कुस्तीसम्राट पै.अस्लम काझी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै.नरसिंह यादव यांची इतिहासाच्या पडद्याआड गेलेली अजरामर ऐतिहासिक कुस्ती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१ तास २० मिनिटे दोन महावादळे एकमेकावर तुटून पडली होती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
लेखन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोल्हापूर म्हणजे मल्लविद्येचे माहेरघर अशी ख्याती महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतवर्ष आणि भारताबाहेर देखील आहे.राजर्षी छत्रपती शाहू महाराज या कुस्तीवेड्या अवलियाने स्वताच्या खासगी बागेत राजस्त्रीयांना फिरण्यासाठी म्हणून असलेल्या खासगी बगीचा असलेल्या जागेत १९१२ साली रोम च्या ‘रोसरोम’ च्या तोडीचे एक सायसंगीण कुस्ती मैदान बांधले आणि त्याचे नाव ठेवले ‘खासबाग कुस्ती मैदान’
खास कुस्तीसाठी म्हणून त्याकाळी लाखो रुपये खर्चून बांधले गेलेले आधुनिक इतिहासातील पहिलेच मैदान म्हणजे खासबाग मैदान होय.
शाहू राजांनी कोल्हापुरात अनेक तालमी स्थापन करून हिंदुस्थानातील अनेक मल्लांना दत्तक घेऊन त्यांच्या खुराकाची व्यवस्था केली आणि दर शुक्रवारी याच मैदानात कुस्त्या सुरु केल्या.
मल्लांना बक्षीस म्हणून ‘गदा’ देण्याची प्रथाही याच राजाने याकाळात सुरु केली.कुस्तीतील अनेक रेकोर्डब्रेक कामगिरी राजांनी कोणत्याही प्रसिद्धीशिवाय केली.गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड त्याकाळी असते तर विक्रमांचे रकानेच्या रकाने केवळ शाहूराजांच्या वर नोंदले गेले असते.
वर्षभर जवळपास सरासरी समान तापमान,दुध,तूप यासारखे सकस व स्वस्त खाद्य,पेठापेठांमध्ये असलेल्या तालमी आणि दर शुक्रवारी आपला पराक्रम दाखवायला होत असलेले कुस्ती मैदान यामुळे कोल्हापुरात हिंदुस्थानातील अनेक दिग्गज मल्लांचे पाय वळू लागले आणि कोल्हापूर हे कुस्तीचे अघोषित विद्यापीठच बनले.
अश्या ऐतिहासिक कुस्ती मैदानात भारतातील अनेक मल्लांनी आपला पराक्रम दाखवला.
१९१२ ते आजतागायत हजारो कुस्ती मैदाने या मातीत पार पडली.
मात्र काळाच्या या अभेद्य पडद्याआड या मैदानात अश्या काही कुस्त्या झाल्या ज्या कुस्त्या कुस्ती इतिहास कधीच विसरू शकला नाही.६ मार्च १९६५ ची हिंदकेसरी मारुती माने विरुद्ध मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डेकर ही शतकातील सर्वात दीर्घ काळ म्हणजे २ तास ४५ मिनिटे चाललेली कुस्ती आजही अनेक कुस्तीशौकीन जणू काही काल परवा ही कुस्ती झाल्यासारखे चवीने सांगतात.
ही कुस्ती जिंकली मारुती माने यांनी पण सांगताना जणू काही मारुती माने नव्हे तर मीच कुस्ती जिंकली इतका आपलेपणा असतो अनेक वृद्ध मल्लांच्यात जेव्हा या कुस्तीचा उल्लेख होत असतो.
अशीच एक अजरामर ऐतिहासिक कुस्ती आज आपणास सांगू वाटत आहे जी कुस्ती ज्यांनी ज्यांनी डोळ्यांनी पहिली त्यांच्या जीवनाचे सार्थक झाले असे मी म्हणेन.
निमित्त होते ‘गोकुळ दुध केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आणि तारीख होती २८ फेब्रुवारी २०१०.
ती कुस्ती होती कुस्तीसम्राट अस्लम काझी विरुद्ध ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंह यादव यांची.
