दिवाळीतील तो अंधार माझे आयुष्य उजळून गेला : दिवाळीतील अविस्मरणीय आठवण - पै.राहुल आवारे

दिवाळीतील तो अंधार माझे आयुष्य उजळून गेला : दिवाळीतील अविस्मरणीय आठवण

पै.राहुल आवारे.
पै.राहुल आवारे यांनी फेसबुक पोस्ट द्वारे सांगितलेली एक ह्रदयस्पर्शी आठवण

मी माझ्या गावातुन पुण्यात आलो.रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामांनी माझ्या वडिलांना सांगितले की या राहुल मध्ये मी दुसरा काका पवार बघतोय,याला गावात ठेऊ नको.
मग माझ्या वडिलांनी मला गरजेचे सामान सोबत देऊन पुण्याच्या गोकुळ वस्ताद तालमीत मामांच्या मार्गदर्शनाखाली पाठवले.

गावात दंगा,मस्ती आणि कुस्ती याशिवाय मी काहीच केलेले नव्हते,तर गोकुळ वस्ताद तालमीत मामांची कडवी शिस्त.व्यायाम,मेहनत याचे महत्व.नित्यनियमितपणा हे सारे मला नवीन होते.
पण,वरवर कडक शिस्त असणाऱ्या मामांच्या प्रेमळ स्वभावाने मी रुळू लागलो.

दिवस भरभर संपू लागले,माझा सराव इतर मुलांच्या मानाने चांगला होत होता.
जवळपास तालमीत एक वर्ष पूर्ण होत आले.
2004 सालची दिवाळी तोंडावर आली.
तालमीतली मुलांना दिवाळीला घरे जाणे बंदी असायची.फक्त लहान मुलांनाच परवानगी होती, मोठे पैलवान यांना मामा दिवाळी ला सुद्धा घरी पाठवत नसायचे.
मी लहान होतो त्यामुळे मला घरी सोडणार म्हणून मी आनंदी होतो.
कितीतरी दिवसांनी गाव बघणार होतो.आई-वडील सर्वांची आठवण यायची.
जसे जसे दिवाळी जवळ येऊ लागली तसे तसे सर्व लहान मुले मामांना विचारून परवानगी काढून घरी जाऊ लागले.
पण मला काही केल्या मामांना विचारायचे धाडस होईना,मी पण तसा लहान होतो,पण जोडीत चांगला खेळत असायचा.

पण,शेवटी मी धाडस केलेच...भीती भीती मामांना विचारले..मी दिवाळीला घरी जाऊन येऊ का ?
मामा एका मिनिटात बोलले
"अजिबात नाही"
तोंडावर कुमार महाराष्ट्र केसरी,महाराष्ट्र केसरी सारख्या स्पर्धा आल्यात आणि तू दिवाळीला कुठं जाणार ?
एक एक तास महत्वाचा आहे तुला,अजिबात जायचे नाही.

मामा नाही म्हणाले, मी निमूट गप्प बसलो.
माझ्या वयाची सारी मुले आनंदाने घरी गेली आणि मी एकटाच माझ्या वयाचा तिथं राहिलो होतो.
मला सारखी गावची आठवण यायची.
काहीही होवो दिवाळीला जायचेच म्हणून संध्याकाळी STD फोन वरून घरी वडिलांना फोन लावला.

वडिलांना बोललो कि मला दिवाळी ला तरी घरी येऊद्या, वर्षभर येतो बोललोय का ?
मामा जाऊ नको म्हणाले,तुम्ही त्यांना फोन करा की मला सोडायला आणि मी फोनवर रडू लागलो.
यावर आमचे वडील मला धीर देण्याऐवजी मलाच रागावले..शिव्या देऊ लागले.
मामा नाही म्हणतात तर तू का येणार इकडे ?
दिवाळी नाही केली तर मरणार तर नाहीस तू,अजिबात नाही यायचे.
पण मी ऐकले नाही,आईकडे फोन द्यायला सांगितले.आईला पण सांगितले मामांना सांग,मी येणार आहे दिवाळीला.
पण,वडिलांच्या पुढे आई काय बोलणार, ती पण मलाच समजावू लागली.
माझा हुंदका काही थांबत नव्हता.

