किस्सा गुरुशिष्याच्या अनोख्या नात्याचा

किस्सा गुरुशिष्याच्या अनोख्या नात्याचा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
लेखन,शब्दांकन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
www.facebook.com/kustimallavidya
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
इ.स.1963-64 

श्रीशाहू विजय गंगावेस तालीम कोल्हापूर म्हणजे हिंदुस्थानातील दिग्गज मल्लांची खाणच.याच तालमीने आजवर देशाला अनेक तुफानी मल्ल दिले.
दोन वर्षांपूर्वी म्हणजे 1962-63 या सलग दोन वर्षी डबल "महाराष्ट्र केसरी"बनून "पहिले डबल महाराष्ट्र केसरी" बनून इतिहास रचला असे पै.गणपतराव खेडकर हे याच तालमीतील मल्ल.
गंगावेस मध्ये मल्लांचे गोकुळ भरल्याने महाराष्ट्र नव्हे तर देशातून मल्लांचे पाय या तालमीकडे लागत असे.

याच दरम्यान खाकी चड्डी व पांढरा शर्ट घालून डोक्यावर पत्र्याची पेटी घेतलेला एक पोरगासावळा मुलगा आपल्या वडिलांच्या समवेत "गंगावेस" तालमीबाहेर उभा राहीला.
शरीर मेहनतीचे दिसत होते,पण चेहरा अगदीच नरम दिसत होता,कोल्हापूर प्रथमच बघत असल्याची भावना चेहऱ्या वर स्पष्ट दिसत होती.
वस्ताद गणपतराव खेडकर स्वतः त्यावेळी आखाड्यात लढत करत होते.लढत आवरली व दम खायला बाहेर आले आणि त्या दोघांना पाहून  विचारले.....कुठंन आलाय पाव्हन..?

त्या मुलाच्या वडीलांनी हात जोडत रामराम घातला आणि ओळख सांगितली.
मी माधवराव बिराजदार,लातूर जिल्ह्यातील रामलिंग मुदगड चा.हा माझा मुलगा हरी.याला इथे ठेवायला आलोय.

बरं बरं.. मोठा श्वास घेऊन खेडकर उत्तरले.....या आत,बसा....

दोघेही आत गेले.आखाड्यात लढती बघून हरी पूर्ण बावरून गेला होता.एक एक धिप्पाड देह एकमेकाला भिडत होते.कानावर बसणारे ठोके,शड्डू चा घुनत्कार,बाजूला व्यायाम करणारे पैलवान,दोर चढणारे पैलवान आणि मगाशी जे बाहेर आले ते हातात काठी घेऊन सर्वांवर वचक ठेवत होते.
मोकळ्या भिंतीवर त्या तालमीतल्या मोठ्या पैलवानांचे फोटो,गदा अडकवलेले दिसत होते.
लढती संपल्या व खेडकर यांनी माधवराव बिराजदार यांचा पाहुणचार केला व तालमीचे नियम सांगितले.पोराकडे बघितले आणि विचारले...नाव काय रे तुझं ?
मी हरिश्चंद्र माधवराव बिराजदार...!
बरं शाळेला हायस का सोडलीस ?
नाही हाय की......8 वी पास आहे,9 वी ला गेलो आहे.

बरं बरं.. कुस्ती बरोबर शाळा शिकली पाहिजे बाबा....!

चालेल वस्ताद,तुम्ही या,पोराला राहूदे इथं....बघतो आम्ही.

लातूरचे जुने मल्ल माधवराव बिराजदार आपल्या मुलाला हरिशचंद्र बिराजदार याला मोठा पैलवान करायचे म्हणून कोल्हापूर ला गंगावेस तालमीत वस्ताद डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर यांचेकडे सुपूर्द केले.माधवरावांची घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती,पण पोराने मोठे पैलवान व्हावे यासाठी परिस्थिती नसताना इतक्या दूर आणले होते.

हरी चा सराव सुरु झाला.एक खोली घेऊन त्यात हाताने स्वयंपाक करणे,कुस्ती मेहनत करणे सुरू झाले.

