रुस्तुम ए हिंद पैलवान विष्णुपंत नागराळे यांच्या पुण्यतिथी निमित्त खास लेख

रुस्तुम ए हिंद पैलवान विष्णुपंत नागराळे यांची 66 वी पुण्यतिथी
•••••••••••••••••
लेखन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ
•••••••••••••••••
ऐन पंचविशितला अम्मल.पैलवान मात्र अशा ऐटीत दिसे की,जणु चित्री रेखल्याप्रमाणे.भरदार छाती पिळदार दंड,खांद्यावर गदा,कसदार मांड,सिंहकटी कंबर,कोवळा बांड,चिरेबंदी देह, त्याला नाही तोड,डोक्यावर कोल्हापुरी बादली फेटा,अंगात मलमली रेशमी सदरा,धोतर व पायात कोल्हापुरी चढाव.मयुरासारखी डौलदार चाल, हे पाहुन वाटे ही विभुती एक,नमावे त्याच्यापुढे तक्षणी.येती थोर अजुनही सुत असे या हिंदभुच्या कुशी.दाढीदार सतेज,शांत वदनी सौंदर्य हे निर्मळ.शक्ती युक्तीची युती जाहली.वाटे असे प्रेमळ.अशा वर्णमाची मुर्ती पाहीली म्हणजे विवेकानंदासारखा मुनिवर्य पृथ्वीवर अवरतला की काय असे वाटते.त्याची नजर इतकी तीक्ष्ण होती की नजरेच्या टापुत येणारे सर्व प्रसंग व सर्व व्यक्ति ते क्षणार्धात टिपुन घेत असत.अंगामधे वाघाची चपळता व छातीमधे सिंहाची हिंमत होती.चेहऱ्यावर प्रेमळ भाव असुनसुद्धा नजरेला नजर भिडवण्याची कोनाची हिंमत नव्हती.
कृष्णाकाठच्या मातीची रग अंगामधे असुनसुद्धा कृष्णेच्या पाण्याची निर्मलता त्याच्या मनामधे व पवित्रता त्याच्या देहामधे होती.मुर्ती लहान पण किर्ती महान.अशा व्यक्तीमत्वाला जन्म देणाऱ्या धन्य धन्य त्या मातेची व धन्य त्या मातीची.अशी अशी ही व्यक्ति म्हजे मल्लश्रेष्ठ मल्लांचा मेरुमनी,प्रतिस्पर्धी मल्लांचा कर्दनकाळ, मल्लविद्येचा व शक्तीचा उपासक रुस्तुम - ए - हिंद कैलासवासी पैलवान विष्णुपंत नागराळे.
शके १८४४ श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी हस्त नक्षत्र शनिवार तारीख २९ - ०८ - १९२२ या दिवशी नागराळे या छोट्याशा गावात पै विष्णुपंत नागराळे यांचा जन्म झाला. उगवत्या सुर्याबरोबर विजयाचा सुर्य उगवला.त्यांच्या घराण्यालाच पैलवानकीची परंपरा होती.त्याचे वडील बंधु आण्णासाहेब चव्हाण (दादा) हे ही उत्तम दर्जाचे पैलवान.पैलवानकीमधे आपल्या घराण्याचे व गावाचे नाव पुढे आणण्याची जी जिद्द होती ,ती त्यांच्याकडुन पुर्ण होवु शकली नाही म्हणून आण्णासाहेब चव्हाण (दादा)  यांनी आपला लहान भाऊ पैलवान विष्णुपंत नागराळे यांच्याकडुन ही राहीलेली इच्छा पुर्ण करण्यासाठी त्यांना लहानपनापासुन कुस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली.दादा त्यांच्याकडुन स्वःता कुस्ती मेहनत करुन घेत असत.प्रथम दादा हेच त्यांचे वस्ताद होते.लहानपणी पै. विष्णु नागराळे खेडोपाडी कुस्त्यांच्या फडावर जावुन कुस्ती करत असायचे.  बरोबर कुनी असो वा नसो,एकटेच फडावर जावुन एकेका फडावर तीन तीन चार चार कुस्त्या करत असायचे.