हॉकीचे जादूगर म्हणून प्रसिध्द असलेले मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरा केला जातो.त्यांच्याविषयी थोडंस..

"आज राष्ट्रीय क्रीडादिन"
••••••••••••••••••••••
हॉकीचा जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन.!
•••••••••••••••••••••••••••```
"मित्रानो वाचायला विसरू नका आणि नक्की share करा."
हॉकीचे जादूगर म्हणून प्रसिध्द असलेले मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिन संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त ध्यानचंद यांच्याविषयी थोडंसं.
वडिल सैन्यात सुभेदार असल्यामुळे त्यांची सतत बदली होत असल्याने ध्यानचंद यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. त्यांचे शिक्षण फक्त इयत्ता सहावीपर्यंत झाले. झांशी येथे त्यांच्या वडिलांना घरासाठी जागा मिळाली होती. ध्यानचंद यांना लहान असताना कुस्ती या खेळाची आवड होती. त्याकाळी गामा पहिलवान हा नामांकित मल्ल होता. ध्यानचंद यांच्या दृष्टीने गामा पैलवान हिरो होता. वडिल एकदा हॉकीचा सामना पाहायला ध्यानचंद यांना घेऊन गेले. सामना सुरू असतांना त्यांचा आवडता संघ २ गोलने पिछाडीवर होता. त्यांनी वडिलांना,‘जर या सामन्यात मला खेळण्यास संधी दिली तर मी या संघाला जिंकून दाखवेल’ असे सांगितले. आर्मी अधिकाऱ्याने हे संभाषण ऐकले. ध्यानचंद यांना सामन्यात खेळण्यास संधी दिली आणि त्यांनी एका मागून एक असे ४ गोल केले. त्या अधिकाऱ्याने ध्यानचंद यांची आर्मीत शिपाईपदासाठी शिफारस केली. त्यावेळी त्यांचे वय १६ वर्षे होते. हॉकी खेळत असताना त्यांना पंकज गुप्ता नावाचे गुरू लाभले. त्यांनी त्यांचे हॉकीतील कसब ओळखून भाकीत वर्तवले की, हा मुलगा एक दिवस चंद्रासारखा तळपेल. ‘चांद’ म्हणजे चंद्र, तेव्हांपासून ध्यानसिंग या नावाला ‘ध्यानचंद’ असे म्हणून ओळखले जाऊ लागले.आर्मीत आपले कर्तव्य बजावत असताना आवश्यक तितका वेळ हॉकी खेळण्यासाठी मिळत नव्हता. हॉकी खेळण्यासाठी त्यांनी चंद्राच्या प्रकाशात सराव सुरू केला. ध्यानचंद यांच्या हातातल्या जादूई स्टीकचा किस्सा आर्मी अधिकाऱ्यांपर्यंत पोहचला. पुढे त्यांचा भारतीय हॉकी संघात समावेश झाला. 
त्यांचा खेळ कायम दंतकथा बनून राहिला. त्यांच्या हॉकी स्टिकवरील कौशल्याने अनेक कथांना जन्म दिला. चेंडू त्यांच्या हॉकीला जणूकाही चिकटवलेलाच असायचा. हॉलंडमधला तो प्रसंग सगळ्यांनाच आठवतो. त्यांची हॉकी स्टिक तोडून तिला कुठे आतून लोहचुंबक तर लावलेले नाही ना अशी तपासणी केली गेली. जपानमध्ये त्यांच्या स्टिकला डिंक लावल्याचा आरोप केला गेला. तोही खोटा ठरला. अनेकदा तर गंमत अशी व्हायची की प्रतिस्पर्धी खेळाडू त्यांचा खेळ बघता बघता स्वत:चे खेळणे विसरून जायचे. त्यांनी भारताला तीन सुवणपदके मिळवून दिली. 1928 मध्ये अॅमस्टरडॅम, 1932 मध्ये लॉस एंजलिस आणि 1936 मध्ये बर्लिन येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ही पदके भारताला मिळाली. 

1928 अॅमस्टरडॅम ऑलिम्पिक :
1928 साली अॅमस्टरडॅम येथील ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा हॉकीचा समावेश करण्यात आला. भारत 11 सामने खेळला. सगळे सामने भारताने जिंकले. ऑस्ट्रेलियाला 6-0, बेल्जियमला 9-0, डेन्मार्कला 6-0 तर स्वित्झर्लंडला 6-0 असे पराभूत केले. भारताने सहज अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात हॉलंडला 3-0 असा पराभव पत्करावा लागला. 