मला त्या दिवशी सगळ्यांचा राग आला.पण गुमान तालमीत आलो आणि परत नित्यक्रम सुरु.

दिवाळीचा दिवस उगवला.बरोबर चे मुले नवीन कपडे ,उटणे लावून अंघोळ,फटाके वाजवत होते तेव्हा मी तालमीत घामाने चिंब होऊन मेहनत करत होतो.

सराव संपला आणि मामांनी मला उटणे,फराळाचे आणलेला दिले..मी काही न बोलता घेतले आणि निघून गेलो.

मामांना समजले की दिवाळीला सोडले नाही म्हणून मला राग आलाय ते...

त्या दिवशी संध्याकाळी प्रॅक्टिस संपली आणि मामांनी मला एकट्याला बोलवून घेतले...डोक्यावरून हात फिरवत बोलले..

"राहुल,दिवाळीला सोडलं नाही म्हणून तुला राग आला आहे मला माहिती आहे,पण पैलवानांसाठी दिवाळी, दसरा,सारे कुस्ती मेहनत असते.
मी ज्यावेळी कुस्ती खेळत होतो तेव्हा मी कोल्हापूर ला गंगावेस तालमीत राहत होतो,एकदा दिवाळीच्या सणाच्या दोन दिवस आधी एक मैदान होते लातूर ला.
लातूर माझे गावच,अगदी काही अंतरावर रामलिंग मूदगड होते,पण कुस्त्या झाल्या आणि आम्ही परत कोल्हापूर ला आलो.
मनात आले होते की दिवाळी सण खाऊन मग तालमीत यावे पण तोंडावर अनेक स्पर्धा होत्या,एक एक तास मला महत्वाचा होता.
राहुल,तुला मोठे पैलवान व्हायच आहे.राष्ट्रकुल,एशियन,ऑलिम्पिक पर्यन्त जायचे असेल तर खूप कठोर मेहनत लागते.मी 14 वर्षे दिवाळीला घरी गेलेलो नव्हतो.
तुझ्यात ती क्षमता आहे म्हणून मी बोलतोय असे.

मामा बोलत होते मी ऐकत होतो.
त्यावेळी हे सारे शब्द मला नवीन होते.काय समजत नव्हते,कसल्या स्पर्धा आणि काय ते.
फक्त माझा राग गेला.

दिवस जाऊ लागले तशी माझी कुस्ती पूर्वीपेक्षा सुधारत गेली.
रोज मेहनत कष्ट करायची गोडी लागली.
मनात विचार केला की मामा जर 14 वर्षे तालीम सोडून गेले नाहीत तर मी पण जाणार नाही.

त्यानंतर 8 वर्षे म्हणजे 2012 पर्यन्त मी ना दिवाळी पहिली ना घरच्या भावंडांची भावकीची लग्ने पाहिली.

हे सर्व मी केले ते माझ्या गुरुंच्या कै. हरिश्चंद्र बिराजदार मामा यांच्या शिकवणीमुळे.
आज मामा माझ्या जवळ नाहीत,पण माझ्या प्रत्येक श्वासात,प्रत्येक कृतीत,विचारात फक्त आणि फक्त मामा आहेत..त्यांच्या शिकवणीवर आणि आठवणीवर हा राहुल आवारे अजून जीवन्त आहे.
मी कुठल्या जन्मी पुण्य केले असेल देवाला माहिती मला मामासारखे पैलवान गुरु म्हणून मिळाले.

आज खूप उणीव भासते मामांची.

राहुल आवारे

🙏🏼🙏🏼🙏🏼😭😭😭🙏🏼

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form