त्यांचे डावपेच व चपळाता पाहुन त्यांच्या जोडीतील पैलवान त्याच्याशी कुस्ती धरत नसत. त्यांच्यापेक्षा मोठ्या जोडीतील पैलवानांच्याबरोबर त्यांना कुस्ती खेळावी लागत असे,तरीसुद्धा पैलवान विष्णुपंत नागराळे हे समोरच्या पैलवानाला चीत करत असत.पै.विष्णु नागराळे यांनी वयाच्या चौदाव्या वर्षापासुन वीस वर्षापर्यत अगणित कुस्त्या केल्या.महाराष्ट्रामधे जोडीतील असा एकही पैलवान ठेवला नाही.उभ्या महाराष्ट्रात बोटावर मोजण्यासारखे त्यांच्यापेक्षा मोठ्या जोडीतील पैलवान शिल्लक होते. पुढील चार पाच वर्षात त्यांनाही विष्णु नागराळे यांनी पाडले.ऐन वयाच्या विशीत त्यांनी मुंबईवर पहिली स्वारी केली.मुंबईचा रावसाहेब देऊरकर या नावाचा किल्ला सर केला व कुस्त्यांचे तोरण बांधुन पैलवानांनी गड जिंकण्यासाठी सुरुवात केली.रावसाहेब देऊरकर यांना टांगेवर मारले तर वाईच्या केशव घाडगे यांना घिश्यावर चीत केले.त्यावेळेला या भागात सखाराम बागडी प्रसिद्ध होत, त्याला ताकारीच्या मैदानात चारच मिनिटात टांगेवर आस्मान दाखवले.शिपुरच्या रामुला मुलतानीवर फेकले तर अंतु नरसिंगपुरकर व राघु बनपुरीकर याला पाचच मिनिटात लोळवले.
चिकाटीेने खेळणारा दमबाज व ताकतवान सांगलीचा बाबु पवार याला विट्याच्या मैदानात चितपट मारले.बेळगावचे भिमसेन शांडोला ढाकेवर फेकले आणि कुस्ती कलेतील एक झलक दाखवुन बेळगावमधील कुस्तीमध्ये प्रेमींची मने जिंकली.त्याच काळामधे धोंडीरामशेठ भोसले नागझरीकर यांनी सांगली जिल्ह्यातील दोन पैलवानांना आपला आसरा दिला होता. त्या पैलवांनाना महिना दोनशे पंन्नास रुपये मानधन चालु केले होते.त्या दोन पैलवानांपैकी एक पैलवान म्हणजे विष्णुपंत नागराळे होया.त्याच काळात मुंबईत एक प्रसिद्ध पंजाबी पैलवान आला होता.तेव्हा धोंडीरामशेठ नागझरीकर यांना वाटले की आपल्या पैलवानांनी त्या पंजाबीबरोबर कुस्ती करावी,म्हनुन त्या दोन्ही पैलवानांच्यासाठी त्यांनी त्या आशयाची पत्रे पाठवली.त्या पैकी एका पैलवानांनी त्या पंजाबीबरोबर कुस्ती करण्याचे नाकारले,परंतु पैलवान विष्णुपंत नागराळे यांना भोसले यांचे पत्र मिळताच ताबडतोब पत्राचे उत्तर पाठवले व त्या पत्रामधे ते म्हनाले होते की
"तीर्थरुप दादा यांना पै.विष्णु नागराळे यांचा स.न.वि.वि. पत्रास कारण की आपले पत्र पोहचले.मजकुर समजला.पत्र वाचुन आनंद झाला.आपण मला माणसाबरोबर कुस्ती करणेबद्दल विचारत आहात.आपण आमचे आश्रयदाते आहात.आपण सांगाल तर माणसाबरोबरच काय वाघाबरोबर ही झडप मारणेची तयारी आहे.फक्त कुस्तीची तारीख कळवा.त्या दिवशी खात्रीने विजय आपलाच असेल "
परंतु काही कारणास्तव ही कुस्ती ठरली नाही.तरीही त्या पत्रावर खुश होवुन पै.विष्णु नागराळे यांचे धाडस पाहुन धोंडीरामशेठ नागझरीकर यांनी त्याच्या मानधनात वाढ करत तीनशे रुपये मानधन केले.