1928 लॉसएंजेलिस ऑलिम्पिक :
1932 मध्येही ध्यानचंद यांनी चमत्कार घडवला. भारताने यात 262 गोल केले त्यात ध्यानचंद यांचे 101 गोल होते. अटीतटीच्या सामन्यात अमेरिकेला भारताकडून 25-1 अशा जबरदस्त पद्धतीने पराभव पत्करावा लागला. या ऑलिम्पिकमध्ये भारताने सुवर्णपदक मिळविण्याबरोबरच सर्वाधिक गोल फरकाचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. तो अजूनही कायम आहे. या विजयात भारतातर्फे ध्यानचंद यांनी आठ, रुपसिंग यांनी 10 व गुरूमितसिंग यांनी 6 गोल केले. त्या सामन्याचे वर्णन करताना अमेरिकन वृत्तपत्रे म्हणाली, भारताची टीम म्हणजे पूर्वेकडून आलेले वादळच होते. ज्या वादळाने अमेरिकन संघाला चिरडून टाकले. 

1936 - बर्लिन ऑलिम्पिक :
गोष्ट 1936 ची आहे. बर्लिन ऑलिम्पिकसाठी ध्यानचंद कप्तानपदी निवडले गेले. 17 जुलै रोज जर्मनीबरोबर भारताचा बर्लिनमध्ये मैत्रीपूर्ण सामना झाला. भारताला जर्मनीकडून 1-4 असा पराभव पत्करावा लागला. तेव्हा ध्यानचंद म्हणाले होते, जर्मनीची प्रगती बघून आम्हाला धक्का बसला आहे. आमची भूक-झोप गायब झाली आहे. 15 ऑगस्टला भारत आणि जर्मनीत अंतिम सामना होता. जर्मनीने केलेला पराभव भारतीय खेळाडू विसरु शकले नव्हते. सामना खरं तर 14 तारखेलाच व्हायचा होता पण इतका पाऊस पडला की मैदानात सगळीकडे पाणीच पाणी झाले. त्यामुळे सामना 15 ला घोषित झाला. प्रदर्शनीय सामन्यातील पराभवाने भारतीय खेळाडूंमध्ये नैराश्य पसरले होते. काय करावे तेच कळत नव्हते. अचानक भारतीय संघाचे मॅनेजर उठले आणि त्यांनी ड्रेसिंग रुममध्ये भारताचा तिरंगा समोर ठेवला. तो बघूनच खेळाडूंचा जोश परत आला. ते विजयाच्या निर्धारानेच मैदानावर आले आणि जर्मनीला 8-1 अशी पराभवाची धूळ चारली. या दरम्यानच्या एका सामन्यात जर्मन अधिकार्‍यांनी ध्यानचंद यांना अचानक दुसर्‍या स्टिकने खेळायला लावले. पण त्यामुळे काहीच फरक पडला नाही. ध्यानचंद यांनी त्याही स्टिकमधून गोलांचा पाऊस पाडला आणि त्यात त्यांच्या खेळाविषयीच्या सगळ्या शंका वाहून गेल्या. तेव्हापासूनच क्रीडारसिकांनी त्यांना हॉकीतील जादूगार ही पदवी बहाल करुन टाकली.1936 च्या ऑलिम्पिक सामन्याच्या वेळी एक घटना घडली. त्यावेळचा भारत-जर्मनी सामना पाहण्यास हुकूमशहा हिटलर उपस्थित होता. ध्यानचंदच्या जादूमय हॉकीने तो एवढा प्रभावित झाला की ध्यानचंद आपल्याकडे हवा, असे त्यास वाटू लागले. हिटलरने त्यांना सैन्यात फिल्डमार्शलचे पद देऊ केले. परंतु त्यावेळी सैन्यात शिपाई असलेल्या ध्यानचंद यांनी तो प्रस्ताव फेटाळून आपल्या देशप्रेमाची प्रचिती हिटलरला आणून दिली. ध्यानचंद जातिवंत खेळाडू होते. संघभावना, खिलाडूवृत्ती त्यांच्या श्वासाश्वासात भरलेली होती

