हिंदकेसरी मारुती माने विरुद्ध मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डेकर यांच्या खासबाग मैदानातील 2 तास 48 मिनिटे चाललेली ऐतिहासिक कुस्ती
जी कुस्ती केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संबंध भारताच्या कुस्ती क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी लिहावी अशी होती.
महाराष्ट्राचे दोन बलाढ्य मल्ल एकमेकांवर जवळपास तीन तास तुटून पडले होते"
सप्तर्षी कवठे हे सांगली शहरापासुन अवघ्या काही अंतरावर वसलेले एक सधन गाव. याच गावात सराव करुन मारुती माने नावाची मंगलमुर्ती साऱ्या भारतभर कुस्त्या गाजवू लागली.
तर,सांगलीच्या भोसले व्यायामशाळेचे मल्ल ज्या घराण्याला पिढ्यान पिढ्यांचा कुस्तीचा वसा व वारसा होता असे विष्णुपंत सावर्डेकर त्यानी सुद्धा भारतभर आपल्या कुस्तीचा नावलौकीक केला होता.
खासबागेतील 1965 ची ऐतिहासिक लढत
6 मार्च 1965 रोजी कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाहू खासबाग मैदानात मारूती माने आणि विष्णू सावर्डे या दोन महाकाय मल्लांमध्ये जबरदस्त लढत झाली. पाऊने तीन तास चाललेल्या लढतीत डाव प्रतिडाव यांचे प्रदर्शन कुस्तीप्रेमींना पाहण्यास मिळाले. ही कुस्ती पाहण्यासाठी खासबाग हाऊसफुल्ल झाले होते. अखेर मारूती माने यांनी या लढतीत बाजी मारली. कुस्तीच्या इतिहासात दीर्घकाळ चाललेली लढत म्हणून या कुस्तीचा उल्लेख केला जातो. कोल्हापूरच्या राजर्षि खासबाग मैदानात आजवर अनेक ऐतिहासिक लढती झाल्या त्यामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंद घ्यावी, अशी कुस्ती 6 मार्च 1965 रोजी झाली. हिंदकेसरी मारूती माने आणि विष्णू सावर्डे हे सांगली जिल्हय़ातील महारथी आमने सामने आले. ही कुस्ती पाहण्यासाठी खासबागेत हजारो लोकांनी गर्दी केली होती. सायंकाळी होणाऱया कुस्तीसाठी सकाळपासून लोक येत होते. सर्व तिकीटे हातोहात खपली होती. तिकीटे मिळवूनही काही जणांना मैदानाबाहेर राहावे लागले होते. ग्रामीण भागातून लोक मिळेल त्या वाहनाने लढत पाहण्यासाठी आले होते. शहरातील हॉटेल्समध्ये जेवण शिल्लक नव्हते. सायंकाळपर्यंत खासबाग मैदानात मुंगीलाही शिरकाव करण्यास मिळणार नाही, एवढी जागा नव्हती.
पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लाठीमार करण्याची वेळ आली, तरी गर्दी हटत नव्हती. अखेर कुस्ती सुरू होण्याचा क्षण जवळ आला. प्रथम विष्णूपंत सावर्डेकर यांनी आखाडय़ात येऊन प्रेक्षकांना अभिवादन केले. त्यानंतर मारूती माने यांचे आगमान झाले. त्यांनीही कुस्तीपेमींना अभिवादन केले. अखेर पाच वाजून पस्तीस मिनिटांनी कुस्तीला प्रारंभ झाला. दोघांनी एकमेकांच्या अंगावर माती टाकत अंदाज घेण्यास प्रारंभ केला. कोणीही धोका पत्करण्यास तयार नव्हते. तीन मिनिटांनी मारूती माने यांनी पट काढला. पण विष्णू सावर्डे यांनी त्यातून सुटका करून घेतली. त्यांनतर पंधरा मिनिटांनी मारुती माने पुन्हा आक्रमक झाले. अचानक पटात घुसून त्यांनी सावर्डेकर यांना खाली घेतले. सावर्डेकर त्यातूनही सुटका करण्यात यशस्वी ठरले. पाठोपाठ सावर्डकर यांनी मारूती माने यांना टांग मारण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. माने डाव रचत होते. आणि सावर्डे त्यातून सुटका करत होते. मध्येच थोडी बाचाबाची झाली.
पंचांनी मध्यस्थी केल्याने पुन्हा कुस्ती सुरू झाली. त्याचवेळी अंधार पडू लागल्याने गॅसच्या बत्त्या आणल्या गेल्या. दोघा मल्लांत प्रचंड चुरस सुरू झाली. माने यांनी आक्रमण केले की सावर्डे त्यांना रोखत आणि सावर्डे यांचे आक्रमण माने मोडून काढत. अशा स्थितीत घुटना, पट काढणे, हप्ते भरणे असे असंख्य डाव पाहण्यास मिळाले. लढत निकाली होत नव्हती. कुस्ती लांबत होती तरी मैदानावरील लोक जागचे न हलता दोन वाघांमधील ही लढत पाहण्यात दंग होते. अखेर सावर्डकर थोडे थकले, त्याचा लाभ उठवत माने यांनी घुटना डाव बांधला व सावर्डकर यांना पराभूत करून तब्बल पाऊने तीन तास चालेली ही लढत जिंकली आणि खासबागेत एकच जल्लोष झाला. शाब्बास मारूती माने अशा आरोळय़ांनी खासबागेत जल्लोष सुरू झाला. अनेकांनी फेटे उडवून आनंद व्यक्त केला. मारूती माने जयघोष सुरू होता. तब्बल अडीच तास चाललेली ही कुस्ती पाहून पैसे फिटले अशी भावना व्यक्त करत कुस्तीप्रेमी घरी परतले आणि खासबागेच्या इतिहासात एका प्रदीर्घ काळ चाललेल्या दमदार लढतीची नोंद झाली.
आजही या कुस्तीची चर्चा जुने जाणते कुस्तीप्रेमी करताना दिसतात.
या कुस्तीवेळी मारूती माने यांचे वय होते 28. वजन होते 211 पौंड, उंची होती 5 फूट 10 इंच, छाती होती 44 इंच आणि कंबर होती. 35 इंच.
विष्णूपंत सावर्डेकर यांचे वय होते 32, वजन होते 194 पौंड, उंची होती 5 फूट साडेनऊ इंच, छाती होती 44 इंच आणि कंबर होती 35 इंच.
या कुस्तीवर मी बनवलेला माहितीपट पहा.
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
www.facebook.com/kustimallavidya
Tags
ऐतिहासिक कुस्त्या