विजयाबरोबर एकादा पराभवही खेळाडुच्या दृष्टीने महत्वपूर्ण असतो.आपल्या चुका समजावुन घेवुन सुधारणा करणेची संधी मिळते.पै.विष्णु नागराळे यांची पहिली आणि शेवटची हार म्हजे कोल्हापुरचा पैलवान आण्णापा पाडळकर यांचेबरोबर झालेली कुस्ती.त्यावेळी पै.विष्णु नागराळे आजारी होते.आजारी असतानाही प्रेक्षक नाराज होवु नयेत म्हनुन व ठेकेदार तोट्यात जावु नसे म्हनुन कुस्ती केली.दुर्दैवाने हार खावी लागली.परंतु मनात राहुन गेलेली खंत फार दिवस चैन पडुन देत नव्हती.म्हनुनच थोडे दिवसात आण्णापा पाडळकर यांचेबरोबर मुंबई येथे कुस्ती केली त्या कुस्ती मधे आण्णापा पाडळकर यांची दमछाक झाली होती.पै. विष्णु नागराळे यांच्या आयुष्यामधे त्यांना दमछाक म्हजे काय माहीत नव्हते.परंतु ही कुस्ती फार वेळ चाललेली असल्यामुळे बरोबरीत सोडवण्यात आली होती. दख्खनचा दिग्वीजयी युरोपीयन मल्ल जॉर्ज कॉन्टेनटाईन याचे आव्हाण स्विकारुन मुंबई येथे त्याचा पराभव केला. दक्षिण महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध मल्ल पै.शामराव मुळीक यांना तर एकाच डावावर तीन वेळा तीन ठिकाणी चीत केले. बंडालाल पंजाबीस सोडावुन घेतले तर कर्तारसिंह पैलवानाला टांगेवर उडवले.उत्तर भारतीय पैलवान भुपतीसिंग यास बेळगावचे मैदानात चांदण्या दाखवल्या तर जर्नलसिंह यास चीत करुन हैदराबाद गाजवले व  सर्व पैलवानांना हादरा दिला.म्हैसुरच्या मैदानातुन काल्या पंजाबीने पळ काढला,तर गुलबर्गा येथे अर्जुनसिंह पैलवानास गुल केले.सोलापुरमधे बोरामनी पैलवानस चित केले,त्यावेळी सोलापुरमधे कुस्ती शौकीन जनतेने हत्तीवरुन मिरवनुक काढुन पै. विष्णु नागराळे यांचे फार मोठे कौतुक केले होते.पुणे भागात गाजलेला पुणेकरांचा आवडता पैलवान रामचंद्र गवळी याने तर पराभवाच्या भितीने जमिनच सोडली नाही.उत्तर भारतीय बचनसिंह पंजाबी याची फजीती केली तर पहाडासारखा खडकसिंह पंजाबी पळुन गेला.हत्तीच्या ताकतीचा पै.गुत्तासिंह पंजाबी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुनसुद्धा ताकारी, नागझरी व वीटा येथे तीन वेळा कुस्ती करुन बरोबरीत सुटला. सांगलीच्या मैदानात नाना बेरड याला चारीमुंड्या चीत केले.ब्रम्हदेव भैयाने उकाडी खाल्ली तर करमजीत पैलवानने पराभव पत्करला.बेळगावच्या मैदानात गर्वाने छाती फुगवुन आरडत ओरडत व नाचत येणाऱ्या मोहनसिंह पंजाबीस अवघ्या सोळा मिनिटात चीतपट मारुन नागराळे गावचा हिसका दाखवला.रतनसिंह पंजाबी तर तीनच मिनिटात फणा ठेचलेल्या नागासारखा आपोआप उलटा झाला.  अकोळच्या मैदानात देव्वाप्पा हळींगळी पैलवानास सहाच मिनिटात बेजोड करुन मारले.मिरजेच्या मैदानात पै. जिन्नाप्पा आक्कीवाटे कुस्ती ऐवजी मारामारी करु लागला व स्वतःच मार सोसेना म्हनुन फुटलेले डोके धरुन मैदान सोडले.तो परत आलाच नाही.मुंबईच्या वल्लभभाई पटेल स्टेडीअमवर उत्तर भारतीय महाभयंकर पैलवान दुक्रनसिंह हा सुद्धा ४७ मिनिटांच्या कुस्तीनंतर पांगळा दिसु लागला. आणि धडपडत मैदानाच्या बाहेर पडला,तोसुद्धा मैदानात आलाच नाही.त्यानंतर उत्तर भारतीयांची शान सांगली साइराम पंजाबी यांचेबरोबर ५३ मिनिटे कुस्ती झाली.
