पलूस च्या ऐतिहासिक कुस्ती मैदानाचे अध्यक्ष मा. प्रताप (तात्या) गोंदील-
पलूस मधील एक कुस्तीवेडे व्यक्तिमत्व
~~~~~~~~~~~~~~~
ज्या भुमीने देशाला कला,साहित्य,क्रीडा,राजकीय क्षेत्राला अनेक अवलीये दिले असे कृष्णेच्या खोऱ्यात वसलेल्या संपन्न अश्या पलूस तालुक्यात आजही विविध क्षेत्राचा वसा व वारसा जीवापाड जपणारी अनेक मंडळी अस्तित्वात आहेत.
त्यापैकी आवर्जुन उल्लेख करावासा वाटतो ते पलूस चे मा. श्री.प्रताप (तात्या) गोंदील यांचा.
“कुस्ती-मल्लविद्या” च्या माध्यमातून मला महाराष्ट्रभर प्रवास करण्याचा योग आला,अनेक कुस्तीवेडे अवलीये डोळ्यांनी पाहिले,त्यांचा क्षणभर का होईना सहवास लाभला.
सध्या प्रताप तात्या गोंदील हे पुण्यामध्ये प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे उपचार घेत आहेत त्यामुळे ते स्वतः या मैदानास उपस्थित नसणार आहे मात्र आपण त्यांची उद्या होणाऱ्या मैदानाबाबत फोनवरूनच मुलाखत घेण्याचा प्रयत्न करूया.आपल्यासोबत प्रताप तात्या आहेत.
पलूस शहरात एकेकाळी गुंडादाजी नावाचे वादळ समाजातील प्रत्येक घटकाला माहित असायचे,मग ते राजकारण असो,समाजकारण असो किंवा इतर.
पण,गुंडादाजी यांची दुसऱ्या कोनातून एक ओळख होती ते म्हणजे ते टोकाचे कुस्तीवेडे व्यक्तिमत्व होते.
मल्लविद्येचे व्यसन व हौस पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या राहत्या घरीच “तांबड्या हौद्याची” तालीम बांधली होती.
मन,मेंदू आणि मनगटावर संयम मिळवून समाजकारण करायचे असेल तर कुस्तीसारखा उपयुक्त खेळ नाही याची महती ते जाणून असायचे.
स्वता ते कुस्ती करायचे व पंचक्रोशीतील अनेक मल्लाना सतत मदतीचा हात असायचा.
पलूस शहरात पश्चिम महाराष्ट्रातील मोठे मैदान भरवण्याची परंपरा जतन केली ते गुंडादाजी यांच्याच प्रयत्नातून....!
पण,1989 साली त्यांना काळाची हाक आली आणि ते कायमचे निघून गेले.
मा.प्रताप गोंदील हे गुंडादाजींचे चिरंजीव.
लहानपणापासून कुस्ती विषयक अनेक गोष्टी त्यांनी वडिलांकडून आत्मसात केल्या,मात्र वडिलांच्या आकस्मित जाण्याने घराची जबाबदारी सांभाळत सांभाळत त्यांना कुस्तीपासून दूर जाणे भाग पडले.
घरची शेती-व्यवसाय सांभाळत ते संसारगाडा सांभाळू लागले,पण रक्तातील कुस्ती स्वस्थ बसू देत नसायची.
पंचक्रोशीतील सर्व कुस्ती मैदानास ते स्वतः भेट असत व गुणी मल्लांचा पाठीवर शब्बासकीचा हात टाकत असत.
हळूहळू कुस्तीचे हे त्यांचे व्यसन गावाच्या दिशा भेदून बाहेर जाऊ लागले.
महाराष्ट्रातील सर्वच मोठ्या मैदानाला हजेरी लावणे.अनेक मैदानात एखाद्या लढवय्या मल्लाला मदत करणे हे काम सुरूच होते.
दरम्यान,महाराष्ट्रातील एक अव्वल दर्जाचे मैदान पलूस मध्ये व्हावे असे त्यांनी स्वप्न पाहिले आणि पलूस च्या कुस्ती-मैदान समितीचे ते अध्यक्ष बनले.
गावात फिरून वर्गणी गोळा करणे व महाराष्ट्र फिरून तगडे मल्ल शोधून त्यांच्या कुस्त्या पलूस ला लावणे हे अवघड व आव्हानात्मक काम त्यांनी कित्येक वर्षे केले.
अनेक जुन्या जाणत्या मल्लांचा इतिहास जाणून घेऊन त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांची विचारपूस करणे हा छंदच त्यांनी लावून घेतला.
लहानपणी कुंडल च्या मैदानात आवर्जून पाहिलेली “आग्नेल निग्रो” या कर्नाटक च्या महान मल्लाची कुस्ती ते सतत आठवत असत.
एके दिवशी त्यांच्या मनात आले की आपण आग्नेल निग्रो यांना जाऊन भेटूया.
गावातील त्यांचे सवंगडी मिळून त्यांनी कर्नाटक प्रांतात असलेल्या जँगली भागात असणारे आग्नेल निग्रो यांचे गाव शोधून काढले.
दुर्भाग्य असे की निग्रो पैलवान यावेळी जिवंत नव्हते,पण आपल्या वडिलांना भेटायला कोणीतरी इतक्या दुरून आले आहे हे ऐकून मात्र घरच्या मंडळींना अश्रू अनावर झाले होते.
आग्नेल निग्रो यांच्या अनेक रम्य स्मृती त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगून त्यांचा निरोप घेतला.
केवळ एवढेच नव्हे तर हिंदुस्थानातील असलेल्या सर्वात तगड्या मल्लांचा तालमी त्यांनी स्वतः प्रवास करून पालथ्या घातल्या आहेत.
2009 साली कडेगाव मुक्कामी झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची स्मरणिका बनवण्याची जबाबदारी त्यांनी मोठ्या आनंदाने स्वीकारली होती.
महाराष्ट्रभर प्रवास करून त्यांनी अनेक जुन्या मल्लांनी चित्रे जमवली होती.
दरवर्षी पलूस येथे महाराष्ट्रातील तगडे मल्ल आणून त्यांच्या कुस्त्या शहरातील कुस्ती शौकीनांसाठी एक पर्वणी असते.
या मैदानात आजवर त्यांनी भारतातील अनेक हिंदकेसरी,रुस्तुम ए हिंद मल्ल लढवले आहेत.
अनेक वर्षे यशस्वीपणे कुस्ती कमिटी चे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले तरी कुस्तीची नशा काही केल्या कमी होत नाही.
सध्या प्रताप तात्या गोंदील हे पुण्यामध्ये प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे उपचार घेत आहेत त्यामुळे ते स्वतः या मैदानास उपस्थित नसणार आहे मात्र आपण त्यांची उद्या होणाऱ्या मैदानाबाबत फोनवरूनच मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू.