किस करुन खायला घातले.त्याला बसायला 3 प्रकारची माती टाकून जागा केली.रोज अंघोळ झाल्यानंतर घरची सर्व मंडळी त्याचे दर्शन घेऊनच पुढच्या कामाला निघून जात असे.
दिनांक 15 सप्टेंबर 2022.वस्ताद देवरामजी काटे यांचे तिथीनुसार पुण्यस्मरण श्राद्ध.याच दिवशी बनश्याने सुद्धा आपला प्राण सोडला हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.आपल्या महादेवाला भेटायला त्याचा आवडता नंदी कायमचा निघून गेला.काटे पाटील कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला.आपल्या घरचा माणूस गेल्यावर जो विधी केला जातो तो सर्व विधी त्यांनी बनश्यासाठी केला.बुधवार 21 सप्टेंबर 2022 रोजी त्याचा दशक्रिया विधी होणार.बनश्याने सतत 25 वर्षे गावच्या पोळ्याचा मान मिळवला.पुढच्या पोळ्याला झुल घातलेला, सजलेला गावाचा लाडका बनश्या नसणार. असणार केवळ त्याच्या आयुष्यात मिळवलेल्या ढाली, किताब आणि सन्मान....

चटका लावून गेला मनाला "बनश्या" काटे पाटलांचा,
विरहाने त्याच्या बांध फुटला उरात साठलेल्या अश्रूंचा,

लेखन
पै.गणेश मानुगडे
kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form