विष्णु नागराळे यांनी उत्तर प्रदेश पंजाब,कर्नाटक व महाराष्ट्र आणि परदेशातही अजिंक्य ठरलेल्या पैलवानांना चारी मुंड्या चीत मारले,हे पाहुन पंजाब मधील जगप्रसिद्ध  पै. गामा घराण्याचा वारसदार भोला पंजाबी हा विष्णु नागराळे यांचा नक्षा उतरवण्यासाठी आपल्या सात भावासह ६५ पैलवानांचा लवाजमा घेवुन दक्षिणेत आला व आपल्या पैलवानांच्याबरोबर लढण्याचे आव्हाण संपूर्ण महाराष्ट्राला दिले.महाराष्ट्रामधे इतर कोनीही हे आव्हान स्विकारले नाही.  फक्त विष्णु नागराळे यांनी स्विकारले.प्रथम त्यातील तीन चार पैलवान बेजोड मारले म्हनुन विष्णु नागराळे यांचा अंदाज घेण्यासाठी त्या घराण्यातील भोला पंजाबीचा तीन नंबरचा भाऊ पै.आझम पंजाबी यांचेबरोबर कोल्हापुरच्या खासबाग मैदानात कुस्ती झाली.ती कुस्ती ७० मिनिटे होवुन बरोबरीत सुटली.ती कुस्ती अस्मरणिय झाली .ही कुस्ती पाहण्यासाठी कोल्हापुरचे राजे खुद्द आले होते.ही कुस्ती पाहुन राजे खुश झाले व त्यांनी पै. विष्णु नागराळे यांना जवळ बोलावुन पाठ थोपाटुन शाब्बासकी दिली व बहुमानाचा बादली फेटा बांधुन कौतुक केले.
ही कुस्ती सुटल्यानंतर भोलाचा नंबर दोनचा भाऊ अस्लम पंजाबी आझमवर चवताळुन गेला व रागाने ओरडुन म्हणाला काय

"गाढवासारखा कुस्ती खेळतोस.विष्णु हा दख्खनी पैलवान आहे तु त्याला चिरडुन मारायला हवा होतास."

त्यावर आझम अस्लमला म्हनाला "तु त्याचे बरोबर कुस्ती खेळुन बग म्हजे तुला समजेल.त्याचे सर्व अंग दगडासारख कठीण लागतयं.त्याचा मानेवर हात पडला तर पहार मारल्यासारखा लागतोय डोळ्याला अंधारी येतेय. "

त्यांच्यानंतर तगडा व बलवान शरीफ पंजाबी याचे बरोबर कोडोली येथे कुस्ती लावली.त्यालाही विष्णु नागराळे यांनी चीत केले. त्याच्यानंतर त्याच्या पेक्षाही तगडा व बलवान मीदा पंजाबी याचे बरोबर इंचलकरंजी येथे कुस्ती लावली तेथेही विष्णु नागराळे यांनी बाजी मारली. या पराभावाने मात्र भोलाची तळपायाची आग मस्तकाला गेली व भोलापेक्षाही तगडा आणि बलवान असणारा भोला पंजाबी नंबर दोनचा भाऊ अस्लम पंजाबी यांचेबरोबर बेडकीहाळ मुक्कामी कुस्ती ठरवली गेली.पै.विष्णु नागराळे यांचे वडीलबंधु आण्णासाहेब चव्हाण यांच्या आज्ञेवरुन कुस्ती ठरली गेली असे कोल्हापुरातील पैलवान व वस्ताद लोकांना जेव्हा समजले तेव्हा कोल्हापुरातील काही जेष्ठ पैलवान व वस्ताद आण्णासाहेब नागराळे यांचेवर चिडले व म्हणाले

"विष्णु हा पंचवीस वर्षाचा कोवळा बांड बच्चा आहे त्याला महाभयंकर काळाच्या जबड्यात घालता आहात हे बरोबर नाही.विष्णु ह्या पराभवाने खचला तर त्याची कुस्तीची कारकिर्द संपेल. केव्हा तो पंजाबी विष्णुला निकामी करुन ठेवेल आणि त्याचे पाप तुमच्या पदरात येईल" 
त्यावेळी आण्णासाहेब नागराळे शांतपणे आणि अभिमानने म्हनाले " तुम्ही म्हनता ते बरोबर आहे परंतु पंजाबमधील भोला सारखा एक पैलवान महाराष्ट्रात येतो आणि संपूर्ण महाराष्ट्राला कुस्तीचे आव्हाण देतो आणि ते महाराष्ट्रामधे कोनीही स्विकारले नाही हे नामर्दपणाचे लक्षण आहे.या  कुस्ती मधे माझा पैलवान पडला तरी चालेल त्याची कुस्तीची कारकिर्द संपली तरी चालेल परंतु महाराष्ट्राची व महाराष्ट्रातील पैलवानकीची इज्जत राखणेसाठी  मी हे आव्हाण स्विकारणारच.कुस्तीच्या यशाअपयशापेक्षा आव्हाण स्विकारणे व जिद्दीने लढणे याला अधिक महत्व आहे.आणी माझा आत्मविश्वास आहे माझा विष्णु खात्रीने ही कुस्ती जिंकणारच.