गोष्ट 1933 सालची आहे खेळाडू म्हणून परमोच्च बिंदूवर असताना ते रावळपिंडी दौर्‍यावर होते पंजाब रेजिमेन्टकडून खेळायचे. जिथे जातील तिथे लोक त्यांना बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने जमत. रावळपिंडीलाही तेच झाले होते. त्यांचा खेळ पाहून मैदान इतके गुंग झाले होते की, मैदानात टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता पसरली होती, लोक बोलायचे देखील विसरुन गेले होते. पण विरोधी टीमने मात्र खिलाडूवृत्ती दाखवली नाही. त्यांचा सेंटरहाफ खेळाडू इतका संतापला की संतापाच्या भरात त्याच्या हाताने ध्यानचंद यांच्या नाकाला जखम झाली. सामना थांबवला गेला. ध्यानचंद यांनी प्रथमोपचारासाठी मैदान सोडले. नाकाला पट्टी करुन ते परत आले आणि सरळ सेंटर हाफकडे गेले. दर्शकांना वाटले आता पुन्हा काहीतरी घडणार. पण तिथे जे काही घडले ते ध्यानचंद यांच्यातील खिलाडूवृत्तीचे दर्शन पूर्ण जगाला घडवणारे होते. ते सरळ सेंटरहाफकडे गेले. त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, जरा जपून खेळ. नाहीतर धसमुसळेपणाने मला पुन्हा जखम व्हायची. ध्यानचंद यांनी त्याच्या वर्तणुकीची परतफेड त्या खेळाडूशी वाद न घालता आपल्या खेळातून केली. त्यांनी लागोपाठ 6 गोल केले. तेव्हा त्या सेंटरहाफलासुद्धा आपला संताप विसरून सॅल्यूट करावासा वाटला. 

दुसर्‍या महायुद्धानंतर त्यांनी हॉकीतून निवृत्ती पत्करली खरी; पण त्यांची क्षमता असाधारण होती. त्यांचे पुत्र हॉकीपटू अशोककुमार त्यांच्याविषयी बोलताना म्हणतात, वयाच्या 50 व्या वर्षीसुद्धा ते स्वत:ला ंतंदुरुस्त ठेवण्यासाठी हॉकी खेळायचे तेव्हा लागोपाठ दहा शॉट असे मारायचे की त्यातला एकही शॉट गोलकिपरला अडवता यायचा नाही. हॉकीवर त्यांनी जिवापाड प्रेम केले. त्यांची राहणी साधी व सरळ होती. आयुष्यभर ते गरीबीत जगले. ध्यानचंद यांनी स्वत:ला प्रसिद्धी व पैशांपासून कायम दूर ठेवले. ध्यानचंद यांचा गणवेश लष्करी असायचा. १९५६ मध्ये त्यांना भारत सरकारन पद्ममभूषण पुरस्काराने सन्मानित केले. 1968 मध्ये मे्निसको ऑलिम्पिकमध्ये भारताचे कप्तान असलेले गुरुबक्षसिंग म्हणतात, 1959 मध्ये ध्यानचंद 54 वर्षांचे होते. पण खेळावर पकड आणि तंदुरुस्ती इतकी होती की तेव्हाही त्यांच्याकडून कोणत्याही खेळाडूला चेंडू हिसकावून घेणे अश्नय व्हायचे. ऑलिम्पिक खेळाडू केशवदत्त म्हणतात, एखादा बुद्धिबळपटू कसा एकाग्रचित्ताने आपल्या पटाकडे बघत असतो तसे ध्यानचंद मैदानावर उतरले की त्यांचे सगळे लक्ष फक्त मैदानावर एकवटलेले असायचे. ते एकदा सगळे मैदान नजरेखालून घालायचे. आपल्या संघाचा कोणता खेळाडू कुठे उभा आहे हे त्यांना पक्के माहिती असायचे. त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली तरी ते त्या खेळाडूजवळ पोहोचायचे. त्यांना अनेक मानसन्मानाने सन्मानित करण्यात आले. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने त्यांना शतकातील खेळाडू म्हणून घोषित केले. दिल्लीतील स्टेडिमयला मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्यात आले. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांचा सन्मान करण्यात आला. व्हिएन्ना येथे ध्यानचंद यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याला चार हात दाखविण्यात आले. तसेच चार स्टिक हातात दाखविण्यात आल्या. 

3 डिसेंबर 1979 मध्ये त्यांचे निधन झाले. ज्यांचा श्वास हॉकी होती त्यांचे अंत्यसंस्कार देखील त्याच इतमामात झॉंसी येथील मैदानात केले गेले. त्यांचे आत्मचरित्र ‘गोल’ नावाने प्रसिद्ध आहे. त्यात ते लिहितात तुम्हाला माहिती असायला पाहिजे की मी या जगातील एक साधासुधा मनुष्य आहे. पण ते साधारण मनुष्य नव्हतेच. ते असाधारण होते. त्यांचा खेळ असाधारण होता हे तेव्हाही सगळ्या जगाला मान्य होते आणि आजही मान्य आहे.

धन्यवाद 
पै.गणेश मानुगडे 
कुस्ती-मल्लविद्या 
https://www.facebook.com/kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form