पुण्यात वसवले मल्लविद्येचे गोकुळ : बी.ए.लॉरेन्स ते रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार,पुण्याच्या कुस्तीचे बदलते पर्व
आमचे मित्र,बंधू व कुस्ती मल्लविद्या महासंघाचे प्रवक्ते पैलवान संदीप बापू रास्कर यांनी नुकताच एक विडिओ पाठवला ज्यात एक वयोवृद्ध वस्ताद कुस्तीवर भरभरून बोलताना दिसत आहेत.वस्ताद म्हणतात की पुण्याच्या कुस्तीला गोकुळ वस्ताद तालमीचे वस्ताद हरिश्चंद्र बिराजदार यांनी वैभव कळस चढवला.आज जी पुण्यात कुस्ती बहरत आहे त्याची सुरवात गोकुळ वस्ताद तालमीतून झाली.
विडिओ पाहिला आणि पुण्याच्या कुस्तीचा मागील 100 वर्षांचा काळ डोळ्यासमोरून झरझरू लागला.विडिओ मधील वस्ताद जे म्हणत होते ते 100% सत्य वाटू लागले.
आज पुण्याला कुस्तीसाठी सोन्याचे दिवस आले आहेत मात्र एक काळ असा होता की पुण्यातील कुस्ती लोप पावण्याच्या अवस्थेत होती.पुण्यात एकूण 84 तालमी होत्या मात्र एकमेकांत हेवेदावे जास्त.
साधारण 1930 च्या सुमारास हे हेवेदावे घालवून मजबूत संघटना बांधून कुस्तीला चांगले दिवस आणायचे असतील तर सर्वप्रथम या तालमीच्या वस्ताद मंडळींना एकत्र आणावे लागेल.
त्याकाळी एखाद्या मल्लास एखाद्याने चित केले असता पडणाऱ्या पैलवानांच्या कुस्त्या ठेकेदार घेत नसायचे.त्यामुळे पडेल पैलवानांची निराशा होऊन ते सांगली, सातारा,कराड इतरत्र लढतीला जात असे.
त्यामुळे मल्लांची उपासमार होऊन मल्लविद्या लोप पावायची चिन्हे दिसू लागली.
पुण्यातील रे मार्केटच्या मैदानावर वस्ताद अहमदभाई तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील 84 तालमीतल्या वस्तादांची सभा 26 जानेवारी 1930 साली झाली व पडणाऱ्या पैलवानांस जोड देऊन त्यांचे स्थलांतर थांबवण्याचा महत्वकांक्षी निर्णय एका ब्रिटिश मल्लाने शुद्ध मराठीत सांगितला.
यांचे नाव होते बी.ए.लॉरेन्स.आपल्या मराठी मंडळींना लॉरेन्स उच्चार जमत नसल्याने त्याचा अपभ्रंश होऊन त्यांना लाडीस साहेब असेच म्हणत असे.
हे लाडीस साहेब 6 फूट 5 इंच उंच होते.
कोल्हापूर संस्थानचे जे थोरले शाहू छत्रपती यांच्या घोडे विभागात ते बरेच वर्षे रनर होते.
ते 50-60 मैल घोड्यासोबत धावत असायचे म्हणे.घोड्याला धावायचे ट्रेनिंग हे द्यायचे.
त्यानंतर महाराजांच्या बऱ्याच तालमीत अनेक दिग्गज पैलवान मंडळींसोबत लाडीस साहेबांचा सहवास होता त्यामुळे कुस्तीतील बारकावे याना बहुतांशी माहिती होते.सारी ह्यात पश्चिम महाराष्ट्रात गेल्याने मराठी अगदी स्पष्ट बोलायचे हे गृहस्थ.
सध्या पुणे राष्ट्रीय तालीम संघ यांच्या कार्याचा डामडौल अतिशय मोठा आहे मात्र याची मुहूर्तमेढ लाडीस साहेबांनी 1930 साली रोवली ती वस्तादांची एकी करून व पडणाऱ्या मल्लास जोड देऊन.
पुढे फाळणीनंतर लॉरेन्स घराणे इंग्लंड ला गेले मात्र त्यांच्या काळजात पुण्यातील या अविसमरनिय आठवणी नक्किच ठासून भरल्या असतील.
आम्ही मात्र त्यांना कायमचे विसरून गेलो ही आमची शोकांतिका.
पडेल मल्लास जोड देण्याची व्यवस्था झाली पण पुण्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणारे कुस्तीगीर घडावेत हा विचार 1984 साली आणला तो हरिश्चंद्र बिराजदार यांनी.गंगावेश तालमीचे तुफानी पैलवान ज्यांनी सतपाल नावाचे वादळ रोखले,राष्ट्रकुल सुवर्णपदक, ऑलिंपिक पर्यंत मजल मारली.भारताच्या कुस्तीत रुस्तुम ए हिंद सारखा मानाचा 'किताब मिळवला. असे बिराजदार पुण्यात आले ते नवी पेठेतील गोकुळ वस्ताद तालमीत.त्याकाळी मोडकळीस आलेली तालीम मामांनी सुरु केली.तालमीचे अध्यक्ष पठारे बंधू व परिसरातील दानशूर लोकांनी एवढा मोठा पैलवान आपल्याकडे आले म्हणून तालमीला सढळ हाताने मदत केली आणि त्यानंतर गोकुळ वस्ताद च्या रुपात कुस्ती रुजली,बहरली व वैभवसंपन्न झाली.कित्येक महाराष्ट्र केसरी,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्ल घडले हे लिहायला अजून एक लेख लागेल पण गोकुळ वस्ताद तालमीत सराव करणारा सर्वात चुकार,रटाळ पैलवान देखील महाराष्ट्र चॅम्पियन होता इतकी गुणवत्ता त्याठिकाणी भरली.
गोकुळ वस्ताद तालमीत पुण्यातील हर एक तालुका,गाव सामील झाले.अनेक घराणी याठिकाणी वाढली.पूर्वीचे पंथ आणि पठडी याचा परीघ ओलांडत पुण्याच्या कुस्तीने राज्य,राष्ट्राच्या सीमा ओलांडल्या.
केवळ चांगले पैलवान नव्हे तर चांगली माणसे घडवली.आकाशाला गवसणी घालणारे त्यांचे शिष्य आजही महाराष्ट्रभर कुस्ती वाढवत आहेत.
जे लाडीस साहेबांनी 1930 साली केले तेच मामांनी आजमितीला करुन दाखवले.
कुस्तीत इतकी कारकीर्द वाढवून देखील आजन्म आपली विनम्रता आणि प्रामाणिकपणा सोडला नाही.
पुणे ही विद्यानगरी म्हणून जगभर नावाजली असेल मात्र पुणे कुस्तीचे गोकुळ वसवले ते बिराजदार मामांनी आणि ते सुध्दा सर्वांची मने जिंकून,विनम्र राहून.
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
kustimallavidya.com
Tags
प्रेरणात्मक लेख