हरिश्चंद्र बिराजदारांनी रोखले सतपालरुपी वादळ - 11 जानेवारी 1977
कै.पैलवान हरीश्चंद्र बीराजदार (मामा) आणी महाबली सतपाल यांची ऐतीहासीक कुस्ती...ज्या कुस्तीमुऴे एकेकाऴी महाराष्ट्राची कुस्ती क्षेत्रात लाज रौखली गेली..
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या
wwww.facebook.com/kustimallavidya
whatsapp 9850902575
कोल्हापूर हे कुस्तीच्या जागतिक नकाशावर ‘कुस्तीपंढरी’ म्हणून ओळखले जाते. विसाव्या शतकाच्या प्रारंभी राजर्षी शाहूंच्या उदार आश्रयाखाली मल्लविद्येचा विकास झाला. देशाच्या कानाकोपऱ्यातून उमद्या तरुणांचे पाय कोल्हापूरकडे वळू लागले आणि कोल्हापूर हे कुस्तीचे जागतिक विद्यापीठच बनले. राजर्षी शाहूंनी कुस्तीच्या विकासासाठी कोल्हापुरात भव्य असे खासबाग कुस्त्यांचे मैदान बांधले. पेठापेठांमध्ये तालमी उभारल्या आणि संस्थानातून मल्लांच्या खुराकाची व्यवस्थाही केली. यामुळेच जगाच्या पाठीवर कोल्हापूरचे नाव नेणाऱ्या नामवंत मल्लांची एक शृंखलाच कोल्हापुरात तयार झाली.
पहिलवान हरिश्चंद्र बिराजदार हे या शृंखलेतील एक नामवंत मल्ल!
हरिश्चंद्र बिराजदार हे मूळचे लातूर जिल्हय़ातील रामलिंगचे. वडील पट्टीचे पहिलवान असलेल्या बिराजदारांचे वयाच्या पाचव्या वर्षी मातृछत्र हरपले. यामुळे वडिलांची एकच इच्छा हरिला मोठा पहिलवान करायचे. रामलिंगच्या तालमीत हौदामध्ये लाल मातीत आपल्या कौशल्याची चुणूक दाखविणाऱ्या हरितील पहिलवानकीचे गुण वडील माधवरावांनी अचूक हेरले आणि पुढच्या प्रवासासाठी कोल्हापूरचा रस्ता धरला. १९६५चा सुमार असेल. कोल्हापूरच्या प्रसिद्ध शाहू विजयी गंगावेस तालमीच्या दारात एक मिसरूडही न फुटलेला पंधरा वर्षांचा उंचापुरा पोरसवदा तरुण उभा राहिला. डोक्यावर पत्र्याची पेटी, आवश्यक कपडे आणि खुराकाचे साहित्य घेऊन उभ्या असलेल्या या तरुणाला माधवरावांनी मोठय़ा मनाने तालमीच्या हवाली केले, तेव्हा हा मुलगा ऑलिम्पिकपर्यंत धडक मारेल, असे कोणाला स्वप्नातही वाटले नसेल. पण अतिशय शांत स्वभाव, प्रचंड मेहनत घेण्याची तयारी आणि जबर आत्मविश्वास याच्या जोरावर हरिश्चंद्र बिराजदार हे यशाची एकेक शिखरे लीलया पादाक्रांत करीत गेले. अवघ्या चार वर्षांत या तरुणाने वयाच्या १९व्या वर्षी ताकदीने खूपच वरचढ असलेल्या दादू चौगुलेंना हरवून ‘महाराष्ट्र केसरी’ किताब मिळविला आणि त्याच वर्षी मानाच्या ‘हिंदकेसरी’ किताबावरही आपले नाव कोरले. १९७० मध्ये स्कॉटलंडमध्ये एडिंबरा येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून बिराजदारांची विजयी पताका सातासमुद्रापार गेली. तर १९७१ मध्ये दिल्लीच्या मोठा गवगवा झालेल्या नेत्रपालला अस्मान दाखवून ‘रुस्तम-ए-हिंद’ या किताबालाही त्यांनी गवसणी घातली.