या अटीतटीच्या लढतीकडे साऱ्या भारताचे लक्ष लागले होते कुस्तीच्या दिवशी संपुर्ण भारतातुन कुस्ती शौकीन लोक बेडकीहाळला हजर झाले होते आणि सकाळपासुन मैदानाकडे लोकांचा पुर वाहत चालला होता.दोन प्रहरी सागराला भरती यावी असे कुस्ती मैदान टिच्चुन भरले होते.
लहान लहान कुस्त्या झाल्या आणि मोठ्या कुस्त्यांना सुरुवात झाली आणि थोड्याच वेळात मैदानाच्या पुर्व बाजुच्या प्रवेशद्वारतुन पंजाबी पैलवानांचा एक तांडा आत आला आणि आखाड्याच्या पश्चिमेच्या बाजुला पुर्वेला बसला.मोठ्या कुस्तीचे दोन्ही पैलवान आत आल्याबरोबर इतर कुस्त्या संपण्यापुर्वीच मोठी कुस्ती लावण्याबद्दल प्रेक्षकांच्यातुन आवाज येवु लागले व गोंधळ चालु झाला. संयोजकांनी प्रेक्षकांना शांत करणेचा प्रयत्न केला. परंतु लोक ऐकेनात म्हनुन मोठ्या कुस्तीच्या पैलवानांची नावे पुकारण्यात आली.दोन्ही पैलवानांनी तयारी करणेस सुरुवात केली.मुख्य कुस्तीची वेळ जवळ आली. शिंगवाल्याने शिंग फुंकले.तुताऱ्या वाजु लागल्या आणि रणवाद्याच्या जयघोषात 'या आल्ला परवरदिगार' अशी गणनभेदी गर्जना करुन शड्डु ठोकित सहा फुट उंचीचा धिप्पाड गोरापान सव्वा दोनशे पौंड वजनाचा पैलवान अस्लम पंजाबी किरिमिजी रंगाची लांघ घालुन खवळलेल्या चित्याप्रमाणे नाचत मैदानात मैदानाच्या पश्चिमेकडुन पुर्वेकडे तोंड करुन मैदानात आला व फिरुन सुर्याकडे तोंड करुन उभा राहीला.आरशावर सुर्याचे प्रतिबिम्ब झळकावे त्याप्रमाणे तेल लावलेल्या गोऱ्यापान अस्लमच्या शरीरावर सुर्यप्रकाश झळकु लागला आणि चिडीचुप झालेल्या सर्व प्रेक्षकांच्या नजरा तिथे खिळल्या.
थोड्याच वेळात सव्वा पाच फुट उंचीचे,पावणे दोनशे पौंड वजनाचे पै.विष्णु नागराळे गुलाबी रंगाची लांग घालुन तयार झाले.अंगाला थोडेसे तेल लावले. एकाद्या दगडी मुर्तीप्रमाणे दिसणारे शरीर मांडीचे छातीचे व दंडाचे स्नायु मोठ्या नारळाप्रमाने दिसत होते. गळ्यात कंडा,ओठावर मिशी,गालावर बारीकशी दाढी,डाव्या दंडामधे बांधलेली पांढरी पट्टी सौंदर्याला साथ देत होती.चेहऱ्यावरील आणि नजरेतील भाव आत्मविश्वास दर्शवत होते.पै.विष्णु नागराळे यांनी हसत हसत आपल्या दैवतासमान वस्ताद वडील बंधु आण्णासो नागराळे यांचे चरणी मस्तक ठेवुन दर्शन घेतले. मैदानास वंदन करुन प्रेक्षकांना अभिवादन केले. आणि ' "बजरंग बली की जय' अशी गर्जना करुन मैदानात जाणेसाठी मैदानाच्या जवळ आल्याबरोबर सर्व प्रेक्षकांनी बजरंगबली की जय अशी गर्जना करुन टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले आणि आशिर्वाद दिला. विष्णु नागराळे यांनी प्रेक्षकांची मने आधीच जिंकली होती.
