सांगलीचा वाघ,महाराष्ट्राचा स्वाभिमान - पै.दिनकर दह्यारी (अण्णा)

सांगलीचा वाघ,महाराष्ट्राचा स्वाभिमान - पै.दिनकर दह्यारी (अण्णा)

लेखन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या
Fb.me/kustimallavidya

रामराम मंडळी,

कुस्तीक्षेत्रात गेली दहा वर्षे अखंड लेखन करत असताना अनेक जुन्या मल्लांच्या जीवनात डोकावता आले.त्यांची उत्तुंग कुस्ती कारकीर्द जेव्हा अभ्यासायला मिळाली तेव्हा खरोखर आजच्या कुस्तीक्षेत्राची कीव आल्याशिवाय राहत नाही.
पैलवनांच्यात पूर्वी असणारा एक रगील पणा,मागे न हटायची प्रवृत्ती आणि वाघासारखे काळीज हे आजमितीला पाहायलाच मिळत नाही.आज कुस्तीला पैसा आहे,प्रसिद्धी आहे,सरावासाठी आधुनिक साधने आहेत मात्र रगीलपणा कुठेतरी कमी पडतो ही खंत मनात आल्याशिवाय राहत नाही.
आज कुस्ती मल्लविद्या वाचकांसाठी अश्याच एका वाघाच्या काळजाच्या आणि जातिवंत मल्लाची कहाणी सांगणार आहे ज्याने आपल्या आयुष्यात अनेक पराक्रम केले.कुस्ती निवृत्तीनंतर हाच लढाऊपणा आपल्या शिष्यांना देऊन ते निघून गेले.
पै.दिनकर दह्यारी (अण्णा) हे त्यांचे नाव.
सांगली जिल्ह्यातील सध्याचा जो पलूस तालुका आहे त्यामध्ये सागरेश्वर अभयारण्याच्या पायथ्याशी अगदी कृष्णा नदीच्या काठावर वसलेले दह्यारी हे साधन गाव हेच दिनकर अण्णांचे जन्मगाव होय.ही सारी क्रांतिभूमी आहे.इथे बंड पिकते, इथले पुरुषार्थ गाजवणारी मनगटे जन्माला येतात.
आपल्या कुस्तीचा प्रारंभिक सराव दिनकर अण्णांनी दह्यारी गावातच केला.अतिशय मेहनती,अतिशय धाडसी आणि अतिशय महत्वकांक्षी असणारे दिनकर दह्यारी यांचे पंचक्रोशीत खूप चांगले नाव झाले होते,पण त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी कुस्ती होती ती शाहूपुरी तालीम कोल्हापूर चे महान मल्ल पै.महंमद हनिफ यांच्यासोबत झालेली.
नागराळे हे दह्यारी गावाच्या अगदी जवळ असणारे असेच एक कुस्तीचा महान वारसा असणारे ऐतिहासिक गाव.याच गावात अगदी हिंदुस्थान मध्ये अजिंक्य असणारे पैलवान जन्माला आले ते म्हणजे रुस्तुम ए हिंद विष्णुपंत नागराळे.
विष्णुपंत नागराळे हे शाहूपुरी तालमीचे वस्ताद होते.त्यांचे गुरू मल्लाप्पा तडाखे.ही कुस्तीची आणि वस्तादांची महान परंपरा अशीच पुढे चालू होती.
नागराळे गावात भरलेल्या कुस्ती मैदानात लहान मोठ्या कुस्त्या संपल्यानंतर महंमद हानिफ या पंतांच्या पठ्ठ्याची कुस्ती पंच लावण्यासाठी फिरवू लागले.हानिफ पैलवान त्याकाळी अतिशय तगडे मल्ल म्हणून हिंदुस्थानभर नावलौकिक होता.त्यामुळे कोणीही उठेना.अखेर गावातील जेष्ठ वस्तादानी दिनकर अण्णा आणि महंमद हानिफ ही कुस्ती ओढून लावली.दिनकर अण्णा तशी लहान जोड मात्र भागात नाव मोठे असल्याने लोकांना कुस्ती बघायची होती.
कुस्तीची हातसलामी झाली आणि दोन वाघ चवताळून एकमेकांवर तुटून पडले.