या साऱ्या बहुमानाने हरिश्चंद्र बिराजदार हे नाव कुस्तीच्या विश्वामध्ये सर्वतोमुखी झाले, पण कुस्तीशौकिनांच्या मनात हरिश्चंद्र बिराजदार हे नाव अजरामर झाले ते त्यांनी बेळगाव येथील मैदानात दिल्लीचा प्रसिद्ध मल्ल सतपाल याला अस्मान दाखविल्यानंतरच!
स्वातंत्र्यपूर्व काळात राजर्षी शाहूंनी कुस्तीकलेला मोठा आश्रय दिला, पण स्वातंत्र्योत्तर काळात हे चित्र बहुतांश बदलून गेले. कोल्हापूर ही कुस्तीपंढरी म्हणून नावलौकिक टिकवून होती. पण विशेषत: १९७५ नंतर उत्तरेकडील मल्लांची स्वारी कोल्हापुरात थडकली आणि कुस्तीच्या विश्वात कोलाहल माजला. उत्तरेचे मल्ल महाराष्ट्रातील नामवंत मल्लांना चारीमुंडय़ा चीत करीत होते.
पण दिल्लीच्या बिर्ला आखाडय़ाचा मल्ल आणि गुरू हनुमान सिंग यांचा पठ्ठा पहिलवान सतपाल या नावाच्या वादळाने तर एवढी दहशत निर्माण केली, की महाराष्ट्रात सतपालला पराभूत करणारा कोणी मल्लच नाही, अशी स्थिती निर्माण होऊन महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली.
पहिलवान सतपालला जोड ठरणारा मोतीबाग तालमीचा मल्ल पहिलवान दादू चौगुले याला सतपालने याच काळात तीन वेळेला अस्मान दाखविले. कोल्हापूरच्या खासबाग मैदानातील कुस्तीमध्ये तर लकडकोटाकडे धावणाऱ्या दादू चौगुलेंना सतपाल फरफटत मैदानाच्या मध्यभागी आणतो आहे असे चित्र पाहिल्यानंतर कुस्तीशौकिनांच्या डोळय़ांत रक्त उतरले नसते तरच नवल!
मग हरिश्चंद्र बिराजदार गप्प कसे बसणार! त्यांनी कुस्तीचे ठेकेदार सिद्राम पाटील यांना मैदान ठरविण्याची विनंती केली. यानुसार ११ जानेवारी १९७७ रोजी बेळगाव येथे मैदान मुकर्रर झाले आणि या मैदानात ज्यांनी ही कुस्ती पाहिली त्यांच्या आयुष्यात तो सोनेरी क्षण ठरावा.
तसे पहिलवान सतपाल आणि पहिलवान हरिश्चंद्र बिराजदार हे काटाजोड नव्हते. १०० किलो वजनाचा आणि ६ फुटांहून अधिक उंचीचा देखणा पहिलवान सतपाल एकीकडे आणि ८० किलो वजन आणि पावणेसह फूट उंचीचे पहिलवान हरिश्चंद्र बिराजदार दुसरीकडे. प्रथमदर्शनी ही कुस्ती जाहीर झाली तेव्हा सट्टेबाजांनी बिराजदारांना खिजगणतीतही मोजले नाही. पण या कुस्तीपूर्वी वस्ताद पहिलवान गणपत खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिराजदारांनी जी मेहनत घेतली त्याला तोड नाही. पहाटे चारला बिराजदार गंगावेस तालमीपासून पन्हाळय़ाच्या रस्त्याला केर्लीपर्यंत पळत सुटायचे. तालमीत दररोज अडीच हजार जोर आणि तेवढय़ाच बैठका हा व्यायाम करून हौद्यात तीन मल्लांशी एकाचवेळी खडाखडी करायचे. हे अपुरे पडले म्हणून की काय हाताच्या बळकटीसाठी पंचगंगेच्या डोहात पोहायचे आणि रस्सीवरून चढण्याचा व्यायाम करण्याबरोबरच साखरेचे रिकामे पोते हातांनी पिरगळून बोटांमध्ये ताकद मिळवायचे. त्यांचा हा व्यायाम ज्यांनी पाहिला त्यालाच ऑलिम्पिकपर्यंत मजल मारण्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात याची कल्पना येऊ शकेल.
