पुर्वी लग्नात सुद्धा कुस्त्या कश्या व्हायच्या हे वाचा : "लग्नाचं पन"..कथा महाराष्ट्राचा संस्कृतीची

पुर्वी लग्नात सुद्धा कुस्त्या कश्या व्हायच्या हे वाचा : "लग्नाचं पन"..कथा महाराष्ट्राचा संस्कृतीची
रामा ची कुस्ती मेहनत संपली आणि थंडाई चा तांब्या तोंडाला लावणार इतक्यात गावचे पोलीस पाटील बिगीने तालमीत येताना दिसले.थंडाई पिऊन तोंड पुसत कमरेला लुंगी बांधत रामा बाहेर कट्ट्यावर येऊन उभा राहिला.सर्जेराव पाटील स्वतः व सोबत दोन नोकरासमवेत तालमीकडे का येत असावेत असा विचार रामा करत होता.खांद्यावर डबलबारी बंदूक सावरत सर्जेराव आले तसे रामा ने आदराने त्यांच्या पायाला स्पर्श करत आशीर्वाद घेतला.
रामाकडे बघत सर्जेराव बोलले...

रामा...झाली का कुस्ती मेहनत..?
रामाने होकारार्थी मान हलवली.
वस्ताद कुठं हायती..?
सर्जेराव बोलले..

वस्ताद आज आलं नाहीत.काहीतरी काम असलं त्यासनी.पण,तुम्ही कस काय येणे केले...?
रामा बोलला...

यावर सर्जेराव बोलले...

रामा...पोरीची लगीन ठरवलं हाय....यशवंतवाडी चे भोसले पाटील.मोठी आसामी हाय.तालेवार घराणे हाय..म्होरच्या ऐतवारी मुहूर्त हाय..तवा,सोबत तुला यावं लागलं..पाहुण्यांसनी कुस्तीचा नाद हाय असं ऐकून हाय..ऐन वेळी मानपानात जोडीला जोड मागितली तर आमची पाचावर धारण नको व्हायला...

रामा हसला आणि मिशीवर ताव मारत म्हणाला...येतो की राव..तुमच्या खुराकावर तर पोसलोय आमी.आमच्या बहिणीच्या मानपानात खेळायला मिळायला नशीब लागतं...येतो आम्ही नक्की...
पाटील हसले आणि सोबत आणलेला पान सुपारी आणि मानाचा फेट्याचे पान रामाकडे दिले.इसारत म्हणून काही पैका बी हातावर ठेवला.रामा ने हातात घेतले आणि पुन्हा सर्जेरावांचा आशीर्वाद घेतला.
राव म्हणाले...रामा तयारी कर एक दोन दिस अजून.काय व्हय-नगो ते माग.अजून काही जिन्नस धाडून देतो.असे म्हणत सर्जेराव बिगीने निघून गेले.

इंग्रजांच्या हुकुमातीखाली असणाऱ्या कोल्हापूर जवळच्या जाधवमाचीचे सर्जेराव पाटील म्हणजे बारा वाड्यात थोरली आसामी होती.लेकीच्या लग्नात मोठा मानपान करायचे नियोजन होते.25 बैलगाड्या भरून वऱ्हाड यशवंतवाडीला न्यायचे होते.लग्नाच्या आधी 2 दिवस पोहोचणार होते सारे.96 कुळीच्या तालेवाराचं लगीन म्हणजे मान पान आणि हौस मौज दांडगी होणार होती म्हणून सारा गाव आनंदात होता.
ऐनवेळी पाहून कशाची पण अट धरतील म्हणून सोबत झुंजीचे जातिवंत बैल,शिकार खेळायला जवान न्यायचे ठरले होते.यशवंतवाडीचे भोसले कुस्तीचे नादिष्ट्य घराणे होते.ऐनवेळी कुस्तीचे पण ठेवले तर मान आणि इज्जत कमी व्हायला नको म्हणून गावाचा मोठा पैलवान रामा ला सोबत न्यायचे ठरले होते.रामा गावाचा मोठा पैलवान,शिवाय तालमीतल्या जवानांचा खर्च स्वतः सर्जेराव करायचे.त्यामुळे सर्जेरावांची लेक म्हणजे तालमीची इज्जत पण होती.