हरी ने 9 वी ची परीक्षा देता यावी कोल्हापुरात एक खासगी क्लास लावला.
पण,तालमीतल्या 3 वेळेचा सराव, जेवण या अतिशय व्यस्त दिनचर्येमुळे हरीला वेळ अपुरा मिळू लागला.

एकच पांढरा शर्ट व चड्डी....तीच तीच रोज घालून झिजून फाटू लागली.

एक दिवस क्लास मध्ये,सर म्हणाले पैलवान जरा कपडे धूत चला....आणि मग सारेच हसू लागले.
हरी ला तो अपमान वाटू लागला व क्लास च्या वेळी रंकाळा तलावशेजारी बसून अभ्यास करणे सुरू केले.
एक दिवस एका ओळखीच्या माणसाने ते पाहीले आणि सरळ जाऊन गणपतराव खेडकर अण्णा यांना सांगितले...!

दुपार होती आणि खेडकर अण्णा यांनी खरंच हरी क्लास ला जातो म्हणून येतो आणि रंकाळ्यावर येऊन बसतो हे पाहिले..

त्याच संध्याकाळी हरी ची लढत जोरात घेतली.
नेहमी पेक्षा चांगली तासभर लढत ज्यादा झाली,दम खूप लागला आणि हातापायांची अवसान गळू लागले..मग लहान पोर सुद्धा पट काढून टाकू लागली.

खेडकर अण्णा हातात काठी घेऊन शिव्या देऊ लागले आणि उतान्या पडलेल्या हरीच्या पाठीवर काठी ओढत बोलले...

क्लास च्या नावानं बोंबलत हिंड रंकाळ्यावर..मग पैलवान होशील.....बापानं एवढ्या लांब सोडले ते याच साठी...चल उठ आणि बाहेर हो....

हरी उठला,डोळ्यातील पाणी थांबत नव्हते,मार पाठीला लागला नव्हता,मनाला लागला होता...

गुमान बाहेर आले,आणि बाहेर झाडाला धरून हुंदके देऊन देऊन रडू लागले.

खेडकर अण्णा बाहेर आले....बघतो तर हरी ला खूपच वाईट वाटलेले दिसते म्हणून जवळ आहे..

आपुलकीने पाठीवर हात ठेवत बोलले......
हरी,तू सुधारावेस म्हणून मारलं तुला.
क्लास साठी जाऊन रंकाळ्यावर बसतोस हे शोभत नाही पैलवानांना.....गंगावेस तालीम म्हणजे कोल्हापूर चे नाक आहे,कोणी बोट ठेवायला नको आपल्याकडे....जा तू...रडू नकोस.
उद्यापासून सरळ क्लास ला जात जा....!

पण,हरी चे हुंदके काही थांबत नव्हते....
थोड्या वेळाने तो बोलू लागला

अण्णा,मी तर कुठे करमणूक करायला इकडे आलोय..मला पण वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे...पण घरची आर्थिक बाजू कमी असताना देखील त्यांनी मला इथं ठेवले.....अण्णा कपडे धुवायला वेळ नसतो सराव संपला की.... एकच शर्ट,चड्डी आहे...त्यामुळे वर्गात चेष्टा होते..मला नाही बरोबर वाटत ते..म्हणून मी रंकाळ्यावर शांत अभ्यास करतो एकटाच....असे म्हणत तो पुन्हा जोर जोराने हुंदके देऊ लागला.

खेडकर अण्णांच्या डोळ्यांच्या कडा टचकन ओल्या झाल्या......पहाडा सारखा धिप्पाड गडी,पण एका पोराचे अश्रू पाहून पघळाला....काय नाते असेल दोघांचे देव जाणे.....पण अण्णांचे डोळे पाणावले..!

दुसरा दिवस उजाडला.
सकाळी सकाळी अण्णा आवरून कुठे तरी गेले होते आणि पोरांचे व्यायाम संपायला तालमीत आले.
सोबत एक पिशवी होती.

तालमीतल्या पोरांना विचारले...अरे हरी कुठे आहे ?

पोर म्हणाली खोलीत स्वयंपाक करत असेल....अण्णा त्याच्या खोलीकडे गेले.

