शिवछत्रपती पुरस्कार विजेते,वसंतदादा कुस्ती केंद्र सांगलीचे संस्थापक कै.पै.प्रा.राम नलवडे मामा यांची आज प्रथम पुण्यतिथी : विशेष लेख

शिवछत्रपती पुरस्कार विजेते,वसंतदादा कुस्ती केंद्र सांगलीचे संस्थापक कै.पै.प्रा.राम नलवडे मामा यांची आज प्रथम पुण्यतिथी : विशेष लेख

शिवछत्रपती पुरस्कार विजेते,राज्य कुस्तीगीर परिषदेचे स्थापनेपासून चे सहकारी,सांगली जिल्हा तालीम संघाचे माजी अध्यक्ष,बीपीएड कॉलेज चे प्राचार्य,वसंतदादा कुस्ती केंद्र सांगलीचे संस्थापक अश्या एक ना अनेक बिरुदावल्या ज्यांच्यासाठी लावल्या जातात असे रामचंद्र नलवडे मामा यांचे गतवर्षी 15 ऑक्टोबर 2021 रोजी निधन झाले.वयाच्या 98व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
बालपण

स्वातंत्र्यापूर्वी जन्म झालेले रामचंद्र नलवडे हे सांगली जिल्हा आणि तासगाव तालुक्यातील वायफळे गावचे सुपुत्र.आपल्या वडिलांचे आणि आईचे छत्र अगदी लहानपणी हरपले.सख्खे असे कोणी नव्हती फक्त बहीण सोडून.तासगाव तालुका त्याकाळी आत्तासारखी बागायती नव्हता.त्यामुळे शेती करुन स्वतःचे नशीब आजमावणे ही मोठे आव्हानच होते. काहीही करुन शिकायचे आणि मोठे व्हायचे हे स्वप्न उराशी बाळगून रामचंद्र नलवडे मामांची लहान पावले सांगलीकडे वळाली. कोवळ्या वयात मिळेल ते काम करुन जगायचे ही जिद्द.मग कधी मार्केट यार्डात हमाली करायची तर कधी भाजी विकून उदरनिर्वाह करायचा.तो काळ मात्र सांगली जिल्ह्याच्या कुस्तीचा सुवर्णकाळ होता.सांगलीतील हांडे पाटील,आद्य बजरंग, भोसले व्यायामशाळा आणि सरकारी तालमीत त्याकाळचे भारतातील क्रमांक एकचे मल्ल सराव करायचे.मामांच्या कुस्तीचा श्रीगणेशा झाला तो सरकारी तालमीत.
शिक्षणाची व कुस्तीची सांगड

दिवसभर काम,संध्याकाळी कुस्ती यात दिवस जाऊ लागले.मात्र शिक्षणाची हौस कमी होत नव्हती.वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी पहिलीत प्रवेश घेतला.शाळेत प्रवेश तर मिळाला मात्र सगळी लहान मुले आणि मामा तेवढे मोठे.शिकायची जिद्द आणि कष्ट उपसायची तयारी पाहून काही जाणकार शिक्षकांनी त्यांना पुढच्या वर्गात बसायची परवानगी दिली.कुस्ती आणि शिक्षण सोबत काबाडकष्ट सातत्याने करत रामचंद्र नलवडे मोठे होत गेले आणि त्याकाळच्या कुस्ती क्षेत्रात मोठे नाव कमावले.अनेक थिएटर कुस्त्या,खुल्या कुस्त्यांना आमंत्रण मिळू लागले.त्याकाळी महाराष्ट्र केसरी,हिंदकेसरी सारख्या कुस्त्या  सुरू देखील झाल्या नव्हत्या.त्याकाळी अश्या स्पर्धा असत्या तर नक्कीच त्यात कित्येकदा यश मिळवायची धमक रामचंद्र नलवडे यांच्यात होती.
कुस्ती निवृत्ती ते कुस्ती प्रशिक्षक