महंमद हानिफ अनुभवी आणि मुरब्बी मल्ल तर दिनकर दह्यारी त्यामाने कमी अनुभवी आणि इथेच थोडे कमी पडले. या कुस्तीत महंमद हानिफ जिंकले.
कुस्त्या संपल्या, सारे लोक घरी गेले तरी दिनकर दह्यारी रडत देवळाच्या कट्ट्यावर बसले होते.पै.विष्णुपंत नागराळे यांनी हे पाहिले आणि जवळ येऊन सांगितले..दिनकर तू खूप चांगला लढलास. महंमद बरोबर महाराष्ट्रात पाच दहा मिनिटं पण कोण टिकत नाही.त्यामुळे दुःख करून घेऊ नकोस.
पै.दिनकर दह्यारी हे एक अजब रसायन होते.त्यांना पराभूत होणे मान्यच नव्हते.रक्ताच्या थेंबा थेंबात कुस्ती भिनत होती त्यामुळे पराभव अश्रू बनून वाहत होता.
पंत म्हणाले तू कोल्हापूर ला चल..तिथे कुस्ती मेहनत करशील तर अजून चांगला होशील.
1950 ते 60 दशकाच्या मध्यंतरी दिनकर दह्यारी यांनी गाव सोडले आणि आपला मुक्काम कोल्हापूर च्या ऐतिहासिक शाहूपुरी तालमीत केला.
कोल्हापूर ची शाहूपुरी तालीम म्हणजे भारताला अव्वल दर्जाचे मल्ल देणारा जणू करखानाच होता.मल्लाप्पा तडाखे, देवाप्पा धनगर,काळा आणि गोरा पांडू,गणपत शिंदे,विष्णुपंत नागराळे यासारखे त्याकाळचे भारतात अजिंक्य असणारे मल्ल शाहूपुरीत घडले होते.अश्या तालमीत दिनकर दह्यारी यांचे पाय लागले.
रोज मध्यरात्री 1 पासूनच दिनकर दह्यारी व्यायामाला सुरवात करत होते आणि पहाटे 3 नंतर सर्वांच्या बरोबर सुद्धा लढती करत होते.महंमद हानिफ व त्यांची पहिल्या महिन्यात लढत एकतर्फी व्हायची,हानिफ त्यांना तगडे जात असायचे मात्र एका महिन्यानंतर अस्ससल काटा कुस्ती होऊ लागली.
एकाच दमात 4 हजार बैठका,2 हजार जोर इतका प्रचंड व्यायाम दिनकर अण्णा करत असे.
दिनकर दह्यारी यांची कुस्ती कर्नाटकातील हारूगिरी येथे कर्नाटक चा प्रसिद्ध मल्ल चार्ली सोबत ठरली.दावनगिरी चा हा मल्ल कर्नाटकात म्हैसूर आदी शहरात खूप प्रसिद्ध होता.हारूगिरी येथे जणू तोच जिंकणार म्हणून लोकांनी हत्ती सजवून आणला होता.कुस्तीनंतर हत्तीवरून मिरवणूक काढायची म्हणून.
कुस्ती ठरली.लाखो प्रेक्षकांच्या साक्षीने लढतीस प्रारंभ झाला.
पै.दिनकर दह्यारी यांची मुलतानी टांग, धावती टांग हे अतिशय धोकेबाज डावपेच होय.खाली धरून आणले की घिसा आणि उभ्या कुस्तीत मुलतानी टांग.
या कुस्तीत काही मिनिटातच दिनकर अण्णांनी चार्ली पैलवान ला मुलतानी टांगेवर असमान दाखवले.
ज्या हत्तीवरून चार्ली ची मिरवणूक होणार होती त्याच हत्तीवरून अण्णांची मिरवणूक काढण्यात आली.
करवीर वासीयांचा आनंद सुद्धा गगनात मावत नव्हता.कोल्हापूर राष्ट्रीय तालीम संघाने सुद्धा कोल्हापुरात या विजयानंतर दिनकर दह्यारी यांचा सत्कार केला.
त्याकाळी सांगली पंचक्रोशीत अजून एक नाव कुस्ती क्षेत्रात थैमान घालत होते.सांगली जिल्ह्यातील कवठेपिराण गावचे पै.मारुती भाऊ माने.उंचपुरे धिप्पाड मारुती भाऊ मैदानी कुस्तीत हळूहळू जोड तोडत वर येत होते.
