"गदा" निवडणूक चिन्ह असू शकत नाही,गदा ही वीरांच्या खांद्यावर शोभते आणि ती लढून मिळवावी लागते याचे भान ठेवावे

"गदा" निवडणूक चिन्ह असू शकत नाही,गदा ही वीरांच्या खांद्यावर शोभते आणि ती लढून मिळवावी लागते याचे भान ठेवावे
गदा हे पैलवानांचे भूषण आहे.राजर्षी शाहू महाराजांनी पैलवानांना गदा बक्षीस देण्याची प्रथा सुरू केली.महाबली हनुमानाच्या शस्त्राचे प्रतीक असणारी गदा ही हनुमंताप्रमाणे ब्रम्हचर्य पालन करुन, अपार कष्ट,मेहनत घेऊन, तपस्वी जीवन जगून कुस्ती खेळून लढून मिळवावी लागते.महाराष्ट्र व देशात प्रत्येक पैलवानांचे स्वप्न असते की माझ्या खांद्यावर महाराष्ट्र केसरी,हिंदकेसरी ची गदा असावी.अखंड घराणीच्या घराणी या गदेसाठी आपले आयुष्य पणाला लावत असतात. गदा केवळ शस्त्र नाही तर त्यात तमाम कुस्तीगीर,पैलवान, वस्ताद,पालक यांच्या भावना गुंतल्या असतात.
सध्या निवडणूक आयोगाच्या चिन्ह देण्यावरून वाचत असताना "गदा" हे निवडणुकीचे चिन्ह देण्यावरुन बातम्या वाचल्या आणि तळपायाची आग मस्तकात गेली.गदा हे राजकारण्यांच्या वापराचा विषय होत आहे ही शरमेची बाब आहे.आज चिन्ह म्हणून गदा तर आली तर उद्या गल्लोगल्ली संबंधित पक्षाचे कार्यकर्ते गदा वाटताना दिसतील आणि कुस्तीगीरांसाठी पवित्र असणाऱ्या गदेचा अवमान होऊन त्याचे मूल्य कमी होईल.

गदा लढून जिंकावी लागते असे शाहू महाराज म्हणायचे. गदा हे शस्त्र बाहुबलाने अजिंक्य असणारे योध्ये जसे हनुमान,भीम,जरासंध,जांबुवंत,दुर्योधन आदी योध्ये वापरत असे.गदा या योध्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळात लाकडी स्वरूपात फिरवायची कामगिरी पैलवान करत असे जेणेकरुन युद्धात तलवार चालवणे सोपे जाईल.अशी गदा 19व्या शतकात शाहू महाराजांनी विजेत्या बलाढ्य पैलवानास बक्षीस म्हणून देण्याची प्रथा सुरू केली.महाराष्ट्र केसरी ची गदा म्हणजे महाराष्ट्रातील पैलवान ऑलिंपिक पदकासमान समजतात.महाराष्ट्र केसरी सारख्या मानाच्या स्पर्धेत गदा बक्षीस देतात.हिंदकेसरी स्पर्धेत विजेत्या मल्लास गदा दिली जाते.अशी गदा जर राजकीय चिन्ह म्हणून वापरात आली तर काय किंमत राहिली पैलवानांच्या मेहनतीची.
मी कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे निवडणूक आयोगाला विनंती करतो की किमान निवडणूक चिन्ह म्हणून गदा देऊ नये.आम्हा कुस्ती क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या भावना लक्षात घ्याव्यात,पैलवानांच्या भावना आणि इतिहास याच्याशी खेळू नये.गदा निवडणूक चिन्ह असू शकत नाही,गदा ही वीरांच्या खांद्यावर शोभते आणि ती लढून मिळवावी लागते याचे भान ठेवावे.

पै.गणेश मानुगडे
Kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form