साधारण 1957-58 च्या सुमारास रामचंद्र नलवडे यांनी कुस्ती निवृत्ती घेतली.नेमका तोच काळ सरकारी तालमीचे पैलवान मारुती माने यांच्या आगमनाचा होता.कवठेपिराण गावचे सुपुत्र मारुती माने हे नाव त्याकाळी मैदानी कुस्तीत थैमान घालु लागले होते.
रामचंद्र नलवडे एम.ए.बी.पी.एड. झाले.अनेक ठिकाणी शिक्षकी नोकरी केली.बॅरिस्टर पी.बी.पाटील यांच्या अखत्यारीत त्यांनी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून सुद्धा यशस्वी कार्य केले.
1952 साली जसे खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिक।पदक आणले तसे आधुनिक कुस्ती महाराष्ट्रात रुजू लागली होती.खाशाबा जाधव आणि रामचंद्र नलवडे यांच्यासह अनेकांनी NIS डिप्लोमा पतियाळा येथे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केला.महाराष्ट्रात ऑलिम्पिक स्तरावर लढणारे मल्ल घडावेत ही महत्वकांक्षा मनात ठेवून त्यांनी आधुनिक कुस्ती आत्मसात केली.

सामाजिक चळवळीत योगदान
सांगली जिल्ह्यात त्यावेळी वसंतदादा पाटील यांच्यासारखे नेतृत्व उभारी घेत होते.त्यांच्या चळवळीच्या काळात रामचंद्र नलवडे मामा सुद्धा खांद्याला खांदा लावून सक्रिय राहिले.वसंतदादा व राम मामा यांचा घरोबा मोठा विलक्षण होता.अगदी सर्वांच्या सुखदुःखात ते हिरीरीने भाग घ्यायचे.रामचंद्र नलवडे यांची राहणी अतिशय साधी.कुस्ती खेळताना नेहमी डोक्याला टक्कल असायचे.मात्र, ज्यावेळी मॅट कुस्ती प्रशिक्षण घेण्यासाठी ते पतियाळा येथे गेले त्यावेळी मात्र शिक्षकांच्या सांगण्यावरून थोडे केस ठेवायला प्रारंभ केला.वसंतदादांच्या व सहकाऱ्यांच्या सोबत सांगली पंचक्रोशीत सामाजिक कार्याचा डोंगर त्यांनी निर्माण केला.

वसंतदादा कुस्ती केंद्र

त्यावेळी दादा राजकारण यशस्वी होत होते.वसंतदादा सहकारी साखर कारखाना आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना बनत होता.मात्र,ज्या कुस्तीच्या जीवावर दादा मोठे झाले त्याची त्यांना जाणीव होत असायची. त्यांनी कारखान्यात मोठा लाल मातीचा हौदा,पाण्याची सोय करून तालीम उभी केली.त्यात खेळणाऱ्या कुस्तीगीराना मानधन सुरू केले.मात्र,रामचंद्र नलवडे यांना स्वतंत्र कुस्ती संकुल निर्माण करायची महत्वकांक्षा होती.आधुनिक कुस्तीवर त्यांचा भर होता म्हणून साखर कारखान्याच्या नजीक यशवंतनगर परिसरात त्यांनी मोठी जागा घेतली.तिथे संकुल उभे करायची महत्वकांक्षा पुढे पूर्ण होऊन वसंतदादा कुस्ती केंद्र स्थापन झाले.

संसाराच्या बोहल्यावर

आपल्यासारख्याना कोण मुलगी देणार.आपण गाव सोडून सांगलीत आलोय आणि स्वतःचे घर सुद्धा नाही.मनात अतिशय न्यूनगंड होता मात्र खरे पाहता त्याकाळी रामचंद्र नलवडे सारखे उच्चविद्याविभूषित मल्ल क्वचितच होते.वसंतदादा सारखे सहकारी होते ज्यांनी अखेर हा मुद्दा पुढे आणला.
मूळ गाव पाटगाव सोनी चे मात्र सांगलीत पटवर्धन सरकार यांच्या पदरी पोलीस असणारे दत्तात्रय जाधव यांची कन्या सुलोचना ज्या त्याकाळी एस.एस.सी.एस.टी.ई पदवीधर होत्या यांच्याशी त्यांचा विवाह जुळला.लग्नानंतर त्यांचे नाव जानकी करण्यात आले.राम-जानकी यांचा संसार सुद्धा रामराज्याप्रमाणे सुरू झाले.ज्यांचे अवघे जीवन कुस्ती सारख्या रांगड्या व मर्दुमकी जपणाऱ्या खेळाला समर्पित होते त्यांच्याशी संसार खरंच एवढा सोपा नसतो.मात्र हा शिवधनुष्य जानकी आईसाहेबांनी पेलला आणि अखेरपर्यंत नेला.घरच्या गरीब परिस्थितीचे भांडवल न करता त्यांनी संसार उभा केला.त्याकाळी शिक्षणासाठी येणाऱ्या अनेक विद्यार्थ्याच्या त्या आई झाल्या.घरी 100 मुलांची खानावळ त्या चालवत होत्या.अगदी वसंतदादांच्या बंगल्यानजीक रामचंद्र नलवडे मामांना घरासाठी जागा दिली.हळूहळू गरिबीचे काळे ढग निवळू लागले.सुबत्तेचा सुकाळ येऊ लागला.हमालीपासून सुरू झालेला प्रवास केवळ कुस्ती मुळे इथवर आला.