पैलवान विष्णु नागराळे मैदानाच्या पुर्वेकडुन पश्चिमेकडे तोंड करुन सुर्य तोंडवर घेवुन मैदानात उतरले. पै. विष्णु नागराळे आत आल्याबरोबर एकाद्या उंदरावर मांजराने झडप घालावी तसे पै अस्लम पंजाबी पै.विष्णु यांच्यावर धावुन गेला व सलामी न घेताच पटात घुसुन दुहेरी पट काढुन ढकलुन देवुन पळुन जायचा प्रयत्न करताच सावध असलेल्या पै.विष्णु नागराळे यांच्या बुद्धि चातुर्यातुन व तीक्ष्ण नजरेतुन हा प्रसंग सुटला नाही. त्यांनी खाली वाकुन अस्लम पंजाबी यांच्या छातीला हात लावुन मागे ढकलले व त्याचा पट काढुन फसवणेचा प्रयत्न असफल केला.त्याच बरोबर पंच मंडळींनी मध्ये धावली व त्या दोन्ही पैलवानांना धरुन पैलवानांच्यामधे आणले.समोरासमोर त्या दोन्ही पैलवानांना पाहताच या बलदंड धडापुढे पै. विष्णु नागराळे यांचा कसा निभाव लागणार अशी साशंकतेची बोलणी प्रेक्षकांच्यात चालु होती. दोन्ही पैलवान फडाच्या मधे येताच सलामी झडली कुस्तीला सुरुवात झाली.आपल्या महाकाय शक्तीचे राक्षसी प्रदर्शन चौंदडी करुन अस्लमने प्रेक्षकांना घडवले.अस्लमने चौंदडी करत मागे रेटत रेटत मैदानाला दोन वेढे काढले.मैदानाच्या कडेला बसलेले आण्णासाहेब नागराळे संतापाने ओरडले " अरे विष्णु भ्याडासारखा मागे काय सरकतोस आपल्याला कुस्ती हवी आहे. " असा हा आपल्या वडील बंधुचा आवाज कानी पडताच  पै. विष्णु नागराळे यांना डबल आवसान आले व वडील बंधुची आज्ञा शीरसवंध मानुन अस्लमच्या कानशिलात भडकावली त्याबरोबर अस्लम एकदम चवताळला व पै. विष्णु नागराळे यांच्यावर झडप घेतली आणि हेच हवे पै. विष्णु नागराळे यांना अस्लमने अंगावर एकदम झडप घेतल्याबरोबर पै. विष्णु नागराळे यांनी आपला हुकमी डाव मुलतानी या डावावर सातच मिनिटात अस्लमला चारी मुंड्या चीत करुन आस्मान दाखवले.प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.विष्णु नावाचा जयघोष असमंतात घुमल.कोल्हापुरच्या मैदानात अस्लमने काढलेले शब्द आज आझमने बोलुन दाखवले. त्याचवेळी भोला पंजाबीचा मामा हमीदा पंजाबी यांच्यातील खेळाडु जागा झाला व तो मैदानात पळत गेला आणि आपल्या भाच्याला आस्मान दाखवणाऱ्या विष्णुच्या पाठीवर थाप मारुन शाब्बासकी दिली व छातीशी कवटाळुन धरले.स्वतः भोला पंजाबी मैदानात गेला त्याने विष्णुच्या हातात हात घालुन अभिनंदन केले आणि गौरवाने उद्गार काढले " दक्षिणेत आमच्याबरोबर लढणारा एकच पैलवान आहे तो म्हजे पैलवान विष्णु नागराळे  त्यानेच आम्हाला महाराष्ट्रात हैरान करुन सोडले. सळो की पळो अशी स्थिती करुन ठेवली "आता आपणावरही धाड येते की काय असे वाटुन थोडेच दिवसात भोला पार्टी महाराष्ट्र सोडुन पंजाबमधे निघुन गेली.
या सर्व घटना पाहुन व ऐकुन चव्हाण दादांचे ऊर अभिमानान भरुन आले .किती श्रद्धा किती विश्वास होता त्या दोघा भावाभावांचा एकमेकावर हे पाहुन भाऊ असावा तर भरतासारखा असे म्हनन्याऐवजी भाऊ असावा तर दादांच्यासारखा असे म्हनावे वाटते.कारण दादांच्या शिवाय विष्णु नागराळे हे पैलवान झालेच नसते  .
