विष्णुपंत सावर्डेकर आप्पांची आज 12 वी पुण्यतिथी : खास लेख
मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डेकर यांची आज पुण्यतिथी.आप्पा या नावाने त्यांना अवघा हिंदुस्थान ओळखत असे.सांगलीच्या फौजदार गल्लीत त्यांच्या घराण्याची स्वतःची तालीम.भोसले व्यायामशाळा या नावाने त्यांची तालीम ओळखली जाते.या नावाचा सुद्धा रंजक इतिहास आहे.सातारा जिल्ह्यातील नागझरी गावचे एक कुस्तीप्रेमी व दानशूर व्यक्तित्व धोंडिरामशेठ नागझरीकर भोसले यांनी या तालमीसाठी पंतांचे बंधू जोतिरामदादा यांना मदत केली होती.त्यांच्या मदतीची उतराई म्हणून आजन्म या तालमीचे नाव भोसले व्यायामशाळा पडले.
जोतीरामदादा सावर्डेकर यांनी आपला भाऊ विष्णुपंत सावर्डेकर यांना तयार केले.शिस्त म्हणजे सावर्डेकर घराण्याचा आत्मा.विष्णुपंत सावर्डेकर हे नाव म्हणजे अप्रत्यक्ष दरारा.
मी स्वता 2002 साली भोसले व्यायामशाळा येथे दुपारच्या लढतीला जात असे.पंत हौद्याच्या कट्ट्यावर पोत्यावर बसायचे.त्यांच्या बरकडी ला पट्टा असूनही नित्यनियमाने पोरांच्या लढती घ्यायला यायचे.त्याकाळी विकास तात्या जाधव हे वादळ महाराष्ट्रभर नाव गाजवत असायचे.
आप्पांची करडी नजर प्रत्येकावर असायची.माझी ज्यावेळी ओळख झाली त्यावेळी हौद्याच्या लढतीत मी खूप वेळ खेळलो.माझे उदाहरण देत ते जोडीतल्या पोरांना म्हणायचे हे नवीन पोरगं बघा किती उशीर लढत आहे आणि तुम्ही लगेच दमता.
त्यानंतर अनेकदा मैदानातील लढतवर चर्चा व्हायची.गुंडाजी पाटील विरुद्ध विजय पाटील ही त्याकाळी मैदानी तुफानी लढत व्हायची.
विजय पाटील भोसले व्यायामशाळेत सराव करायचे.गुंडा भाऊ आणि विजय भाऊ यांच्या पट काढायच्या पद्धतीवर तासन तास चर्चा होत असायची.
अगदी आजच्या काळात कॅमेरे,अकॅशन रिप्लाय असायचे तसे डोक्यात भिनत होते.
खुरक व डाव यावर पंतांचा अभ्यास अतिशय होता.आकनी कशी करावी यावर सुद्धा ते तासभर बोलत असायचे.तालमीत काही दंगा,मारामाऱ्या त्याकाळी झालेल्या आठवतात पण तो काळ सुद्धा चातुर्याने हाताळत असायचे.
सांगलीच्या भोसले व्यायामशाळा मधून त्याकाळी भारतातील बलाढ्य मल्लाना जोड निघायच्या.बेलीफ ढाकवाले, जिनाप्पा अकिवाटे पैलवान,बसलिंग कारजगी,विष्णुपंत सावर्डेकर,नाथा पारगावकर मास्तर ही फळी आणि त्याही पूर्वीची मल्लाप्पा तडाखे, जोतिरामदादा सावर्डेकर यांच्या सुरस कथा ऐकण्याचे भाग्य मला लाभले.
महान महाराष्ट्र केसरी विजय पाटील आणि हिंदकेसरी विकास जाधव यांच्याही मुखातून पंतांच्या अनेक कथा ऐकल्या.
त्यांनी आयुष्यात कुस्ती क्षेत्रात कशी कारकीर्द गाजवली यावर एक पुस्तक लिहता येईल आणि त्यांनी आयुष्यात कसे जगावे हे शिकवले यावर सुद्धा सुंदर ग्रंथ होऊ शकेल.
15 ऑक्टोबर 2010 रोजी आप्पा आपल्यातून कायमचे निघून गेले.आज त्यांची 12 वी पुण्यतिथी.
मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे विनम्र अभिवादन.
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
Kustimallavidya.com