मुलायम सिंग यादव यांचा कुस्ती ते राजकारण प्रवास कसा झाला हे जाणून घ्या : मुलायम सिंग यादव - एक तुफानी पैलवान ते मुरब्बी राजकारणी : खास लेख

मुलायम सिंग यादव - एक तुफानी पैलवान ते मुरब्बी राजकारणी : खास लेख

उत्तर प्रदेश चे 3 वेळा मुख्यमंत्री असणारे,देशाचे रक्षा मंत्री असणारे मुलायम सिंग यादव यांचे नुकतेच निधन झाले.त्यांच्या निधनानंतर देशात 3 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला.वयाच्या 82 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.दीर्घायुष्य लाभलेले मुलायम सिंग हे मुरब्बी राजकारणी होते हे सर्वांना माहिती आहे मात्र त्यापूर्वी ते एक तुफानी पैलवान होते.
मुलायम सिंग यादव राजकारण यायला सुद्धा त्यांची कुस्ती कारणीभूत आहे.हिंदकेसरी मारुती माने जसे कुस्तीमुळे राजकारणाचे आखाडे गाजवू लागले होते अगदी त्याच काळात मुलायम सिंग यादव सुद्धा सर्वप्रथम राजकारणात आले ते एका कुस्ती मैदानात.

1965 साली जनपथ इटावा नगला नगर या उत्तर प्रदेशातील एका शहरात मोठी कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली होती.या मैदानात मुलायम सिंग यादव एक पैलवान म्हणून कुस्ती लढायला आले होते.त्या मैदानाचे प्रमुख पाहुणे होते त्याकाळचे थोर राजकारणी नथ्थू सिंग यादव.राजकारणात त्यांची पकड मजबूत होती आणि ते स्वतः कुस्तीप्रेमी होते.शेवटची कुस्ती मुलायम सिंग यादव यांची होती आणि प्रतिस्पर्धी त्यांच्यापेक्षा ताकदीने वरचढ होता.या कुस्तीत मुलायम सिंग यादव यांनी आपल्या परफेक्ट असणाऱ्या "चरखा" ज्याला मराठीत हरणफास म्हणतात या डावावर प्रतिस्पर्धी मल्लावर विजय मिळवत त्याच्या छातीवर बसले.
उपस्थित असणाऱ्या नथ्थू यादव यांनी मुलायम सिंग यांच्यावर असलेले लोकांचे प्रेम आणि लढण्याची ढब बघून त्यांना दुसऱ्या दिवशी आपल्यासोबत एका कार्यक्रमाला नेले.जनसभेत त्यांनी भाषण सुद्धा उत्कृष्ट केले.एक पैलवान असूनही इतके चांगले बोलतो हे पाहून नथ्थू सिंग यांनी मुलायम सिंग यांना राजकारणात आणले आणि त्यानंतर मुलायम सिंग यादव यांनी मागे वळून पहिलेच नाही.समाजवादी पार्टी कडून ते निवडणूक जिंकत राहिले आणि देशाचे मोठे नेते बनले.लोक त्यांना "नेताजी" नावाने संबोधित असत.एका ठिकाणी त्यांनी आपण राजकारणात कसे आलो हे सांगताना आपल्या कुस्तीचा किस्सा सांगितला त्यावेळी आपण केलेला चरखा डाव दाखवण्याची विनंती उपस्थित कार्यकर्त्यांनी केली त्यावेळी त्यांना हा डाव दाखवला त्याचा विडिओ खाली देत आहे.



पैलवानांच्यात नेतृत्वगुण असतो.त्यानंतर अनेक राज्यात पैलवान राज्यकर्ते झाले आहेत.महाराष्ट्रात तर कुस्ती व राजकारण हे घनिष्ठ समीकरण आहे.आपल्या सर्वांसाठी मुलायम सिंग यादव यांचा किस्सा आज या लेखाद्वारे देत आहे.
मुलायम सिंग यांच्या स्मृतीस कुस्ती मल्लविद्या महासंघाची भावपूर्ण आदरांजली.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
 Kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form