२८ फेब्रुवारी २०१० साली जेव्हा ही कुस्ती झाली तेव्हा अस्लम काझी कुस्तीसम्राट पुरस्काराने भूषित नव्हता आणि नरसिंह यादव सुध्दा एकदाही महाराष्ट्र केसरी झाला नव्हता.
पण,नरसिंह यादव हा त्याच वर्षीचा ‘एशियन कुस्ती स्पर्धाचा आणि राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेचा सुवर्णपदकाचा मानकरी’ होता.
पै.अस्लम काझी हे मुळचे सोलापूर जिल्हा माढा तालुक्यातील कुरुडूवाडी गावचे तुफानी मल्ल.कोल्हापूर च्या गंगावेस तालमीमध्ये वस्ताद डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर आणि विश्वास हारुगले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होते.
महाराष्ट्रात अस्लम काझी यांची कुस्ती ठरली की मैदानात उभे रहायला सुध्दा जागा मिळणार नाही असे समीकरण होते.डाव-प्रतिडाव आणि तुफानी निकाली कुस्ती हे असलम काझी यांच्या कुस्तीचे वैशिष्ट्य.
तर मुळचा बनारस उत्तरप्रदेश चा असलेला मात्र मुंबई मध्ये स्थायिक असणारा पै.नरसिंह यादव हा एका गवळी कुटुंबात लहानाचा मोठा झाला,वडील दुध विकून मुलाला मोठा पैलवान होण्याचे स्वपन पाहत होते तर नरसिंह ने त्यांच्या स्वप्नासाठी जीवतोड मेहनत घेऊन २०१० च्या एशियन चाम्पियान्शीप आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक कमावून भारताचा झेंडा जगात उंच नेला होता.
महाराष्ट्राच्या तांबड्या मातीच्या निकाली कुस्तीत महाराष्ट्राच्या अनेक झंझावाती मल्लांना लीलया लोळवणारा नरसिंह यादव ची कुस्ती जो बघेल त्याच्या डोळ्याचे पारणे फेडणारी असायची.
२०१० साली गोकुळ केसरी च्या निमित्ताने ही कुस्ती मुकर्रर करण्यात आली.वास्तविक गोकुळ केसरी कोण हे गुणावर आधारित आधुनिक कुस्तीवर ठरले जायचे मात्र गतवर्षी म्हणजे २००९ साली पासून मानाची क्रमांक एकची कुस्ती अगोदर ठरवून लावली जायची त्याचे हे दुसरे वर्ष होते.
कोल्हापूरचे अनेक जाणते मल्ल,राजकारणी,उद्योजक,शासकीय अधिकारी यासह किमान ३ लाख प्रेक्षकांच्या साक्षीने ही दोन महावादळे एकमेकावर अक्षरश तुटून पडली होती.
सायंकाळच्या सुमारास जेष्ठ कुस्तीनिवेदक आपल्या आवाजात दोन्हीही मल्लांची कुस्ती पुकारली गेली आणि मैदानाच्या उत्तर बाजूने कपडे काढून पैलवान अस्लम काझी आत आला.
सोन्यासारख्या नितळ शरीरयष्टीच्या अस्लम काझी ने मैदानात येताच तांबड्या मातीला वंदन केले आणि ‘खाड..... खाड..... खाड.....’ असा शड्डू ठोकला आणि सारे मैदानच हादरून सोडले आणि दुसर्या क्षणात मैदानाला धावत प्रदिक्षणा काढली आणि उपस्थित कुस्तीशौकीनांनी टाळ्या वाजवल्या.
काही क्षण भूतकाळात गेले आणि मुख्य प्रवेशद्वारातून शांत आणि संयमी स्वभावाचा नरसिंह मैदानात आला आणि शरीर गरम करू लागला.
मैदानात उपस्थित असलेल्या मंत्रीमहोदय,आमदार,खासदार त्याचबरोबर कला,क्रीडा,साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या हस्ते या कुस्तीची हातसलामी झडली आणि ३ लाख प्रेक्षकांचे ६ लाख डोळे श्वास रोखून ती कुस्ती पाहू लागले.
