पैलवान राहुल आवारे यांचे वरीष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तब्बल 8 वे पदक - एक आदर्शवत कामगिरी

पैलवान राहुल आवारे यांचे वरीष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तब्बल 8 वे पदक
मराठमोळा पैलवान,अर्जुनवीर,पोलीस उप अधीक्षक राहुल आवारे यांनी नुकत्याच विशाखापट्टणम येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 61 किलो फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात रौप्यपदक जिंकले.वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा ही देशातील अतिशय मानाची कुस्ती स्पर्धा होय ज्यानंतरच पैलवानांसाठी सिनियर वजनी गटात आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे दरवाजे उघडले जातात.अश्या स्पर्धेतील एक पदक म्हणजे एक सरकारी नोकरी होय.अश्या स्पर्धेत पैलवान राहुल आवारे यांनी मिळवलेले हे 8 वे पदक होय.याअगोदर कोणीही इतक्या प्रदीर्घ काळात सिनियर मधील पदक कुस्ती या खेळात जिंकले नाही.
(पै.राहुल आवारे यांच्या 8व्या राष्ट्रीय पदकाचे कौतुक करताना अप्पर पोलीस महासंचालक SRPF मा.श्री.चिरंजीव प्रसाद सो)

यापूर्वी 57 वजनी गटात पैलवान राहुल ने पदके जिंकले ज्यातील बहुतांशी सुवर्णपदके आहेत.गतवर्षी पासून राहुल सांसारिक कर्तव्य आणि महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्याचे कर्तव्य अश्या दुहेरी जबाबदाऱ्या पेलत असताना सरावाला एकाग्रता व वेळ दोन्ही अपुरे होते मात्र यावर्षी राहुल आवारे यांनी अथक मेहनत करुन पुन्हा यशस्वी कमबॅक केले आहे.
महाराष्ट्रातील मल्लांसाठी हा एक आदर्श निर्माण केला आहे.2008 पासून ते 2022 तब्बल 14 वर्षे सिनियर मध्ये पदके जिंकणे सोपी गोष्ट नसते.57 किलो वजन गटात खेळताना वजनावर नियंत्रण राखत सराव करणे हे काळानुरूप अवघड गोष्ट आहे कारण दरम्यान हाडांचे वजनही वाढत असते.मग मांस व मेद घटवून घटवून घटवणार तरी किती.57 असा वजनी गट आहे ज्याच्या पुढे ऑलिंपिक चॅम्पियन आहेत.मग 61 किलो वजन गट निवडून त्यात लढणे जरी पोक्तपणाचे असले तरी 61 किलो हा ऑलिंपिकचा वजन गट नाही.यापूढे राहुल पुढील अडचणी आणि संकटे याचा विचार करता मागील वजन गट 57 kg हा रवी दहिया चा आहे तर पुढचा 65 kg हा बजरंग पुनिया चा आहे जे दोन्ही ऑलिंपिक पदक विजेते आहेत. मात्र सध्या तरी 61 kg मधून पैलवान राहुल आवारे यांनी सराव शिबिरासाठी पात्रता सिद्ध केली आणि येणारा काळ व त्याची मेहनत पुढील यश अपयश ठरवेल हे मात्र नक्की.
खेळाडूंच्या दृष्टिकोनातून व त्यातल्या कुस्ती खेळाचा विचार करता पैलवान राहुन आवारे यांनी जी यश मिळवले आहे ते नक्कीच वाखाणण्याजोगे आहे.याअगोदर आणि यानंतर सुद्धा अशी कुस्ती कारकीर्द बघायला व पहायला मिळणे केवळ एखाद्या चित्रपटातील पटकथा वाटावे असे आहे.कष्ट,जिद्द मेहनत,राजकारण,वैयक्तिक संकटे, सामाजिक जाणिव आणि जीवनातील कर्तव्ये सांभाळत आजही भारतातील एक-दोन नंबरचा पैलवान म्हणून आपले अस्तित्व राखणे ही बाब तमाम कुस्तीगिरांसाठी नक्कीच प्रेरणा देणारी आहे.
यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचे आभार कारण त्यांच्या सेवेतील एक अधिकारी सिनियर नॅशनल मध्ये पदक जिंकत आहे व आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देखील राज्याचे,देशाचे व पोलीस दलाचे नाव उंचावेल यात शंका नाही.खेळाडूंना शासकीय नोकरीत सामावून घेणे ही बाब चांगली असली तरी त्यानंतर त्याला सरावाला पुरेशी सवलत मिळाली नाही तर अनेक मोठे खेळाडू संबंधित खेळापासून दुरावले जातात ही वस्तुस्थिती आहे.खेळाडूंना नोकरी हवीच पण पुन्हा खेळात मोठे होण्यासाठी सवलती हव्यात ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखी आहे.
पै.राहुल आवारे यांचे कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
Kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form