रामा ने सारी तयारी केली.कुस्तीचा दांडगा अनुभव होता पण यावेळी जरा दडपण पण होते.कधी नव्हे ते सर्जेरावांनी स्वतःसाठी काहीतरी मागितले होते.कुस्ती ठरली तर जिंकणे जरुरी होते.कुस्ती मेहनतीवर रामा चा पुरा विश्वास होता.बाकी होईल ते होईल.
बैल जुंपून बैलगाड्या सजवल्या.गावच्या आया बाया नटून थटून आपापल्या गाड्यात बसल्या.गाडीवान भरजरी फेटा घालून हातात चाबूक घेऊन बसले.सर्जेरावांची लेक म्हणजे साक्षात अश्विनी नक्षत्र.जातिवंत सौंदर्य आणि संस्कारात वाढलेली मुलगी.तिच्यासाठी खास तयार केलेली वेगळी बैलगाडी होती.एक रात्र आणि दोन दिवसांचा प्रवास असल्याने सर्वकाही सोबत घेतले होते.
रामासाठी वेगळी बैलगाडी जुंपली होती.रामाने सोबत जिवलग मित्र आणि काही हत्यारे घेतली.बैलगाडीत तलवारी,भाले,बरचे पेलत जवान बसले.थट्टा मस्करी आणि हास्यकल्लोळास उधाण आले.एका रेषेत बैलगाड्या चालू लागल्या.आघाडीच्या बैलगाडीवर हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा दौलत होता.
गाडीत बसून आया बाया गाणी म्हणत होत्या....

"पिढ्या पिढ्यांच पातक सरलं...शिवनेरीवर शिव अवतरलं,
शिवरायांच्या मंगल चरणी पावन झाली अवघी धरणी,
जय भवानी-जय शिवाजी बोल गर्जती आज पाचही प्राण,
राघू मैना रान पाखरू गाऊ लागलं गाणं"

संध्याकाळी बैलगाडी घुंगुराच्या आवाजात मराठी लोकगीत सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमत होते.

दुसऱ्या दिवशी सांच्याला यशवंतमाचीच्या हद्दीवर शे दीडशे मंडळी पाहुण्यांच्या स्वागताला हजर होते.तांब्याच्या घागरी भरून पाणक्यांनी पाहुण्यांच्या पायावर गार गार पाणी ओतुन प्रवासाचा शिन घालवला.गुळ पाणी झाले आणि सारे पायउतार होऊन भोसल्यांच्या वाड्यापर्यंत गेले.

मुलीसाठी जाणवस खोली सजवून तयार होती.इतर पाहुण्यांची सुद्धा चांगली सोय झाली.

रामा आणि सवंगडी गावच्या तालमीतच उतरले.ती रात्र विश्रांती मध्ये गेली.

दुसऱ्या दिवशी हळद दळून हळद खेळायचा कार्यक्रम होता.उभय मंडळी एकत्र जमली आणि पारंपारिक रीतीरिवाजात कार्यक्रमाला सुरवात झाली.

कार्यक्रम सुरू असताना भोसले मंडळींकडून कुस्तीचा प्रस्ताव आला.सर्जेरावांना अगोदरच माहिती होते सारे.

मुलाचे मामा मोठ्या आवाजात म्हणाले....

"ऐका हो ऐका....यशवंतवाडीच्या भोसले मंडळींशी जाधवमाचीच्या सर्जेराव पाटील यांच्या लेकीच्या सोयरीक होत असताना,आज भोसले कुळाचार व क्षत्रियधर्म पाळत मर्दानी कसब दाखवायची आहे.लग्नाचा मानपान म्हणून आमच्या तालमीत खास तयार केलेला येसबा पैलवान याला जोड द्यावी.येसबा ने कोल्हापूर साताऱ्यापर्यंत बऱ्याच जवानांना धूळ चारली आहे.खास भोसल्यांच्या खासगीत कुस्ती,मेहनत,खुराक देऊन तयार केलेल्या येसबाबरोबर चार हात करायला सर्जेरावानी जोड द्यावी.नसेल तर साऱ्या वऱ्हाडाला वशाट जेवण लग्नाच्या अगोदर घालावे.

"सर्जेराव हसत पुढे आले..भोसले मंडळींचा पन आम्हांसनी मंजूर हाय...तुमच्या जवानाशी चार हात करायला आमचा रामा तयार हाय...राम ये सामने म्हणत सर्जेरावांनी हाळी मारली."