अनेकांना वाटले की दिनकर दह्यारी आणि मारुती माने कुस्ती ठरली पाहिजे.गावोगावच्या ठेकेदारांनी प्रयत्न करून अखेर कुस्ती ठरली.
पै.मारुती माने विरुद्ध दिनकर दह्यारी ही कुस्ती 3 वेळा झाली व तीनही वेळा पै.मारुती माने याना पराभूत व्हावे लागले होते.मारुती माने पुढे फार मोठे पैलवान घडले मात्र 1960 च्या दरम्यान झालेल्या या कुस्तीत भाऊ पराभूत झाले होते.वाळवा तालुक्यात इस्लामपूर गावी झालेली ही कुस्ती अतिशय तुफानी कुस्ती ठरली होती.
1961 साली मामासाहेब मोहोळ यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशनात नागपूर च्या बिरजू यादव ला सुद्धा दिनकर दह्यारी यांनी मुलतानी टांगेवर अस्मान दाखवत पहिले महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला होता.
पै.दिनकर दह्यारी म्हणजे अतिशय धाडसी पैलवान.कुस्तीमध्ये पराभूत होणे हे जणू त्यांना मान्य नसायचे. मग,त्यासाठी जीवतोड मेहनत उपसायची त्यांची तयारी असायची.प्रतिस्पर्धी मल्ल कितीही तगडा असला तरी अजिबात न घाबरता त्यावर हल्ला चढवून त्याला नामोहरम करत.त्यांच्या बोटात विलक्षण ताकद होती.
प्रतिस्पर्धी मल्लाचे बोट दिनकर दह्यारी यांनी पकडले की मुलतानी टांग लागली म्हणून समजायचे.
1968 रोजी रोहतक हरियाणा येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत दिनकर दह्यारी अतिशय तुल्यबळ लढती जिंकत क्वार्टर फायनल पर्यन्त पोहोचले. सेमिफायनल मध्ये कराड चे सुप्रसिद्ध मल्ल पै.मारुती वडार लढणार होते.मारुती वडार हिंदकेसरी होतील अशी आशा बऱ्याच जणांना होती त्यामुळे वरिष्ठ पदाधिकारी मंडळींनी दिनकर अण्णांना थांबायची विनंती केली.वास्तविक मारुती वडार विरुद्ध दिनकर दह्यारी कुस्तीमध्ये जो जिंकेल त्याची अंतिम कुस्ती चांदीगिराम या बलाढ्य मल्लसोबत होणार होती.मात्र अंतिम कुस्तीत मारुती वडार पराभूत झाले व मास्टर चांदीगीराम हिंदकेसरी बनले.
दिनकर दह्यारी सारखा लढवय्या मल्ल कुस्तीनंतर सुद्धा स्वस्थ न बसता आपले अंगीभूत गुण पुढच्या पिढीला देण्यासाठी शाहूपुरी तालमीतच राहिले.
त्याकाळी शाहूपुरी तालमीत हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, पै.महंमद हानिफ आणि पै.दिनकर दह्यारी या त्रिमूर्तींनी शाहूपुरीत मल्लांचे नंदनवन वसवले.पै.दिनकर दह्यारी आणि शाहूपुरीतल्या मल्लांच्या ठायी रगीलपणा,मागे न हटायची प्रवृत्ती,धाडस,शौर्य यासारखे गुण ठासून भरले.शाहूपुरीतला कोणताही मल्ल घ्या,आवाज नेहमी रगिल असणार आणि कुस्ती वाघासारखी.पै.दिनकर दह्यारी यांनी स्वतःच्या मुलावर जितके प्रेम केले तितकेच प्रेम तालमीतल्या मल्लांच्यावर सुद्धा केले.पोरांची मेहनत,खुराक,विश्रांती याकडे लक्ष तर द्यायचेच मात्र एखादा पैलवान एखाद्या मैदानात पराभूत झाला तर त्याची धडगत नसायची. तालमीत त्याला मार तर असायचाच मात्र का पराभूत झाला यावर सखोल विश्लेषण असायचे.