अलीकडे तंत्रज्ञानाने बऱ्याच गोष्टी सोप्या केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लड दौऱ्यावेळी सचिन तेंडुलकरला हरविण्यासाठी टीव्हीच्या रिप्लेच्या माध्यमातून त्याचे गुण आणि कमजोरी शोधण्यासाठी एक विशेष अभ्यास झाला. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने ही सोय आज उपलब्ध केली असली तरी १९७७ मध्ये ही सोय नसतानाही या कल्पनेचा मात्र उगम झाला होता. अपराजित सतपालला पराभूत करण्याकरिता त्याची कमजोरी शोधण्यासाठी वस्तादांमध्ये खल होऊ लागले. यामध्ये वस्ताद पहिलवान गणपत खेडकर यांनी सतपालचे औषध शोधले. सतपाल हा पट काढण्यात माहिर होता. दुहेरी पट आणि बकरी पछाड हे त्याचे दोन हुकमी डाव. पहिलवान जेव्हा पट काढण्यासाठी प्रतिस्पध्र्याच्या पुढे घुसतो तेव्हा त्याच्या अंगाचा बोजा पुढे पडतो आणि पायातली ताकद कमी होते.
अशा वेळी प्रतिस्पर्धी मल्लाने पटाला हात घालताच त्याच्या पाठीवर डावा हात ठेवून बगलेत घातलेल्या उजव्या हाताने त्याच्या शरीराचा बोजा लीलया हवेतून उलटवायचा अशी नामी शक्कल लढविली गेली. याला मराठी भाषेत ‘सामने थंडर’ असेही नाव आहे.
बेळगावच्या मैदानात सतपाल नेमका तिथेच फसला आणि बिराजदारांची विद्युत चपळाई फळाला आली. डोळय़ांचे पारणे फेडणाऱ्या कुस्तीत सतपाल १४व्या मिनिटाला चितपट झाला आणि खचाखच भरलेल्या मैदानात कोल्हापुरी फेटे उडविले गेले. बिराजदार मामानी सत्पाल ला चारी मुंड्या चित केले ,तेव्हा पंच म्हणून उभे असलेल्या मारुती भाऊ मानेना सुध्दा आनंद लपवता आलानाही ,पंच आहोत हे विसरून ते सुध्दा नाचू लागले.‘हरि रे हरि तुने मारी भरारी’ अशा घोषणांनी सारे बेळगाव दुमदुमून गेले. मग कुस्तीच्या माहेरघरात तर बोलायलाच नको. जानेवारी महिन्यात कोल्हापुरात दिवाळी साजरी होत होती. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि जागोजागी साखर वाटून कोल्हापूरकरांनी कुस्तीवर आलेला कलंक पुसल्याचा आनंद व्यक्त केला. दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात दाखल झालेल्या हरिश्चंद्र बिराजदारांची कोल्हापूरकरांनी हत्तीवरून काढलेली मिरवणूक आजही जुन्या पिढीच्या डोळय़ांसमोर हलता हलत नाही.
कुस्तीपेशामध्ये मल्ल निवृत्त झाला, की कमविलेल्या पैशाच्या जोरावर व्यवसायाकडे वळतो. कोणी ट्रक घेतात, कोणी जमिनींचे व्यवहार करतात, तर बहुसंख्यांवर रसवंतीगृहे चालविण्याची वेळ येते. यामध्ये आपली कला पुढच्या पिढीला शिकविण्याची ऊर्मी बाळगून उतरणारे फार थोडे असतात.
बिराजदारांनी पुण्यात गोकुळ तालमीला कुस्तीचे विद्यापीठ बनविले. अतिशय कडक शिस्तीमध्ये कुस्तीचे धडे देऊन बिराजदारांनी महाराष्ट्रात मल्लांची नवी पिढी निर्माण करण्यात मोठे योगदान दिले. खरेतर याचा राष्ट्रीय स्तरावर आणखी एक मोठा सन्मान आवश्यक होता. पण बिराजदारांना लोकांनीच आपल्या हृदयात एवढे मोठे स्थान दिले, त्या स्थानामुळे अशा सन्मानांची गरजही भासली नाही
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या
wwww.facebook.com/kustimallavidya
whatsapp 9850902575
Tags
ऐतिहासिक कुस्त्या