चौदंडी करून एकमेकांची ताकद आजमावून झाल्यानंतर दोन्हीही मल्लांनी आपापल्या जवळ दीर्घ तपश्चर्येने आत्मसात केलेली अस्त्रे काढायला व त्याचा रोमांचकारी वापर करायला सुरवात केली.
एकाने जीवतोड डाव केला की कि दुसरा तो लीलया परतावून लावू लागला आणि बघता बघता ती दोन्ही शरीरे घामाच्या चिखलाने एखाद्या पावसाळी चिरेबंदी बुरुजासारखी दिसू लागली.
नरसिंह ने आक्रमक पवित्रा घेऊन अस्लम काझी वर कब्जा मिळवला आणि घिसा डाव मारला मात्र सावध अस्लम काझी त्यातून बचावला आणि क्षणार्धात दसरंग फिरत नरसिंह वर कब्जा घेतला आणि उपस्थित प्रेक्षक टाळया वाजवू लागले.
दुसर्याच क्षणाला अस्लम काझी ने एकचाक डाव बांधून नरसिंह ची पाठ जमिनीला लावली आणि विजयी मुद्रेने नाचत प्रेक्षकांना अभिवादन करू लागला.
पंच म्हणून उभे असलेले जेष्ठ पंच मा.संभाजी वरुटे सर यांनी कुस्ती विजयी दिली......मात्र उपस्थित जनतेने नाही असे हातवारे करत सदर कुस्ती निकाली झाली नाही असे सांगितले.
पण,वास्तविक पाहता ही कुस्ती निकाली झाली होती...पण पै.अस्लम काझी यांनी एकवार प्रेक्षकांच्या कडे पाहिले आणि सर्वाना नमस्कार केला व पुन्हा शड्डू ठोकून नरसिंह बरोबर खेळायला तयार झाला.
अस्लम काझी यांची ही खिलाडूवृत्ती पाहून सारेच भारावू गेले होते.
पुन्हा खडाखडी कुस्ती सुरु झाली आणि तब्बल १ तास २० व्या मिनिटाला पैलवान अस्लम काझी यांनी सर्व ताकद एकवटून नरसिंह यादव चे हप्ते डाव मारून हप्ते मोडले आणि छातीवर बसून विजयी आरोळी दिली.....आता मात्र सारेच प्रेक्षक आनंदाने बेभान होऊन मैदानात घुसले आणि अस्लम काझी यांनी डोक्यावर घेऊन मैदानाला विजयी प्रदक्षणा काढू लागले.
मान्यवरांच्या हस्ते अस्लम काझी याना मानाची गदा व गोकुळ केसरी किताब प्रदान करण्यात आली.
पुढच्या काळात अश्या तब्बल ५१ गदा पैलवान अस्लम काझी यांनी त्यांच्या कुस्ती कारकिर्दीत लढून मिळवल्या आणि कुस्तीसम्राट हा मानाचा किताब मिळवला.
तर,पैलवान नरसिंह यादव याने मैदानी कुस्तीतून निवृत्ती घेत तांत्रिक कुस्तीकडे लक्ष दिले आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी बनून इतिहास निर्माण केला यासह अनेक आंतरराष्ट्रीय पदके देशासाठी मिळवून ऑलिम्पिक सारख्या मानाच्या खेळात भरारी मारली.
पण,याही पेक्षा अस्लम काझी आणि नरसिंह यादव यांची झालेली ही तुफानी कुस्ती आजही अनेक कुस्तीशौकीन विसरू शकले नाहीत.
त्या अजरामर कुस्तीचे वर्णन आज कुस्ती-मल्लविद्या वाचकांसाठी खास देत आहे यातून प्रेरणा घेत भविष्यात महाराष्ट्रात अनेक मल्ल घडावेत ही अपेक्षा.
या कुस्तीचा पूर्ण VIDEO आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहे खालील लिंक वरून सर्वांनी ती ऐतिहासिक व अजरामर कुस्ती पहावी व प्रतिक्रिया द्यावी.
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
WWW.FACEBOOK.COM/KUSTIMALLAVIDYA
Tags
ऐतिहासिक कुस्त्या
Mahendra Mali
ReplyDelete