एकदा बेळगाव जवळ आनंदवाडी येथे पै.संजय पाटील आटकेकर या दिनकर दह्यारी यांच्या आवडत्या पठ्ठ्याची कुस्ती होती.दिनकर दह्यारी कुस्ती मैदान पहायला उशिरा येणार होते आणि संजय पाटील यांची कुस्ती सुरू झाली होती.प्रतिस्पर्धी मल्लाने संजय पाटील यांना खाली धरून आणले होते आणि मानेवर हाताचा घुटना ठेवला होता.
तितक्यात माईकवरून पुकारा झाला..पहिले महाराष्ट्र केसरी पै.दिनकर दह्यारी यांचे मैदानात आगमन होत आहे,टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करा...पै.संजय पाटील यांच्या कानावर हे वाक्य पडताच अक्षरशः त्यांच्या अंगावर शहारे आले आणि जीवाचा आकांत करून ते प्रतिस्पर्धी मल्लाच्या तावडीतून सुटले आणि काही क्षणात टांग मारून विजय सुद्धा झाले आणि पळतच दिनकर अण्णांच्या पाया पडायला गेले.
अण्णांची भीती ही अशी होती.
दिनकर अण्णांच्या रगिलपणाबाबत अजून एक किस्सा सांगता येईल की मधुमेहाने त्यांचा एक पाय काढावा लागला होता.दररोज कुबड्या घेऊन ते तालमीत येत असायचे. एक दिवस संजय पाटील लढत करत असताना त्यांच्या मनाजोगे लढत नाही हे पाहिल्यावर ते इतके चिडले आणि टांग कशी मारायची हे दाखवण्यासाठी हौद्यात उडी मारली.आपल्याला एक पाय नाही याचे सुद्धा भान त्यांना नव्हते.वयाच्या 50शी नंतर दिनकर दह्यारी वारले तेव्हा महाराष्ट्रातील दिग्गज पैलवान त्यांना दहन देण्यासाठी आले होते त्यावेळी हिंदकेसरी मारुती माने भाऊ यांच्या भाषणात ते म्हणाले..दिनकर आपल्यात आज नाही,पण माझ्या मनात अशी भीती वाटते की हा सरणावर ठेवलेला दिनकर आत्ता उठून मला टांग मारेल की काय....माझ्या आयुष्यात दिनकर सारखा लढवय्या पैलवान मी कधीच पाहिला नाही.
पै.संजय पाटील महाराष्ट्र केसरी झाले त्यावेळी डोळ्यात पाणी आणून म्हणाले होते आज अण्णा हवे होते.

नागराळे गावचे पैलवान व दिनकर अण्णांचे पठ्ठे पै.संपत पाटील ही कथा मला सांगत होते आणि सांगता सांगता त्यांचा आवाज कातर होत होता आणि केवळ हुंदके ऐकू येत होते.

महाराष्ट्रात पै.दिनकर अण्णांसारखे रगिल, लढाऊ,धाडसी आणि इर्षेखोर पैलवानांचा आज दुष्काळ आहे.आज सर्वकाही आहे मात्र हे गुण आपल्याला स्व.दिनकर अण्णांच्या चरित्रातून जरूर घ्यावे लागतील त्यासाठी आजचा हा लेख कुस्ती मल्लविद्या वाचकांसाठी अर्पण.

पै.दिनकर दह्यारी यांचे आडनाव पाटील होते मात्र गावाचे नाव ते आडनाव म्हणून लावत असे जेणेकरुन गावाचे नाव मोठे होईल.

जरूर share करा.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या
Fb.me/kustimallavidya
Whatsapp 9850902575

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form