कुस्ती प्रशिक्षण

वसंतदादा कुस्ती केंद्र हे महाराष्ट्रातील त्याकाळचे बलाढ्य मल्ल घडवणारा कारखाना बनले होते.गुरुवर्य दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त दिनकर सूर्यवंशी सर यांच्यासारखे क्रीडा तपस्वी कुस्ती प्रशिक्षक त्या केंद्राला लाभले.35 वर्षे राम नलवडे मामा व दिनकर सुर्यवंशी यांची घनिष्ट मैत्री जमली.आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील सर यांनीही या महान कार्यात आपले योगदान दिले.अनेक राज्य व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्ल त्यांनी वसंतदादा कुस्ती केंद्रात घडवले जे पुढे जाऊन कुस्ती सह जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यशस्वी झाले.

उत्तरार्ध
जिथे सुरवात आहे तिथे हमखास शेवट असतो.जिथे प्रकाश नाहीसा होता तिथे अंधार नक्की सुरू होतो.मामांनी स्वतःचा संसार समर्थपणे उभा केला.त्यांची दोन्ही मुले राहुल व दत्ता विद्याविभूषित बनवले.जीवनाच्या संघर्षात टिकून राहण्याचे बाळकडू त्यांना वडिलांच्या जिवनगाथेतुनच मिळाले.शिस्तबद्ध जीवन आणि तत्वांचा ठामपणा हा राम नलवडे यांच्या दीर्घायुश्याचा पाया होता.96 वर्षे दीर्घ व निरोगी आयुष्य त्यांना लाभले.अगदी अखेरच्या क्षणी सुध्दा कोणाकडून सेवा करुन घ्यायची वेळ त्यांच्यावर आली नाही.आयुष्य समर्थपणे जगलेला आणि तितकाच शेवटचा दिवस सुद्धा जगणारा हा अवलिया अवघ्या कुस्ती क्षेत्राला पोरका करून कायमचा निघून गेला.उरल्या केवळ रम्य आठवणी.हिंदू धर्मात मनुष्य पुढचा जन्म कोणता घेईल हे पाहण्यासाठी दिव्यावर सूप पालथे घालतात.मामांचा जन्म कोणता ही उत्सुकता नक्कीच कुटुंबियांना होती.मात्र,अक्षरशः कुस्तीचा आखाडा त्याठिकाणी निर्माण झाला.नक्कीच मामांचा पुढचा जन्म सुद्धा कुस्तीसाठी होणार हे नक्की.ही आमची श्रद्धा म्हणा भाबडेपणा मात्र नक्कीच अश्या विधीत कधी मातीचा आखाडा निर्माण झालेला मी तरी पाहिला नाही.ईश्वर मामांच्या आत्म्यास शांती देवो व पुनरपी त्यांना कुस्ती कार्यासाठी जन्म देवो ही प्रार्थना.सरतेशेवटी राहुल व दत्ता भाऊ यांना एकच सांगणे आहे की जो वैभवाचा काळ वसंतदादा कुस्ती केंद्राने पाहिला तो काळ पुन्हा आणायची जबाबदारी आता तुमची आहे.मामांना ती खरी श्रद्धांजली ठरेल.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ
Fb.me/kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form