हत्ती झुलावा तसा रामा फेट्याची शेपूट मागे उडवत आणि मिशीला ताव देत समोर आला,तर दुसरीकडून येसबा सुद्धा उंचापुरा धिप्पाड मल्ल समोर आला.

दोन पहाड समोरासमोर येत आहेत असा भास झाला.रामा ने सलामी द्यायला हात सामने करताच येसबा ने जोरात हातावर हात मारला आणि एक पाय वर करत जय बजरंग आरोळी ठोकली.

भोसले-पाटील मंडळी वाड्यासमोर तयार केलेल्या मैदानभोवती श्वास रोखून बसली.आता ही कुस्ती ठरवणार होती की कोणकडचे पाहुणे तयारीचे आहेत.

मैदानाची औपचारिक पूजा झाल्यावर आपापल्या धन्याचा आशीर्वाद घेत ते दोन पहाडी मल्ल उभय ठाकले.चौदंडी आणि ताकदीचा अंदाज झाल्यावर ठोक्यावर ठोके सुरू झाले.येसबा गर्विष्ठ दिसत होता.गेल्या अनेक दिवसात त्याने पराभव चाखला नव्हता.तर रामा शांत संयमी खेळत होता.बराच वेळ झाला.घामाचा चिखल झाला तरी कोण मागे हटत नव्हते.अखेर येसबा ने हातापायाला लागणारे आवलगामी डाव वापरणे सुरू केले.पंच म्हणून उभे असणारे मुलाचा मामा सुद्धा त्याला थांबवत नव्हते.रामाने बरेच डाव हुकवले मात्र प्रतिडाव माहिती असूनही केला नाही.त्याच्या वागण्याने सर्जेरावांचा अपमान व्हायला नको म्हणून तो शांत होता.शेवटी हातावर वर्मी डाव झाला आणि रामा जोरात किंचाळत मागे सरकला आणि जमिनीवर बसला.यशवंतवाडीकडची मंडळी टाळ्या वाजवू लागली तर सर्जेरावकडील मंडळी शांत.सर्जेराव मैदानात आले आणि रामाकडे पहात बोलू लागले....रामा,आता शिष्टाचार बस झाला...दाव त्याला जाधववाडीचे पाणी......रामाने सर्जेरावांच्या पायाला स्पर्श केला आणि पुन्हा येसबा च्या पुढे गेला आणि येसबा ने मोडायला हात बगलेत घालताच रामा ने जी ढाक लावली तसा येसबा सर्दीशी जमिनीवर पाठीवर आपटला....येसबा चारी मुंड्या चित झाला होता.

अवघी जाधववाडी आनंदली.मुलाच्या मामाने डोक्याला हात लावत बसकण मारली.सर्जेराव धावत मामाजवळ आले..म्हणाले..मामा आता जेवण तुम्ही घालायचे आम्हाला....मुलाचा बाप आणि मामा दोघांनी सर्जेरावाना मिठी मारली आणि रामा ला चांदीचे कडे बक्षीस दिले.

आपल्या धन्याच्या मुलीसाठी रामा ने प्राणपणाने कुस्ती जिंकली होती.आयुष्यभर आपल्यासाठी धावून येणारे माहेर मुलीकडे होते तर आपली सासरवाडी किती मजबूत मनगटांची आहे हे नवऱ्या मुलाला कळाले होते.

लग्न थाटामाटात पार पडले आणि सारी मंडळी आनंदाने माघारी निघाली.सगळ्या लग्नात मात्र रामाच्या कुस्तीची चर्चा गाजली.गावात आल्यावर रामाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत अस्सल मराठमोळी परंपरा कित्येक दशके महाराष्ट्राने जोपासली.आज अशी मर्दुमकी आणि पुरुषार्थ यांचे दर्शन घडवणारी लग्ने ना आपल्या पिढीने पाहिली असतील ना पाहतील.मात्र,महाराष्ट्राने अशी अस्सल लग्ने पाहिली,अनुभवली.त्याचा उजाळा आजच्या या कथेतून.




पै.गणेश मानुगडे
Kustimallavidya@gmail.com

2 Comments

  1. महाराष्ट्राची शान कुस्ती

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form