दसऱ्याच्या मुहुर्तावर राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या मोतीबाग तालमीच्या स्थापनेला 127 वर्षे पुर्ण
राजर्षी शाहू महाराज 1894 साली गादीवर बसल्यानंतर करवीर संस्थानची सूत्रे त्यांच्या हाती आली.
याच वर्षी शाहू महाराजांनी मंगळवार पेठेतील खरे कॉर्नरजवळील श्रीशिवाजी थिएटर जागेवर पहिले कुस्ती मैदान भरवले.याकाळात पैलवान पोरांना बक्षीस म्हणून फेटा आणि नारळ देत असे,महाराजांनी ही पद्धत बदलली आणि नारळ,फेट्या सोबत रोख रक्कम बक्षीस देणे सुरू केले.याचबरोबर पराभूत मल्लाना एकूण बक्षिसाच्या रकमेपैकी चौथाई देण्याची पद्धत सुद्धा सुरू केली त्यामुळे कुस्ती क्षेत्रात एक जान आली.त्यानंतर अवघ्या एकाच वर्षात म्हणजे 1895 साली दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या राजवाड्यातच त्यांनी "मोतीबाग" तालमीची स्थापना केली.स्थापनेदिवशीच बाहेर फलक लावला की
"पहिली शरीर संपत्ती,दुसरी पुत्र संपत्ती व तिसरी धन संपत्ती असेल तोच श्रेष्ठ पुण्यवान"
आज या घटनेला 127 वर्षे पूर्ण झाली.महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर कुस्तीचे महत्व समजून घेऊन त्यासाठी व्यापक योजना राबवणारा एकमेव राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज. स्वतःच्या राजघराण्याच्या अखत्यारीत असलेल्या बागेत कुस्तीसाठी तालीम बांधणे ही कल्पनाच अंगावर शहारे आणणारी आहे.याच तालीम त्यानंतर अनेक दिग्गज मल्लांच्या पिढ्या घडल्या ज्याचा ओघ आजपावेतो सुरू आहेत.
महाराजांनी गावागावात होणाऱ्या ग्रामदेवतांच्या यात्रेत कुस्त्यांचा फड सुरू केला,कुस्ती जिंकणाऱ्या श्रेष्ठ मल्लास गदा देण्याची प्रथा सुरू केली,पराभूत मल्लास चौथाई सुरू केली,पदरी असणाऱ्या मल्लास संस्थानातून खुराक देणे,पैलवान निवृत्त झाल्यावर त्याला "हजारी फंड" योजना सुरू करणे असे एक ना अनेक उपक्रम राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केले.
श्रीकृष्णानंतर खास कुस्तीचे मैदान कोणी बांधले असेल तर ते कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनी खासबाग कुस्ती मैदानाच्या रूपाने बांधले.
आज दसऱ्याच्या शुभदिनी कुस्तीतील या भव्य घटनेला उजाळा.
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
Kustimallavidya.com