पैलवान विष्णु नागराळे यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाबमधे जावुनसुद्धा कुस्त्या केल्या ज्यावेळी पै.विष्णु नागराळे पंजाबमधे कुस्ती साठी जात तेव्हा पंजाबमधील पैलवान हे विष्णु नागराळे यांना महाराष्ट्रातील कुस्तीचा जादुगार आला असे म्हणत असत.

पंजाब ही पैलवानांची खाण असे मानले जाते पंजाबमधे जागतिक किर्तीचे पैलवान झाले तरीसुद्धा १९६७ साली हरियाणा रोहटक येथे हिंदकेसरी पदाच्या ज्या कुस्त्या झाल्या त्या कुस्त्यासाठी जो आखाडा तयार केला होता त्या आखाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर पैलवान विष्णु नागराळे यांचा भलामोठा फोटो लावला होता व त्या प्रवेशद्वाराला पै. विष्णु नागराळे प्रवेशद्वार असे नाव दिले होते.

कोल्हापुरच्या शाहुपुरी तालमीमधे हनुमान मुर्ती ज्या ठिकाणी ठेवली आहे त्याच ठिकाणी विष्णु नागराळे यांचा फोटो ठेवलेला आहे. त्या तालमीत हनुमानाला जेवढे प्रिय मानतात तेवढे पै. विष्णु नागराळे यांना प्रिय मानतात. व त्याच्या फोटोची पुजा करतात. पैलवान विष्णु नागराळे यांना माणसांची पारख करण्याची फार मोठी दृष्टी होती. रेल्वे स्टेशनवर चुनचुनित असा दिसनारा एक गरीबाचा मुलगा पै.महमद हानीफ सारखा हा महान कुस्तीगार होईल हे त्यांच्या तीक्ष्ण नजरेतुन सुटले नव्हते.
विष्णु नागराळे यांनी ज्या मातीमधे जन्म घेतला त्या मातीचे उपकार फेडले जगात स्वर्गाहुन मोलाच्या अशा दोन गोष्टी असतात. एक जन्म देणारी आई आणि दुसरी म्हजे जिच्या अंगाखांद्यावर आपण लोळतो खेळतो आणि जिने पिकवलेल्या अन्नवस्त्रावर आपण जगतो ती जन्म भुमी. या जन्मभुमिचे पांग फेडण्याची हिंमत धमक एकाद्याच्याच अंगामधे असते आणि ती हिंमत होती पैलवान विष्णु नागराळे यांच्यात. त्यांनी ज्या गावच्या मातीत जन्म घेतला त्या गावचे नाव अजरामर किर्तीचे केले. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या आडनावाच्या ठिकाणी गावाचे नाव लावले. पै. विष्णुपंत चव्हाण असे नाव घेण्याऐवजी त्यांना लोक विष्णुपंत नागराळे असेच म्हनु लागले व आजही तेच नाव अजरामर आहे.

असा हा महान कुस्तीगार आपणा सर्वांना सोडुन दुखःसागरात लोटुन गेला. विजयाचा सुर्य मावळला. १० डिसेंबर १९५६ आज त्यांच्या चरणी ही पुष्पांजली व त्रीवार वंदन.हा विजयाचा सुर्य मावळला असला तरी त्या मावळलेल्या सुर्याचा नंदादीप झाला हा कुस्तीचा नंदादीप अखंड तेवत राहुन सर्व पैलवान पैलवान लोकांना स्फूर्ती देत रहावा ही ईश्वर चरणी प्रार्थना.

ही अतिशय दुर्मिळ माहिती मला 2011 साली आमच्या पलूस गावचे जुन्या काळातील नामवंत मल्ल कै.हैबतराव पाटील यांनी सांगितली होती.आज केवळ त्यांच्यामुळे ही माहिती आपल्यापर्यंत पोहचत आहे.

10 डिसेंम्बर 2022 रोजी रुस्तुम ए हिंद विष्णुपंत नागराळे यांची 66 वी पुण्यतिथी आहे.त्यांच्या स्मृतीस कुस्ती मल्लविद्या महासंघाची भावपुर्ण श्रद्धांजली.

धन्यवाद
लेखन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form