माऊली जमदाडे विरुद्ध विक्रांत कोटीवाला अतिशय तुफानी कुस्ती - Video पहा

माऊली जमदाडे विरुद्ध विक्रांत कोटीवाला अतिशय तुफानी कुस्ती 

पलूसचे ऐतिहासिक कुस्ती मैदान गाजले माऊली जमदाडे यांच्या चित्तथरारक खेळीने


तब्बल 51 व्या मिनिटाला विक्रांत कोटीवाला वर विजय


कोरोना वैश्विक महामारीमुळे पलूसचे ऐतिहासिक कुस्ती मैदान गेली दोन वर्षे होऊ शकले नव्हते. गेली 30 वर्षापेक्षा जास्त काळ पलूस कुस्ती कमिटीचे अध्यक्ष असणारे प्रताप तात्या गोंदील यावर्षी मात्र प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे पुणे येथे उपचार घेत होते.काहीही करून यावर्षीचे कुस्ती मैदान झालेच पाहिजे असा निश्चय प्रताप तात्या यानी केला व हॉस्पिटलमध्ये बसून त्यांनी या वर्षीचे कुस्ती मैदान ठरवले.


यावर्षी पलूस च्या कुस्ती मैदानात क्रमांक एकची कुस्ती ठरली ती गंगावेश तालीम कोल्हापूर वस्ताद विश्वास दादा हारुगले यांचा पट्टा महान भारत केसरी माऊली जमदाडे विरुद्ध उत्तर भारतीय तगडा मल्ल विक्रांत कोटीवाला.


मान्यवरांच्या हस्ते हात सलामी झाली आणि अवघ्या काही मिनिटातच माऊली जमदाडे यांनी आक्रमक खेळ करून विक्रांत वर ताबा मिळवला.किमान शंभर ते सव्वाशे किलो वजन असणारा विक्रांत कोटी वाला ताकतीने भरपूर असल्याने माऊली जमदाडे यांच्या डावपेच्याची साखळी त्याच्यापुढे निष्फळ ठरताना दिसून आली.अनेक प्रयत्न करून सुद्धा विक्रांतचा घिसा निघत नव्हता. माऊली ने त्यानंतर इराणी एकलंगी घालण्याचा सुद्धा प्रयत्न केला मात्र तो सुद्धा निष्फळ ठरला.

प्रेक्षकांनी कुस्ती खडाखडी लावण्याची विनंती केल्यानंतर पंच म्हणून उभे असणारे पलूसचे जुन्या काळातील नामवंत मल्ल तथा सध्याचे वस्ताद नारायण बापू शिसाळ यांनी कुस्ती खडाखडी लावली.

गर्दन खेच करत माऊली जमदाडे यांनी पुन्हा दुहेरी पट काढून विक्रांत वर ताबा मिळवला. यावेळी सुद्धा विक्रांतने माऊलीचा कोणताही डाव करून दिला नाही.

कुस्ती पुन्हा खडखडी करण्यात आली.45 मिनिट उलटून गेली. उभय मल्लांच्या अंगावर चिखल माखून गेला.दम कस लागून सुद्धा दोन्ही पैलवान आक्रमक होते.कुस्ती अतिशय चित्तथरारक झाली.


मी स्वतः या कुस्तीत उपस्थित होतो व सदर कुस्तीने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले होते, त्यामुळे मी स्वतः मध्यस्ती करून सदर कुस्ती गुणावर लावण्याचा विनंती उपस्थित पंचांना केली व पंचांनी सुद्धा ती विनंती मान्य केली.मात्र प्रेक्षकांनी सदर कुस्ती निकालीच लावा अशी भूमिका घेतल्यामुळे मी पुन्हा पाच मिनिटे निकाली कुस्ती व्हावी असा निर्णय घेऊन त्यानंतर गुणावर कुस्ती होईल, त्यासाठी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग सर येतील असे जाहीर करण्यात आले.

पाच मिनिटानंतर सुद्धा कुस्ती निकाली न झाल्याने राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते वस्ताद राम सारंग सर यांनी विक्रांतला आक्रमक होण्याची सूचना दिली व त्यानंतर विक्रांत आक्रमक सुद्धा झाला. अखेर अटीतटीच्या कुस्तीमध्ये माऊली जमदाडे यांनी गुण घेतला व प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाट माऊलीची अभिनंदन केले.

कोरोना वैश्विक महामारी नंतर अशी दमखसाची कुस्ती बघण्यात आलीच नव्हती. मात्र माऊली जमदाडे यांनी आपल्या आक्रमक खेळणी उपस्थित कुस्ती प्रेमींच्या डोळ्यांचे पारने फेडले. पलूसकरांनी अतिशय कष्टाने ठरवलेल्या या कुस्तीचे चीज झाल्याची भावना सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती. अशा नेत्रदीपक कुस्तीची नोंद इतिहासात घेतली पाहिजे असे मनोमन वाटून गेले.

सदर कुस्तीचे संपूर्ण फुटेज आपण पाहू शकाल खालील व्हिडिओ द्वारे

धन्यवाद

पैलवान गणेश मानगुडे

कुस्ती-मल्लविद्या महासंघ

Kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form