स्टोव्ह वर भाजी शिजत होती,लंगोट्यावर उघडा बसलेला हरी समोर पुस्तक धरून वाचत होता आणी अण्णा आत आले...

त्यांना पाहताच हरी उठला....अण्णा बोलले...

अरे हरी....हे शर्ट चड्डी बघ रे बसते कास तुला.....नसलं तर बदलून आणायला पाहिजे.....

हरीच्या काळजाचा ठाव सुटला,डोळे पाणावले.......पिशवी हातात घेऊन त्यात शर्ट चड्डी व एक शर्ट फुल पॅन्ट होती ती घातली....!

माप बरोबर बसले.......खेडकर अण्णा बोलले....हरी..तुला काय बी कमी पडू दे....मालास मागायचा....तू उगाच अबोल राहतोस,कोणाशी बोलत नाहीस...अरे मनातलं दुःख सांगितलं तर समजेल ना.....

अण्णा.......एक आर्ट आवाज करत हरी ने अण्णांना कडकडून मिठी मारली......खेडेकर अण्णा पण हिरमसून रडू लागले.....

तो दिवस अण्णा व हरी च्यातील नाते दृढ करणारा ठरला....

खेडकर अण्णांच्या मार्गदर्शनाने हरी चा हरिश्चंद्र बिराजदार झाला....महाराष्ट्र चॅम्पियन,महाराष्ट्र केसरी.........सतपाल सारख्या परकीय वादळाला चारी मुंड्या चित करणारा हिरो.....इतकेच नव्हे तर राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून एक आंतरराष्ट्रीय मल्ल घडून दाखवले....कुस्ती क्षेत्रातील सर्वात मानाची "रुस्तुम ए हिंद 'किताब", लढत जिंकून भारतातील सर्वश्रेष्ठ मल्ल बनले.

पण ते गुरु शिष्याचे नाते तसु भर कमी नव्हते.

मामांनी पुण्याच्या गोकुळ वस्ताद मध्ये एक एक "हरी" चे लाल पैलवान घडवले....मामांचा धाक इतका की पैलवान पोर साधी समोर उभा राहत नसायची...पण कधी कधी खेडकर अण्णा पुण्यात आले की हक्काने गोकुळ वस्ताद मध्ये जात असे.......तेव्हा साऱ्या पैलवान पोरांना ज्या मामांची भीती असायची..तेच मामा खेडकर अण्णांच्या पाहूनचारासाठी पळताना दिसायचे..आणि अण्णा निवांत बसून हरी हे आन रे...हरी ते आण रे.....आणी मामा लगेच म्हणायचे....अण्णा लगेच आणतो.

साऱ्यांना नवल वाटायचे त्याचे...!

पण ते गुरु-शिष्यांचे अबोल,अतूट असे नारते केवळ दोघांनाच माहिती होते किती घट्ट होते ते.

ज्यावेळी मामांचे आकस्मित निधन झाले तेव्हा खेडेकर अण्णा थरथरत्या हाताने चितेजवळ रडत होते.......हरी अगोदर देवाने मला का नाही न्यावे....!

इतिहास मुका आहे या साऱ्यांचे वर्णन करायला.
वरवर कणखर,राकट दिसणारा कुस्ती खेळ इतकी नाजूक व काळजाला घरे पाडणारी नाती देखील निर्माण करून जातो.
हे केवळ कुस्ती क्षेत्रातच घडू शकते.....असे अनंत अवलीये या तांबड्या मातीत घडले गेले ज्यांनी दैदिप्यमान कुस्ती इतिहास निर्माण केला,मात्र कधीही न विसरला जाणारा आठवणींचा स्मृतिगंध मात्र शिल्लक ठेवला गेला..!

रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार.....मामांच्या एक एक आठवणी मेल्या मुडद्याला नवीन प्राण देणाऱ्या आहेत....त्यांचा आदर्श समोर ठेवणारे आयुष्यात कधीच हार मानणारे नाहीत हे छाती ठोक पणे सांगू शकतो.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
www.facebook.com/kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form